रेती तस्करीचा ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडला

0
235

रेती तस्करीचा ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडला

नलफडी येथील प्रकार ; महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या नलफडी महसुली नाल्यात रेती तस्करांचा घुमाकूळ सुरू असून, मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. रेती तस्करांचा हा गोरखधंदा मागील काही महिन्यांपासून राजरोसपणे सुरू आहे. दरम्यान, रेती तस्करीमुळे रस्त्याची चाळण होत असल्याने नलफडीच्या ग्रामस्थांनी नाल्यात पाळत ठेवून तस्करीचा ट्रॅक्टर पकडला. त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी फोन केला; पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर गावकऱ्यांनी तस्करीचा ट्रॅक्टर पोलिसांच्या स्वाधीन केला.

महसूल कर्मचाऱ्यांच्या याच दुर्लक्षितपणामुळे पाणी मुरत असल्याची शंका निर्माण होत आहे. नलफडी गावालगतचा महसुली नाला जंगलातून येत असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे.

या नाल्यातील रेती बारीक असल्याने घर बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे राजुरा, सातरी, विहीरगाव, मूर्ती, कोहपरा व चुनाळ्याच्या ८-१० तस्करांनी नाल्यात हल्लाबोल केला आहे. दररोज, या नाल्यातून ५० ते ६० ब्रॉस रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. याकरिता नाल्यात मोठमोठे खड्डे खोदण्यात येत आहे. सुरुवातीला तस्कर शाळेच्या मागे असलेल्या रस्त्यातून रेतीची वाहतूक करीत होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांनी पशु दवाखान्यालगतच्या रस्त्याने वाहतूक सुरू केली. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर संतापलेल्या गावकऱ्यांनी नाल्यात पाळत ठेवत ट्रॅक्टर पकडला. त्यानंतर गावकऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी फोन केला; पण त्यांनी याकडे कानाडोळा केला. अखेर गावकऱ्यांनी पोलिसांकडे ट्रॅक्टर सुपूर्द केला. पकडलेला ट्रॅक्टर राजुऱ्याचा असून एम. एच. ३३- जी- ००३८ हा क्रमांक असल्याचे बोलले जात आहे. यावेळी नाल्यात ३ ते ४ ट्रॅक्टर होते; पण भनक लागताच त्यांनी पोबारा केला. गावकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here