कटाक्ष:शिलान्यास ते भूमिपूजन ! जयंत माईणकर

0
286

कटाक्ष:शिलान्यास ते भूमिपूजन ! जयंत माईणकर

१९८६ साली राम मंदिराचा शिलान्यास स्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता आणि पुढे या मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवणींनी देशभर रथयात्रा काढली होती. त्यामुळे संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले. वादग्रस्त जागेवरील मस्जिद अखेर कारसेवकांकडून ६ डिसेंबर १९९२ राजी पाडली गेली. या रामजन्मभूमी आंदोलनात आतापर्यंत सुमारे १०हजार निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. त्या अयोध्येतील रामजन्मभूमी वरील राम मंदिराचं भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुन्हा होत आहे.

शिलान्यास ते भूमिपूजन या ३४ वर्षांच्या काळात रामजन्मभूमी वरील राम मंदिर हा विषय सर्वोच्च स्थानावर राहिला. राम मंदिराच्या विषयाला हातात घेतल्यानंतर१९८४ साली लोकसभेत केवळ दोन सदस्य असलेल्या भाजपचे आज ३०३ सदस्य झाले आहेत. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या रूपाने दोन भाजपचे पंतप्रधान झाले आहेत. मात्र ज्या रथयात्रेमूळे भाजपच्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाली त्या रथयात्रेमध्ये या दोन्ही नेत्यांचा कितपत सहभाग होता हा एक प्रश्नच आहे.

हिंदुत्ववादी पक्षात राहून कटाक्षाने स्वतः ची सेक्युलर इमेज जपणारे वाजपेयी रथयात्रेत कुठेही सामील नव्हते. तर नरेंद्र मोदी हे तेव्हा गुजरातमध्ये केशुभाई पटेलांच्या हाताखालचे नेते होते.

ज्या रथयात्रेने देशाचं संपूर्ण राजकारण ढवळून निघाल त्या रथयात्रेचे खरे शिल्पकार स्व प्रमोद महाजन!याची कबुली खुद्द अडवणींनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. सरदार पटेलांच नाव घेत सोमनाथ ते अयोध्या या प्रवासात देशात हिंदुत्वाचे वातावरण निर्माण करण्याचा
गोबेल्सप्राणित संघनीतीचा डाव होता . आणि त्यात ते यशस्वी ठरले.

पण रथयात्रेच्या या खऱ्या दोन शिल्पकारांना त्यांच्या कामाच फळ मिळालंच नाही. आडवणींनी पंतप्रधान व्हावं आणि वाजपेयीनी राष्ट्रपती तर महाजन गृहमंत्री आणि डॉ फारूख अब्दुल्ला या काश्मिरी मुस्लिम नेत्याला उपराष्ट्रपती करून भाजपचा सेक्युलर चेहरा जगासमोर आणावा, असा प्रस्ताव तत्कालीन सरसंघचालक राजेंद्र सिंग उर्फ रज्जूभय्या यांनी वाजपेयीसमोर २००२ साली ठेवला. पण वाजपेयींनी या प्रस्तावावर सूचक मौनव्रत धारण केलं तर आडवणींनी हा प्रस्ताव अमलात आलाच पाहिजे, असा मोदीप्रमाणे आग्रह धरला नाही. आणि तेथेच आडवणीच पंतप्रधान पद हुकल. २००५ साली पाकिस्तानात जिनांच्या कबरीसमोर त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणून त्यांनी राष्ट्रपती पदही घालवल. अर्थात संघ परिवाराला हे नविन नाही. आता भूमीपूजनाच्या वेळेस तरी मोदी रथयात्रा काढून संपूर्ण देशाचं राजकारण बदलणाऱ्या आपल्या एके काळच्या गुरूंना अडवणींना महत्त्व देतात की संघ परंपरेप्रमाणे सर्व श्रेय स्वतः कडे घेतात हे पहायचे. कोरोनामुळे वयस्क अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि विश्व हिंदू परिषदेतून बाहेर फेकले गेल्याने डॉ प्रवीण तोगडिया , बजरंग दलाचे अध्यक्ष विनय कटीयार यासारखी १९९२ची बिनीची मंडळी उपस्थित राहण्याचे शक्यता नाही. बलराज मधोक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानास्पद रित्या यांनीच पक्षातून काढून टाकल होत. पण हे झाल भाजपच अंतर्गत राजकारण!

