आंबेडकरवादी मुलुखमैदानी तोफ विसावली ! डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन !
महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, व्यासंगी लेखक,चतुरस्त्र वक्ते,आंबेडकरवादी विचारविश्वातील दैदिप्यमान तारा डॉ.भाऊ लोखंडे यांचे आज पहाटे निधन झाले आहे. डॉ.भाऊ लोखंडे हे आंबेडकरवादी समाजातील एक असे व्यक्तिमत्व होते की, ज्यांच्याकडे इतिहास,साहित्य,प्राचीन वांग्मय इत्यादी विविध ज्ञानशाखांचा प्रचंड व्यासंग होता. त्यांच्या व्यक्तीमत्वात ठासून भरलेली असीम विद्वत्ता प्रभावी भाषेत लोकांच्या मेंदूपर्यंत पोहचविण्याची क्षमता डॉ.भाऊ लोखंडे यांच्या लेखणी आणि वाणीमध्ये होती. डॉ.भाऊ लोखंडे हे ज्ञानाचा असा बोधिवृक्ष होते की, जो कायम वादळवाऱ्यांशी मुकाबला करीत, भक्कमपणे उन्हात राहून आपल्या संपर्कात असल्या नसलेल्या पांथस्थांवर शीतल छायेची पखरण करीत होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरवादी विचारविश्वाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

डॉ.भाऊ लोखंडे हे बुध्द व आंबेडकरी विचाराचे भाष्यकार, ओघवते वक्ते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ज्ञानाचा प्रचंड व्यासंग असलेले भाऊ हे विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीत सक्रीय होते. त्यानी एकेकाळी रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची धुरा सांभाळली होती. त्यांनी ‘ मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर संशोधन करून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यानंतर, पाली प्राकृत विभागाचे प्रमुख, विद्यापीठातील आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांचे, आशियातील बौद्ध धर्म, वेदकालीन गोमांस भक्षण,थेरगाथा विवेचन,उदान, वज्रसूची भाषांतर, अश्वघोष लिखित बुद्धचरित ग्रंथाचे भाषांतर असे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. याशिवाय विविध नियतकालिकात, वर्तमानपत्रात शेकडो लेख त्यानी लिहिले. त्यानी दिलेल्या व्याख्यानांची मोजदाद करता येणार नाही इतक्या संख्येने त्यानी भारतभर फिरून आंबेडकरी चळवळीच्या प्रसारासाठी व्याख्याने दिली आहेत.
ते आंबेडकरी चळवळीतील सर्व लहान-मोठ्या राजकीय नेत्यांच्या संपर्क आणि सानिध्यात असत. बसपा संस्थापक मा. कांशीरामजीपासून ते इतर सर्व लहानथोर आंबेडकरी नेते तसेच इतर राजकीय पक्षातील नेते यांच्यापर्यंत त्यांचा संपर्क आणि संवाद होता. एक विचारवंत म्हणून त्यांना सर्वच राजकीय नेत्यांमध्ये,विविध क्षेत्रातील विद्वान विचारवंत आणि लेखकांमध्ये त्यांना अत्यंत मान-सन्मान होता. ते जसे आंबेडकरी राजकीय चळवळीतील नेत्यांच्या संपर्कात राहिले तसे ते इतर विचारांच्या राजकीय नेत्यांच्याही संपर्कात आणि प्रेमात राहिले. पण मात्र असे असताना सुध्दा त्यांनी आपल्या विचार व तत्वांशी कधीही फारकत घेतली नाही वा तडजोड केली नाही. त्यामुळे भाऊंची ओळख ही सर्वत्र एक आंबेडकरी विचारवंत, बुध्द धम्माचे गाढे अभ्यासक, लेखक, साहित्यिक अशीच उजळून निघाली. आपल्या प्रखर वाणी आणि स्पष्ट बोलण्यामुळे ते आंबेडकरी चळवळीतील काही आपले सहप्रवासी यांच्यासाठी एक आव्हान ठरले तर कधी आपल्याच सहकाऱ्यांमध्ये अप्रिय झाले. पण सर्व सामान्यात त्यांचे असलेले स्थान, दबदबा, आदर मात्र काही कमी झाला नाही. त्यांचे एकंदरीत कार्यकर्तृत्व पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळण्याच्या योग्यतेचे आहे.
डॉ. भाऊ लोखंडें म्हणजे आंबेडकर चळवळीची मुलूख मैदानी तोफ होती. ही तोफ आपल्या प्रत्येक भाषणातून मग तो कोणताही समारंभ, कोणतीही सभा, परिषद, परिसंवाद असो त्यात हिंदू व ब्राम्हणी धर्मशास्त्रावर त्यांच्या अनितीवर महाप्रचंड ताकदीने गरजत आणि बरसत असे हे अनेकांनी ऐकले असेल. डॉ. भाऊ लोखंडें सामजिक प्रबोधन,सरकारी दहशतवाद,ब्राह्मणी वर्चस्ववाद याविरुद्ध केवळ वाणीनेच नाही तर कृतीनेही मैदानात उतरायचे. नागपुर शहरात आयोजित धरणे-निदर्शने आंदोलनात भाऊंचा सक्रीय सहभाग कायम असायचा. रिपब्लिकन जनतेचे ऐक्य व्हावे यासाठी त्यांनी कोणत्याही मान अपमानाची पर्वा न करता चिल्लर पुढाऱ्याचेही उंबरठे झिजविले होते.अशा या व्यासंगी आणि कृतीशील विद्वानाच्या निधनाने आंबेडकरी विचारविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या कृतीकार्यास पुन्हा एकदा विनम्र अभिवादन