वृक्ष लागवड व संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार -पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

0
446

वृक्ष लागवड व संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार
-पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

15 ऑगस्ट रोजी उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यात 1 लाख झाडे लावण्याचे नियोजन

बाबूराव बोरोळे
लातूर जिल्हा प्रतिनिधी
इंफेकट न्युज लातूर
8788979819

वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे, त्या दृष्टीने सर्व विभागानी मेहनत घेवुन येणाऱ्या 15 ऑगस्ट ला राष्ट्रध्वजा बरोबर वृक्षाला सलामी देण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम हाती घ्यावी. व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पाणी पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात वृक्ष लागवड व संवर्धन बाबत आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उप विभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, रमेश अंबरखाने, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या सह सामाजिक वनीकरण, वन विभाग, महसूल व शिक्षण विभाग सर्व शाळेचे मुख्याध्यापक व सरपंच उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय बनसोडे म्हणाले की, प्रत्येक गावात ,शासकीय कार्यालयात व शाळेत झाडे लावण्यात यावेत. मियावाकी पॅटर्न सर्वत्र राबवण्यात यावा. झाडे लावून ते कसे जगवता येतील त्यासाठी ठोस पाऊल उचलून हरित उदगीर करावे. यात हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच उदगीर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतील व लावलेल्या वृक्षांचे 100% संवर्धन करून ती झाडे जगवतील अशा ग्रामपंचायतींना आमदार फंडातून दहा लाखाचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
उदगीर जळकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवड करून त्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी पुढील काळात एक पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक सामाजिक पथक म्हणून कार्यरत राहील व वृक्ष लागवडीचा व संवर्धनाचा प्रत्येक महिन्याला लेखाजोखा घेईल तसेच वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या कार्यरत राहील, अशी माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.
जिल्ह्यात मागील काही वर्षात झालेल्या वृक्षलागवडीची चौकशी करण्यात येणार असून यापुढील काळात लावलेले प्रत्येक वृक्ष जगले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षणात जसा लातूरचा पॅटर्न आहे तसाच पॅटर्न वृक्ष लागवड व संवर्धनात उदगीर चा झाला पाहिजे, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य मंत्री बनसोडे यांनी यावेळी केले.
माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे त्यात कचरा , जल व्यवस्थापन, वृक्ष लागवड व व्यवस्थापन, नदी नाले स्वच्छता,सांडपाणी, महिला सबलीकरण या माध्यमातून करता येणार आहे. सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री फाऊंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने उदगीर ,जळकोट,देवणी तालुक्यात 15 आगस्ट रोजी एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच उदगीरचा झाडे लावण्याचा पॅटर्न पुढील काळात महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here