तत्कालीन गृह सचिव माधव गोडबोले यांच्या मते २२डिसेंबर १९४९ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तुत गुपचूप रामाची मूर्ती ठेऊ देणारे त्यावेळचे फैजाबादचे कलेक्टर नायर हवं पाहिले कार सेवक तर शिलान्यास करणारे राजीव गांधी हे दुसरे कारसेवक ! तसा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. पण तेही पडले नोकरशहा. शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना गृह सचिव असलेले. त्यामुळे त्यांच्याही विचाराना आपण दुर ठेऊ या!

काँग्रेस पक्ष हा हिंदूंच्या बाजूचा आहे हे दाखविण्याकरता राजीव गांधींनी शिलान्यास केला गेला हे सांगितले जाते. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालायचा निकाल डावलून मुस्लिम कट्टरपंथी लोकांना अभिप्रेत कायदा केला होता. त्यामुळे अर्थात संघ परिवाराकडून ‘ मुस्लिम धार्जिण्या’ धोरणावर सडकून टीकाही झाली होती. आपल्यावरचा हा शिक्का पुसण्यासाठी आणि काँग्रेस हिंदूंच्याही जवळ आहे हे दाखविण्याकरता राजीव गांधींनी शिलान्यास केला अस बोललं जातं.

एक प्रकारे शिलान्यास करून राम मंदिराला राजीव गांधींनी मान्यताच दिली होती.मात्र दोन धर्मातील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयाने सोडवावा अशी रास्त भूमिका त्यांनी घेतली. मग अस असताना रथयात्रा काढून धार्मिक भावना पेटवत वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडून शेवटी सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल आल्यानंतरच पुन्हा भूमिपूजन करण्याची गरज काय?

कारण संघ परिवाराला राम मंदिर हा मुद्दा जिवंत ठेऊन त्याच्या भरवशावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची होती आणि त्यात ते यशस्वी ठरले.

आजच्या उझबेकिस्तानातील समरकंद प्रांतातील फरगणा या भागातील एक राजा बाबर खुशकी च्या मार्गाने भारतात आला. भारतात तोफांचा वापर करणारा पहिला राजा बाबर. मुघल वंशाची दिल्लीत स्थापना करणाऱ्या बाबराच्या मीर बाकी नावाच्या सरदाराने १५२८ साली अयोध्येतील रामजन्मभूमी वरील मंदिर पाडून बाबरी मस्जिद उभारली. आणि त्याचा सूड ४६४ वर्षानंतर ६ डिसेंबर १९९२ला मस्जिद पाडून तथाकथित रित्या घेतला गेला. विज्ञान युगात मध्य युगीन कालखंडात घडलेल्या घटनेचा बदला! आणि एकविसाव्या शतकात संगणक युगात त्या मंदिराचं भूमिपूजन!

या मंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रेच्या दरम्यान देशभर दंगली घडल्या. अगदी गुजरात मध्ये २००२ साली झालेली गोध्रा दंगल सुद्धा राम मंदिराशीच संबंधित.

हे मंदिर संघ परिवार म्हणतो त्याप्रमाणे हिंदूंच्या अस्मितेच प्रतिक आहे की हिंसेच! संघाच्या अजेंड्यावर केवळ अयोध्या नसून काशी , मथुरा इतकंच नव्हे तर भारतातील तीन हजार मशिदी आहेत असं सांगितलं जातं. अयोध्येकरता जर इतका हिंसाचार तर पुढे किती हिंसा होईल? आणि गोध्रा आणि दिल्ली दंगलीमुळे हे दाखवून दिलं आहे की सत्तेवर असणारा भाजप हा सत्तेवर नसणाऱ्या भाजपपेक्षा जास्त धोकादायक असतो.

देश कोरोनासारख्या महामारीतून जात असताना आणि लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना राम मंदिराच भूमिपूजन करण हे सर्वस्वी चूक आहे. देशातील ८० कोटी लोकांना नोव्हेंबर पर्यंत धान्य पुरवलं जाईल असा खुद्द पंतप्रधानांनी सांगितले आहे.त्यामुळे त्यांच्या अन्नधान्याची,आरोग्याची किंवा रोजगाराची सोय या मंदिरामुळे होणार आहे का? की याचा फायदा बिहार आणि बंगालमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला होईल किंवा त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भूमीपूजनाची तारीख तर निवडली नाही ना अस वाटत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here