पुस्तके वाचण्याच्या वयात चेहरे वाचत बसू नका…

0
129
पुस्तके वाचण्याच्या वयात चेहरे वाचत बसू नका…
प्रेम नावाच्या दोन अक्षराच्या शब्दाने कित्येक लोकांचे जीवन सुंदरपणे घडविले आणि फुलविले आहे. पण आजकालच्या तरुण-तरुणींना प्रेम घडवत कमी आणि बिघडवत जास्त असल्याचे चित्र समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी सकाळी कोणतेही वर्तमानपत्र उघडले की, प्रेमामध्ये किंवा प्रेमासाठी एका तरी तरुण-तरुणीची हत्या किंवा आत्महत्येची बातमी हमखास आपल्याला दिसते. खरंच आयुष्य इतकं स्वस्त झाले आहे का? ज्या वयामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आयुष्य घडवायचे असते त्या वयात आमचे तरुण मित्र-मैत्रिणी एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःचे सुंदर असे आयुष्य संपवत असतील तर ही दुर्दैवाची आणि चिंताजनक बाब आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
जीवनात प्रेम करू नये असे नाही. परंतु आज प्रेम करण्याची पद्धतही काळानुसार बदललेली दिसते आहे. काही दिवसापूर्वी एका व्यावसायिकाच्या घरी बसलो होतो. त्यांनी चिंता व्यक्त केली की, आम्ही दररोज रात्री आमचे दुकान बंद करून घरी जात असताना काही जोडपे आम्हाला रस्त्यावरील एखाद्या झाडा-झुडपातून बाहेर निघतांना दिसतात. झाडाझुडपात जोडपे काय करायला जात असतील हे आता वेगळे सांगायला नको आणि हल्ली आई वडिलांना सुद्धा हे विचारायला वेळ नाही की, आपला मुलगा/मुलगी रात्रीच्या वेळी कुठे जातात. मग एखाद्या वेळी असे काही प्रसंग घडतात की त्यावेळी आई- वडिलांना डोके धरून बसल्याशिवाय आणि पश्चातापाशिवाय पर्याय राहत नाही.
ती किंवा तो भेटला नाही म्हणून स्वतःला संपविणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण-तरुणींनी स्वतःचे सुंदर असे आयुष्य प्रेमासाठी बरबाद करत आहेत आणि अक्षरशः आपल्या सोबत आपल्या आई-वडिलांच्या कित्येक स्वप्नांचाही चुराळा करत आहेत आणि ही बाब आजच्या घडीला खूप भयंकर चिंताजनक आहे. त्यामुळे प्रेम करू नका असे मी अजिबात म्हणणार नाही. परंतु स्वतःला ओळखा. आपल्या स्वप्नांचा विचार करा. आपल्या आई वडिलांचा विचार करा. आपण आपला अमूल्य असा वेळ कुणासाठी देत आहोत हेही समजून घ्या. कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही आणि हातात काही नसेल तर सोबत असलेली व्यक्ती सुद्धा आपल्याला भेटत नाही हेही तितकेच खरे.
प्रेमामध्ये दिशाहीन होऊन इकडे तिकडे पसरण्यापेक्षा वेळ असतानाच स्वतःला सावरावणे कधीही चांगले. कारण एकेकाळी आपआपल्या क्षेत्रामध्ये नावाजलेली अनेक तरुण मंडळी या प्रेमाच्या चक्रव्युहामध्ये अशी काही अडकली की, आज सन्मानाने चारचौघात उभे सुद्धा राहत नाही. ज्यांचा समाजामध्ये कायम बोलबाला होता ते हल्ली कुठेही दिसत नाही. प्रेमामध्ये मिळालेल्या विरहात एकेकाळची नामवंत हस्ती असलेल्या तरुण मंडळींनी जिंदगी सस्ती करून दारू आणि खर्रासोबत दोस्ती केली. ज्यांच्या वाणीतून कधीकाळी सुंदर असे मंत्रमुग्ध करणारे विचार बाहेर यायचे त्यांच्याच तोंडातून आज व्यसनाची दुर्गंधी येते. त्यामुळे कोणतेही व्यसन पडवडते पण माणसांचे नको. कारण माणसाला माणसांचे लागलेले व्यसन हे जगातील कोणत्याही व्यसनापेक्षा फार खतरनाक असते.
परवा वृत्तपत्र वाचत असतांना एक बातमी दिसली. बातमीचे शीर्षक होते. “घरच्यांनी प्रेमविवाह करण्यास नकार दिल्याने जोडप्यांनी केली आत्महत्या” बातमीच फक्त टायटल वाचले आणि विचार केला की, आजचे तरुण जगत कुणासाठी आहेत. जन्मदात्यांसाठी, समाजासाठी की काल परवा-भेटलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी? या प्रश्नाचे उत्तर शोधतांना एक सत्य गोष्ट आठवली. माझ्या एका संदीप नावाच्या मित्राचे एका मुलीवर खूप प्रेम होते. दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे. एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहायचे. तासंनतास बोलत बसायचे. चुकून एखाद्या दिवशी कॉल किंवा मॅसेज आला नाही तर दोघेही बैचेन व्हायचे. त्याला ती आणि तिला तो सर्वकाही वाटायचा. दिवसामागून दिवस जात होते. हळूहळू एकमेकांमध्ये ते एवढे गुंतून गेले की, काहीही झाले तरीही नातं तुटणार नाही असे त्यांना वाटायचे, भविष्याचे स्वप्न रंगवू लागले पण जे नको व्हायला तेच झाले. दोघेही करियरपासुन मात्र भटकले.
