●गडचिरोलीच्या रंगमंचावर डिडोळकर प्रयोग-प्रभू राजगडकर

0
392

………………………………………………….
गोंडवन विद्यापीठ अस्तित्वात आल्यापासूनच वादात आहे.पहिला कुलगुरु आदिवासी करा अशी इच्छा गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींची होती. नावात गोंडवन आहे.पण तेव्हाच्या काॅन्ग्रेस सरकारने ते ऐकले नाही.आणि आपल्या ठेवणीतला प्राचार्य कुलगुरु म्हणून लादला. मग आदिवासींना खुश करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील एक आदिवासी प्राचार्य कुलसचिव म्हणून नेमण्यात आले.ते विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष होते. त्या दोघांनी पाच वर्षे काय गोंधळ घातला हे सर्वांना माहित आहे.त्यानंतर मराठवाडय़ातून एक कॅलेंडर आयात करण्यात आले.ते फारच ज्ञानी होते.गडचिरोली ते नांदेड, लातूर प्रवासात पाच वर्षे कशी गेली कळलेच नाही.मधल्या काळात कुलगुरू पद अस्थायी होते.मग एक शर्मा ची निवड झाली ते आलेच नाही.आता मात्र.बोकारे सा.आहेत.
एवढे कुलगुरू झाले तरी या विद्यापीठाला स्वतःचे ‘विद्यापीठ परिसर ‘ उभे करता आले नाही.मधल्या काळात जमिनीचा व्यवहार गाजला.
अलिकडेच गोंडवन विद्यापीठात सिनेट निवडणुका झाल्या.आणि नवे सिनेट सदस्य आले.
गडचिरोली विद्यापीठात कुठे सभागृह बांधले माहित नाही.पण त्या सभागृहाला कोणी दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव कोण्या गुरुदास कामडी नावाच्या सिनेट सदस्याने मांडला असल्याचे कळते.आता हे गुरुदास चंद्रपूर /गडचिरोली जिल्ह्याचेच असणार.पण आपली निष्ठा गुरूचरणी -संघटनाचरणी वाहिली नाही तर आपण निष्ठावान ठरणार नाही अशी त्यांना भीती असावी. म्हणून त्यांनी या दोन्ही जिल्ह्याशी दुरान्वये कोणताही संबंध नसलेल्या डिडोळकर यांचे नाव सभागृहाला देण्याचा ठराव मांडला असे आलेल्या वृत्तावरून दिसते. डिडोळकर यांचा गडचिरोली ,चंद्रपूर शी संबंध आम्हाला आजपर्यंत तरी ऐकिवात ,वाचण्यात नाही.मग अशा व्यक्तिचे नाव गडचिरोली विद्यापीठातील सभागृहाला देण्याचे प्रयोजन काय ?
शोध घेतला असता आमच्या ज्ञानात भर पडली .डिडोळकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक आहेत म्हणतात.हे एक क्वालिफिकेशन गुरुदास यांना दिसले असावे.डिडोळकर हे बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद या तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते.
गुरुदास यांना चंद्रपूर, गडचिरोली मधील शहीद वीर बाबुराव शेडमाके,विदर्भातील जबरानजोत आंदोलनाचे जनक व गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी नारायणसिंह उईके, गडचिरोली जिल्हा निर्मिती मध्ये महत्वाचे योगदान असलेले सुविद्य स्मृतिशेष बाबुरावजी मडावी, सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष सुखदेवबाबु उईके, शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले स्मृतिशेष गो.ना.मुनघाटे,रमेश मुनघाटे,बहुजन समाजातील अन्य मान्यवर दिसले नाही .या सर्वांची नाळ गडचिरोली ,चंद्रपूर शी जुळलेली आहे.वरील सर्वांचे कार्य परिचित आहे.इतकेच नव्हे तर आदिवासी चे राजे विश्वेश्वरराव महाराज ह्यांचे स्वतंत्र विदर्भासाठीचे योगदान अमान्य करता येणार नाही.
एवढे सारे कर्तृत्ववान लोक असतांना. त्यांचा सर्वांचा अधिक्षेप करून गुरूदासाने मांडलेला ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे वाचले.सिनेट मधील एकाही सदस्यांना गडचिरोली,चंद्रपूर मधील या व अन्य कर्तृत्ववान लोकांची आठवण झाली नाही.हे आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या समजे च्या पलिकडे आहे.
सारे सिनेट सदस्य गडचिरोली ,चंद्रपूर चे असून सुद्धा.
● दुसरी धक्कादायक बाब म्हणजे काही आदिवासी कार्यकर्ते बाबुरावजी मडावी यांचे नाव द्यावे म्हणून निवेदन द्यायला गेले असता त्यांचे निवेदन स्वीकारण्याची दातृत्व सुद्धा हे विद्यापीठ दाखवू शकले नाही.त्यांना निवेदन डाकेत द्या म्हणून वाटेला लावले.
या सा-या बाबी काय दर्शवते….
गडचिरोली,चंद्रपूरातील मान्यवरांचे नाव न देणे ही त्यांची अवहेलना व अपमान आहे असे आम्ही समजतो..

गडचिरोली,चंद्रपूर मधील आदिवासी,दलित, बहुजनांनी यातून काय बोध घ्यायचा त्यांनीच ठरावावे.

तिळगुळ घ्या ,गोड बोलून आमचा अंगठा कापा.
सबब :असा ठराव तातडीने रद्द करावा.एवढेच.

प्रभू राजगडकर
दि १९ जाने. २०२३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here