कटाक्ष: गडकरी आल्याने काय फरक पडणार? जयंत माईणकर

0
529

कटाक्ष: गडकरी आल्याने काय फरक पडणार? जयंत माईणकर

‘विचार तोच राहे, व्यक्ती बदलल्या तरीही!’

कोरोना हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकार मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरत असल्याच्या बातम्या देशात आणि परदेशातील माध्यमातून येत असतानाच सोशल मीडियावर नितीन गडकरींना पंतप्रधान करा अशी मागणी होऊ लागली आहे. भाजपचे नामनियुक्त खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी तर कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी गडकरींना नियुक्त करावं, अस ट्विट केलं आहे. पीएमओ या कामी अयशस्वी ठरत आहे आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरल्याची मल्लिनाथीही त्यांनी केली. वास्तविक पाहता डॉ स्वामी यांनी तेच विचार बोलून दाखवले जे संघ परिवारातील अनेक व्यक्तींच्या मनात आहे. पण बोलून दाखविण्याची हिंमत कोणातच नाही. स्व. मा गो वैद्य यांनी एकदा मोदींच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली. पण ती त्यांच्याच अंगाशी आली. त्यांचा संघ प्रचारक असलेला मुलगा मनमोहन आणि स्वतः नितीन गडकरी याना त्यांची बाजू सांभाळून घ्यावी लागली होती. आज डॉ स्वामी ती हिंमत दाखवतात कारण संघ परिवारात ते मोदींना कितीतरी ज्येष्ठ. अर्थशास्त्रातील पीएचडी मिळाल्यानंतर १९७४ला ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी मोदींनी नुकतीच संघ परिवाराच्या कामात भाग घेण्यास सुरुवात केली होती. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनाच आव्हान दिल्याने डॉ स्वामी संघ परिवाराच्या बाहेर फेकले गेले ते पुन्हा परतले २०१३ साली जेव्हा वाजपेयी ९०च्या घरात पोचलेले आणि सक्रीय राजकारणातून प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवृत्त झाले होते. संघ परीवारापासून ४० वर्षे दूर राहूनसुद्धा डॉ स्वामी यांची हिंदुत्ववादी विचारसरणी बदललेली नव्हती. फॅसिस्ट विचारसरणीच्या पक्षात सर्वोच्च नेतृत्वाला आव्हान देण्याचे परिणाम फार भिषण असतात. आव्हान देणाऱ्या व्यक्तींच राजकीय जीवन संपुष्टात येत तर कधी ते जीवाला मुकतात. मोदी विरोधक स्व. हरेन पंड्या यांच्या खुनाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पण राजकारणातून फेकले गेले तरीही ही मंडळी विचारसरणीशी असलेली आपली बांधिलकी सोडत नाही. जनसंघाचे एके काळचे ज्येष्ठ नेते बलराज मधोक हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण! वाजपेयी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर जनसंघातून काढून टाकण्यात आले होते. पण तरीही त्यांच्यातला हिंदुत्ववादी संपला नव्हता. आणि म्हणूनच की काय १९८० साली पुन्हा सत्तेवर आल्यानंतर स्व इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेसमध्ये येऊन पक्षाचे सरचिटणीस पद आणि देशाचे संरक्षण मंत्री घेण्याची ऑफर दिली होती. पण कट्टर हिंदुत्ववादी मधोकानी ती नाकारली. त्यानंतर दहा वर्षांनी मी स्वतः त्यांना एका पत्रकार परिषदेत भेटलो होतो. त्यावेळीही त्यांची हिंदुत्वावरची श्रद्धा कमी झाल्याचं जाणवलं नव्हतं. काहीसा हाच प्रकार गोविंदाचार्य यांच्या बाबतीत घडला. एक परदेशी मासिकाच्या दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वाजपेयींना भाजपचा मुखवटा, आणि लालकृष्ण अडवाणीना मुख अशी उपाधी दिली. आणि त्यानंतर गोविंदाचार्यांचं पक्षातील अस्तित्व संपल आणि ते राजकीय विजनवसात गेले ते आजतागायत. डॉ स्वामींनीसुद्धा तत्कालीन पंतप्रधान स्व मोरारजी देसाई यांच्याकडे तेव्हा परराष्ट्रमंत्री असलेले वाजपेयी एका पार्टीत कसे मद्यधुंद होते याच वर्णन केलं. त्याचा परिणाम एवढाच झाला की वाजपेयी राजकारणात क्रियाशील असेपर्यंत डॉ स्वामींना भाजपचे दरवाजे बंद होते.