आष्टीत अवैध दारू विक्रेता व नियमबाह्य सावकाराची दबंगगिरी!

0
890

आष्टीत अवैध दारू विक्रेता व नियमबाह्य सावकाराची दबंगगिरी!

पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?… यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष

परिसरात दबक्या आवाजात खमंग चर्चेला उधाण…

गडचिरोली, दि. ७ जुलै : आष्टी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रीला चांगलाच ऊत आल्याचे चित्र आहे. याचबरोबरच अवैध सावकारीलाही सुगीचे दिवस आले असून बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. आष्टी पोलीस ठाणे अंतर्गत अवैध व्यवसाय बरेच फोफावले असून अवैध धंदेवाईक प्रशासनावर शिरजोर झाल्याचे दिसून येते. यावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेतील मनुष्यबळ कमी असल्याने हतबल ठरत आहे का? पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक सोयीस्कर दुर्लक्ष केल्या जात आहे. अशा एक ना अनेक चर्चा स्थानिक जनतेत दबक्या आवाजात रंगल्याचे दिसून येते.

असाच एक निंदनीय प्रकार आष्टीत राजरोसपणे कायद्याला न जुमानता सुरु आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून अवैध दारू विक्री करून करोडोच्या घरात वाममार्गाने अमाप पैसे कमविलेल्या मातब्बर अवैध दारू व्यावसायिकांकडून नियमबाह्यरित्या अवैध सावकारीचा गोरखधंदा सुरु असून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आष्टीत बिनभोभाटपणे सुरु आहे. या विक्षिप्त धंदेवाईकाडून ठाण्यात दाखल वैयक्तिक गुन्ह्यात अडकलेले नागरिक व पोलीस यंत्रणा यात मध्यस्तीची भूमिका वटवून मांडवली केली जाते. मग ‘या’ व्यक्तीवर पोलीस मेहरबान का? वर्दीतच काही धागेदोरे आहेत का? अशी दबक्या आवाजात खमंग चर्चा जनतेत आहे.

‘या’ व्यक्तीकडून कायद्याला फाटा देत अवैधरित्या सावकारीचा धंदा केला जातो. लॉकडाउन काळात हाताला काम नसल्याने सामान्य जनता अगोदरच हतबल झाली असून हातावर आणून खाणाऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे. अशातच शासनाकडून कर्ज हप्ते व घर भाडे स्थगिती देण्याचा प्रश्न विचाराधीन असला तरी मात्र या व्यक्तीकडून बँकेपेक्षाही जास्त चक्रवाढ व्याज लावत धाक दाखवून गरजेपोटी पैसे घेतलेल्या सामान्य नागरिकाच्या घरच्या वस्तू उचलणे, भाडेतत्वावरील टट्टूच्या साहाय्याने दमदाटी करणे अशी दबंगगिरी सुरु आहे. अशा सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून धमकावले जाते. शिवाय अशा दबंगगिरी करणाऱ्या व्यक्तीला पोलीस यंत्रणेकडून केले जाणारे सहकार्यही संशोधनाचा विषय आहे.

पोटाचा चिमटा घेत जीवन कंठणाऱ्या आर्थिक विवंचनेच्या गर्तेत झोकल्या गेलेल्या गोरगरीब सामान्य जनता आपली गरज भागवण्यासाठी कर्ज स्वरूपात पैसे घेतात. मात्र ऐनवेळी हाताला कामधंदा नसल्याने परतफेडीस उशीर झाल्यास या सावकारागिरी करणाऱ्या इसमाकडून विनाकारण तगादा लावून शारीरिक व मानसिक पिळवणूक केली जाते. या सावकाराच्या पाशवी जाळ्यातून सुटका होणार का…? या अशा असंख्य कुटुंबांनी अखेर दाद मागायची कोठे…? हा एक गहन यक्ष प्रश्न आष्टी वासियांना पडला आहे. आजवर आपण अभद्रनीती बघितली आहे. मात्र येथे या इसमाकडून अभद्रनीतीचा कळसच गाठल्या गेल्याचे चित्र परिसरात आहे. अशाच अभद्र व अवैध मार्गाने साचलेल्या पैशाने व्याजाचा व्यवसाय थाटला असून प्रशासनाच्या आशीर्वादानेच कि काय हा गोरखधंदा बोकाळला आहे. यातून आष्टी येथे दमदाटीने धमकावून व्याजासह ‘या’ सर्वपरिचित व्यक्तीकडून सामान्य जनतेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्या जातो. यामुळे गुंडप्रवृत्तीला चालना मिळत असल्याने भविष्यात खूनखराबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता बळावली आहे. या व्यक्तीच्या पोलीस प्रशासनातील साट्यालोट्यामुळेच तर या व्यक्तीवर कारवाई होत नाही ना? “तो” कायद्याच्या परिघातून मोकाट कसा हा यक्ष प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. यावर प्रशासन कशारीतीने लक्ष घालेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी आष्टी शहराला अवैध धंद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या कार्यकाळात व्यवस्थितरित्या अवैध धंद्यांना काही प्रमाणात आळा बसला व अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले होते. मात्र त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर आष्टी येथे नव्याने ठाणेदार रुजू झाले. मात्र नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराच्या कार्यकाळात अवैध दारू विक्रीला जरब न बसता ते धंदे सुरूच असल्याचे दिसून येत असल्याने यावर पूर्णविराम लागेल का हा प्रश्न आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतील, आणि या अवैध दारू विक्रीच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला मोकळा श्वास घेता येणार का? हे येणारा काळच ठरवेल…! मात्र सध्या गोरगरीब जनतेकडे पैश्याचा तगादा लावल्याने लॉकडाउन काळात हातात पैसा नसल्याने जीव मुठीत घेऊन आमच्याशी कधी काय होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. सामान्य जनतेतून ऐकायला येत असलेल्या या आर्त हाकेला दुजोरा मिळून ‘त्या’ गब्बर सावकारी करणाऱ्या व्यावसायिकावर कायद्याचा निर्बंध लागेल का…?

लॉकडाउन काळात गरजेपोटी पैसे घेतलेल्या गरीब जनतेला खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ‘त्या’ स्वयंभू सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या दहशतीखाली जीवन कंठावे लागत आहे. दुबार पेरणीमुळे अल्पभूधारक शेतकरी आधीच हतबल झाला आहे. ढासळलेली नीतिमत्ता, अनैतिक हथकंडे व दुर्गम विचारांची खोलवर रुजलेली पाळेमुळे यामुळे या पाशवी जाचातून सुटका होऊन गरिबांना न्याय मिळेल का हा गहन प्रश्न आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेतल्यास आष्टी सारख्या छोट्याशा शहरातून अवैध रीतीने लाटलेल्या करोडो रुपयांचे मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत सूत्रांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भविष्यात आष्टीतील परिस्थिती या मात्तबर अवैध दारू विक्रेता व नियमबाह्य अट्टल सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडून चिघळणार नाही याची गंभीरतेने दखल घेत वेळीच आवर घालण्याची नितांत आवश्यकता पोलीस प्रशासनापुढे आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here