लॉकडाऊनच्या नावाखाली सुगंधीत तंबाखूची साठेबाजी

0
528

लॉकडाऊनच्या नावाखाली सुगंधीत तंबाखूची साठेबाजी

गोंडपिपरी : शासनाने सुगंधीत तंबाखुची साठवणूक, विक्री व वितरण प्रणालीवर राज्यात 20 जुलै 2012 रोजी कायद्याने बंदी आणली असतानाही तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखूची सर्रास विक्री व साठवणूक होत असल्याची माहिती असून लॉकडाऊनच्या भीतीपोटी अनेक ठोक विक्रेते काही ठराविक ठिकाणी शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साठवणूक करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आरोग्यास अपयकारक असणाऱ्या सुगंधित तंबाखूवर शासनाने कायद्याने बंदी आणली आहे. बंदी असतानाही तालुक्यात मोठया प्रमाणात सुगंधित तंबाखूची साठवणूक व विक्री होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुगंधित तंबाखूचे सेवन लहान्यांपासून मोठ्यापर्यंत करीत असल्याने सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध घालण्यात यावा, यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या असताना सुगंधित तंबाखु तस्कर कायद्याला जुमानत नसल्याचे विदारक चित्र आहे. परत लॉकडाऊनच्या भीतीपोटी अवैध धंदे वाईकांनी डोके वर काढले असून सुगंधित तंबाखु तस्कर तालुक्यातील शहर, ग्रामीण भागात आपल्या विक्रेत्यामार्फत मोठ्या प्रमाणात साठवणूक करीत आहेत. लॉकडाऊन काळात चढ्या दराने अवैध मार्गाने सुगंधित तंबाखुची विक्री करून लाखो रुपये कमावणे व आपल्या शोकीन ग्राहकांना लुबाडणे यातून अवैध तस्कर सज्ज झाले असल्याचे समजते. यावर अन्न व औषधं प्रशासन (एफ. डी. ए.) विभागाने योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे. सुगंधित तंबाखुचे सेवन अनेक तरुण युवक, महिला करीत असल्याने येणाऱ्या भावी पिढीबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, संघटनानी चिंता व्यक्त केली असून सुगंधित तंबाखु व अवैध मार्गाने होणारे व्यापार यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी जोर धरून लागली आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली साठवणूक याबद्दल प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here