अर्थात डॉ स्वामी चंद्रशेखर, जयललिता यांच्या भरवशावर लोकसभेत आणि राज्यसभेत जाण्यात यशस्वी ठरले आणि शेवटी वाजपेयी ९०च्या घरात पोहोचल्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये परतले. केवळ वाजपेयी या व्यक्तीसाठी भाजपने बलराज मधोक, डॉ स्वामी आणि गोविंदाचार्य या तीन नेत्यांना राजकीय विजनवासात पाठवले. हे तिघेही वाजपेयींच्या विरुद्ध बोलले होते. संघ परिवारात सर्वोच्च नेत्याच्या विरुद्ध खुलेआम बोलण्याची शिक्षा! पण या तिघांचीही हिंदुत्वावरची श्रद्धा रेसभरही ढळली नाही.आडवाणी, मोदींच्या काळात संजय जोशी आणि डॉ प्रवीण तोगडिया यांचीही गट हीच झाली आहे. आडवणींना बॅ मोहम्मद अली जिना यांच्या कबरीसमोर त्यांना ‘सेक्युलर’ आणि दशावतारावर विश्वास असणारे हे म्हणणं चांगलंच भोवलं. तेव्हाच्या संघातील एका सर्वोच्च नेत्याच्या आज्ञेनुसार तेव्हा जनरल सेक्रेटरी असलेल्या जोशींनी आडवणींना पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याच बोललं जातं. संजय जोशी आडवाणींच्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेले. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या जागी जनरल सेक्रेटरी म्हणून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्व केशुभाई पटेल यांच्याशी जवळीक साधत स्वतःच अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते मोदींच्या काळ्या यादीत गेले. पुढे सेक्स सीडीचा आरोप त्यांच्यावर झाला आणि नितीन गडकरींनी प्रयत्न करूनही जोशी गेली पंधरा वर्षे भाजपच्या दोन सर्वोच्च नेत्यांच्या विरोधी भूमिका घेण्याची ‘सजा’ भोगत आहेत. डॉ तोगडिया हेसुद्धा मोदींच्या ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये गेले एकेकाळी विश्व हिंदू परिषदेचा चेहरा असलेले तोगडिया आज स्वतः च अस्तित्व शोधत आहेत. हे दोघेही आडवाणी, मोदींच्या विरोधात असले तरीही हिंदुत्वावरची त्यांची श्रद्धा कायम आहे.
आणि हा इतिहास आज आठवण्याच कारण गडकरींना पंतप्रधान करा ही सोशल मिडियावर होणारी मागणी आणि कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी गडकरींना द्यावी ही डॉ स्वामी यांची मागणी.
गडकरी हे नेहमी बचावात्मकराजकारण खेळतात. पक्षातील विरोधकांच्या विरुद्ध ते कधीही आक्रमक भूमिका घेत नाही हा इतिहास आहे. म्हणूनच संजय जोशी असतील तर आपण मुंबईच्या पक्षाच्या अधिवेशनात उपस्थित राहणार नाही ही भूमिका मोदींनी घेतली तेव्हा गडकरींनी आपल्या नागपूरच्या मित्राला दूर करत मोदींना अपेक्षित असलेली भूमिका घेतली. संघ गडकरींना पक्षाध्यक्ष पदाची दुसरी टर्म देण्यास तयार असताना आडवाणीनी मात्र त्याला विरोध दर्शविला होता.आणि गडकरींनी इथेही पडत घेतलं.अशी सतत बोटचेपी भूमिका घेणारे गडकरी मोदींच्या विरोधी भूमिका घेण्याची सुतराम शक्यता नाही. गोध्रा दंगलीनंतर हिंदू मसिहा ही स्वतः ची प्रतिमा बनवणारे मोदी आज परिवारात इतके ताकदवान आहेत की त्यांना हटवण्याचा विचारही संघ परिवार करू शकत नाही. ज्या मोदींनी गडकरींना राज्यातील ५३,००० किमी लांबीचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग करण्यापासून रोखले होते ते मोदी गडकरींना कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ‘फ़्री हँड’ देण्याची सुतराम शक्यता नाही.तसा फ्री हँड गडकरींना मुंबई पुणे हायवे बांधताना स्व बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या आशीर्वादाने मिळाला होता. पण मोदींच्या काळात तसा फ्री हँड कोणालाही मिळणं शक्य नाही. त्यामुळे गडकरी कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष होऊन काय करू शकतील हा एक प्रश्नच आहे. हिंदुत्व ही संघाची भूमिका गडकरींनी सोडण्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे आपला राग ते केवळ अधिकाऱ्यांना निकम्मा, नालायक अशी विशेषण वापरून काढू शकतील, जो त्यांनी आधीही काढलेला आहे. बचावात्मक राजकारण करणारे गडकरी कोरोना टास्क फोर्स हातात आल्यानंतरही मोदींना आव्हान देण्याची किंवा हिंदुत्वाची भूमिका सोडण्याची सुतराम शक्यता नाही.त्यामुळे गडकरी आल्याने काहीही फरक पडणार नाही. तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here