डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

0
547

डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव व अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान

 

 

कोरपना/प्रवीण मेश्राम

कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हेमलकसा येथील जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना व सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील ज्ञानार्चना संस्थेमार्फत अपंग कल्याणासाठी कार्यरत असणा-या अर्चना मानलवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर मागील ३५ वर्षे निशुल्क उपचार करत असून पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना त्यांनी बरे केले आहेत. ग्रामसभेने त्यांना ‘डाॅक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी दिली. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ सदर पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप व प्राचार्य डॉ.अनिल मुसळे यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सारख्या अतिदुर्गम, नक्षलप्रभावित भागात डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिम माडिया-गोंड समाजासाठी आरोग्य व शिक्षणाचे काम करत आहे. मागील पाच दशकातील त्यांच्या लोकसेवेने जगात आदर्श निर्माण केला. थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या सेवेचा वारसा त्यांची तिसरी पिढी
चालवत असून कल्याणकारी समाजनिर्मीतीचे आमटे कुटुंब दिपस्तंभ आहेत. चंद्रपूरच्या समाजसेविका अर्चना मानलवार स्वत: ९०% अपंग आहेत. ज्ञानार्चना संस्थेच्या माध्यमातून अपंगाचे पुनर्वसन करतात. अपंग महिला-पुरुषांना प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनवण्याचे धडे देत सक्षम करण्याचे काम त्या निष्ठेने करत आहे.

२०१२ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता, फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते. यंदाचा दिव्यग्राम महोत्सव ७ नोव्हेंबरला बिबी येथे आयोजित असून शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप, डॉ.अनिल मुसळे, डॉ.गिरीधर काळे, सविता काळे, स्वागताध्यक्ष संतोष उपरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, ॲड.दीपक चटप, गणपत तुम्हाणे, विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, हबीब शेख, सतिश पाचभाई, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, कार्तिक मोरे, निलेश झुरमुरे, सुरेंद्र मुसळे, शुभम डाखरे, सुरज लेडांगे, देवानंद पिंपळकर, सचिन आसूटकर, राजेंद्र सलाम, महेश नाकाडे, इराणा तुम्हाणे, विशाल अहिरकर, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, आकाश चटपल्लीवार, चंपत तुम्हाणे, गोपाल मडावी, आकाश उरकुडे, गणपत मडकाम, सुरज मडावी, महेश राठोड यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here