तीचे लग्नाचे वय झाले, तिला बघायला पाहुणे येत होते आणि इकडे यानेही पंचवीशी ओलांडलेली होती. काय करावे, काय नाही? काही सुचेनासे झाले. प्रेम तर आहे पण घरी सांगणार तरी कसे? या विचाराने दोघेही चिंताग्रस्त झाले. कारण ‘आमचे प्रेम आहे आम्हाला लग्न करायचे आहे’ असे तर म्हणता येत नव्हते. बेरोजगार म्हणून सांगितले तर आधीच पत्ता कट होणार होता. मग करायचे काय? दोघासमोर प्रश्नचिन्ह? दोघेही विचार करत असतानाच तीचे लग्न जुळले आणि लग्न थाटामाटात झाले सुद्धा. इकडे मात्र याचे मन तुटले. मग काय? तो आजही तिच्या आठवणीमध्ये आई-वडिलांच्या, स्वतःच्या स्वप्नांचा चुराळा करत वणवण भटकत आहे. त्यांच्या प्रेमामध्ये नाही कुणाचे करियर बनले आणि नाही स्वतःला तो सिद्ध करू शकला. ज्या स्वप्नांना घेऊन तो शहरात आला होता ती स्वप्ने आज काळासोबत गहाळ झाली. याचा अर्थ असा नाही की, त्याच्याकडे टॅलेंटची कमी होती पण म्हणतात ना,  मोबाईल असून चालत नाही तर त्यात चार्जिंग सुद्धा असायला हवी. अगदी तसच टॅलेंट असून चालत नाही त्याचा उपयोगही करता येणे आवश्यक आहे. पण सतत तो तिच्या विचारात राहत असल्याने आजही बेरोजगारचा शिक्का लावून गावभर हिंडतो आहे.
मग विचार करा मित्रांनो, ज्या विश्वासाने आपले आई-वडील आपल्याला बाहेर ठिकाणी शिकायला पाठवितात. वनमजुरी करून आपल्याला जगवितात, घडवितात त्याच आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आज तरुणांना नसेल तर मग जगून उपयोग तरी काय?  प्रेम आंधळं असते म्हणे, पण एवढे आंधळं प्रेम? कधी कुणावर होऊ ही नये आणि कुणी करू ही नये. कारण जिथे आई- वडिलांच्या स्वप्नापेक्षा तिचे/त्याचे स्वप्न पडत असतील आणि करिअर बनविण्याच्या वयात करियरकडे दुर्लक्ष होत असेल तर असे प्रेम न केलेले बरे! कारण तरुणपणी झालेले प्रेम म्हणजे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आई-वडिलांना फसवून जिंदगी बरबाद करणे होय.
खरंतर आपले आई-बाबा या आशेवर असतात की माझा मुलगा/माझी मुलगी शिकून, अभ्यास करून खूप मोठी झाली पाहिजे. वडिलाला वाटते कि, माझा मुलगा शहरात जाऊन वाचनालयात तासनतास बसून अभ्यास करत असेल पण इकडे होत काय? आज कित्येक मुले वडिलांच्या पैश्याचा गैरवापर करून प्रेमाच्या नावाखाली आयुष्याचा सत्यानाश करतांना आपल्याला दिसतील. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे एवढंच सांगणे आहे कि, प्रेम करू नका असे मी अजिबात म्हणणार नाही पण प्रेम करत असताना किंवा कुणाच्या जवळ जातांना आयुष्याचा कचरा होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कारण तरुण वयामध्ये प्रेम करत असताना आपल्याला काही वाटत नसते. कारण सुख, समाधान, आनंद, मोह यामध्ये आपण बरेच खुश असतो पण पुढे जसे वय वाढत जाते तशी करिअरची चिंता वाटायला लागते आणि ज्यावेळी हातामध्ये काहीच राहत नाही तेव्हा मग आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. पण तेव्हा आपल्या हातातून वेळ गेलेली असते. आपली वाट चुकलेली असते. काय करावे कळत नाही. यामुळे ताणतणाव वाढतो. तणावातून नको ते विचार मनामध्ये येतात आणि बरबादीकडे आपले एक पाऊल आपण टाकतो. त्यामुळे तरुण वयामध्ये कुणाच्या तरी प्रेमात पडण्यापेक्षा आणि कुणाचे तरी चेहरे वाचत बसण्यापेक्षा पुस्तके आणि समाज वाचणे कधीही चांगले. कारण यातून किमान चांगला माणूस तर घडेल…
सुरज पी. दहागावकर, चंद्रपूर
 मो. न. 8698615848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here