राजुरात कृषक व पूरग्रस्त जागेत ले-आऊट पायाभूत सुविधेचा अभाव!

199

राजुरात कृषक व पूरग्रस्त जागेत ले-आऊट पायाभूत सुविधेचा अभाव!

प्लॉटधारकाची होताय फसगत, प्रशासन अनभिज्ञ

 

राजुरा : राजुरा तालुक्यातील दोन-तीन किमी अंतरावर असलेल्या बामनवाडा रामपूर शिवारात ले आऊटचा अक्षरश: बाजार भरला असून पायाभूत सुविधे शिवाय प्लॉटची सर्रास विक्री केली जात आहे. काही ले आऊट आदिवासी शेतजमिनीत आहे तर काही ले आऊटधारक सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता जनतेची दिशाभूल करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भागात जनतेची मोठया प्रमाणात फसगत केली जात आहे.

राजुरा शहरासह बामनवाडा व रामपूर येथे अनेक ले आऊट टाकण्यात आले असून ते कृषक व पूरग्रस्त जागेत असल्याची माहिती आहे. मुळात कृषक जागा ही अकृषक मध्ये परावर्तित केल्यानंतरच ले आऊट टाकले जाते. तरी सुध्दा प्लॉटची बुकिंग जोरात सुरू आहे. ले आऊटधारक सोयी सुविधा न पुरवता अटी व शर्तीचे उल्लंघन करून प्लॉटचा व्यवहार करीत आहे. हा प्रकार खुलेआम व अधिकाऱ्यांच्या समोर केला जात आहे. तरी सुध्दा संबंधित विभाग गप्प का ? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. राजुरा- चुनाळा मार्गावरच्या शेतजमिनी कवडीमोल किंमतीत घशात घालून ले आऊट टाकण्यात आले आहे.

 

आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून आदिवासींचे खाते आजही निरंक असून त्याच्या नावावर या परिसरातील धनधाडगे मात्र मालामाल होत आहे. या संबंध विधानसभेत नुकतीच एक लक्षवेधी आल्याने चौकशी सुरू झाल्याचे सांगण्यात येत असून यातून आदिवासींना न्याय मिळण्याची अपेक्षा तक्रारकर्ते बापूराव मडावी यांनी व्यक्त केली आहे.

 

आदिवासीना वाटपात देण्यात आलेल्या वर्ग २ च्या जमिनी भंगार दरात घेऊन गर्भश्रीमंत महाभागांनी ले आऊटच्या माध्यमातून तिजोरी भरण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केला आहे. स्टेला मेरिस शाळेच्या मागे असलेल्या ले आऊट मध्ये पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. काही महाभागांनी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्लॉटची विक्री करून प्लॉटधारकाना वाऱ्यावर सोडले आहे. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असतांना हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या जात आहे. दरम्यान बामनवाडा शिवारात एकामागून एक ले आऊट टाकण्यात आले आहे. या ले आऊटधारकांनी प्लॉटच्या बुकिंग करीता मोठा ‘तामझाम’ करून प्लॉट विक्री केली जात आहे. ले आऊट हे कृषक व पूरग्रस्त जागेत असल्याची माहिती असूनही कृषक जागा अकृषक मध्ये परावर्तित न करता परवानगी देण्यात येते कशी?. याशिवाय ले आऊट मध्ये सोयी सुविधेचे तीनतेरा वाजले आहे. अधिकृत ले आऊट नसतांना देखील प्लॉटची बुकिंग केली जात आहे. काही प्लॉटधारक राहायला आले आहे त्याची स्थिती ना घरका ना घाटका अशी झाली आहे या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून नागरिकांचे हाल होत आहे.

advt