तोहोगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

0
335

तोहोगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

गोंडपिपरी : तालुक्यातील तोहोगाव गावातील मूलभूत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. या गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

तोहगाव येथे आयोजित सत्कार समारंभ व भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, दीपक सातपुते, बंडु गौरकार, तोहगावचे सरपंच अमावस्या ताळे, उपसरपंच शुभांगी मोरे, मदन खामनकर, अतुल मुक्कावार, संजय उपगन्लावार, प्रकाश उत्तरवार, सुरेश धोटे, श्यामराव नारेलवार, संदीप मोरे,हं सराज रागीट आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ९२ लाख रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या संबोधनात ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जल है तो जीवन है. तोहगावला आता दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही. भविष्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी हर घर जल हे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न तोहगावातही मूर्त रूप घेत आहे.

तोहगावातील मूलभूत कामांच्या विकासाला चालना देण्यात येईल. गावांतील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी ५० लाख रुपयांची घोषणा यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. रस्ते व जलनिस्सारणाची कामे यातून करण्यात येतील असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी जाहीर केले. तोहगावात ग्राम पंचायतच्या माध्यमातून वाचनालय उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त करीत ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासाठी मदत करणार असल्याचा शब्द दिला. तोहगाव भागातील रस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पातून तरतूद व्हावी यासाठी पाठपुरावा करू, असेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

गेले काही वर्ष आपले सरकार नसल्याने विकास थांबला होता. परंतु आता महाराष्ट्र सरकार सामान्यांच्या आणि गोरगरीबाच्या हिताचे अनेक निर्णय घेत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थितांना सांगितले. गावातील तरुण-तरुणींच्या पाठिशी केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी उभे आहे असा विश्वास त्यांनी उपस्थिताना दिला. आता शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये थेट जमा होणार आहेत. तोहगावातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी गावातीलच सुशिक्षित तरुणाईने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

घत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सुटलेल्या शेतकऱ्यांची नावेही लवकरच समाविष्ट करण्यात येतील. सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात शेतकऱ्यांना पिकविमा मिळणार आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.शेतकऱ्यांचे कोणत्याही कारणाने निधन झाले तरी त्याचे कुटुंब उघड्यावर येते. त्यामुळे आपण अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश अशा कारणांसाठी मिळणाऱ्या मदतीत वाढ केली. हे करून आपण शेतकऱ्यांप्रती असलेले आपले कर्तव्य निभावले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. २०१८ नंतर शेतकरी कुटुंबातील सदस्यांना अशा विम्याचा लाभ मिळत आहे. आता त्याही पुढे पाऊल टाकत सरकारने निर्णय घेतलाय की अशा शेतकरी कुटुंबांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी अभिमानाने नमूद केले.

पालकमंत्र्यांची धान्यतुला
मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची धान्यतुला तोहगावात करण्यात आली. यावेळी नांगर भेट देण्यात आले. धान्यतुलेतील धान्य शेतकऱ्यांच्या घामाचे,कष्टाचे असल्याने सुवर्णतुलेपेक्षाही तोहगावातील धान्य तुला आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटते, अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या आयुष्यातील ही धान्यतुला आपल्याला कायम स्मरणात राहिल असेही त्यांनी नमूद केले.

लोकप्रतिनिधी म्हणून कल्याणाचा संकल्प
आमदार, मंत्री हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकहिताचे व त्यांच्या हक्काची कामे करणे ते त्यांचे कर्तव्यच आहेत. आपण आमदार व त्यानंतर मंत्री म्हणून लोककल्याणाच्या संकल्पच केला. समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे भावनिक उद‌्गारही ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here