कोळसा चोरी आणि वाढती गुन्हेगारी…

600

कोळसा चोरी आणि वाढती गुन्हेगारी…


राजुरा (चंद्रपूर) : औद्योगिक, वनसंपदा, खनिज संपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून जगभरात चंद्रपूर जिल्ह्याची ख्याती आहे. जिल्ह्याला गोंड राजांचा इतिहास व वारसा लाभला आहे. चंद्रपूर जिल्हा पुन्हा एका नावाने जगात प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे “ब्लॅक गोल्ड सिटी”. जिल्ह्यात उद्योग कारखाने विस्तारलेले आहे. यात प्रामुख्याने वेकोलीच्या कोळशाच्या खाणी आहेत. सिमेंट उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे ते म्हणजे “प्रदूषण”.

याच जिल्ह्यात खनिज संपत्तीने नटलेला, एका काळच्या निजामशाहीतून स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर मुक्त झालेला तालुका म्हणजे “राजुरा तालुका”. या तालुक्याला काळया सोन्याच्या खाणी आहेत. या तालुक्याच्या भूगर्भात मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचा कोळसा दडलेला आहे. तसा पूर्वीपासूनच शांत व संयमी राजुरा तालुका आता हळूहळू समुद्राला जशी भरती येते तसा खवळायला लागलाय. शांत व संयमी असलेला राजुरा तालुका पार अवैध धंद्यांनी बहरत चाललाय. स्थानिक प्रशासनिक अधिकारी व राजकारण्यांच्या वरदहस्ताने की काय मात्र येथील युवक पुरता भरकटून गेलाय.

वेकोलीच्या खदानीचा उगम ब्रिटिश राजवटी पासून सुरू झाला. परंतु कोळशाच्या उत्खननामध्ये खरी क्रांती ही सन 1950 नंतर सुरू झाली. 1960 आणि 1970 च्या दशकात कोळशाला मोठ्या प्रमाणात तेजी आली. स्थानिकांच्या शेती अधिकृत करून त्यांना नोकरीमध्ये सामावून घेतले जात होते. मराठी माणूस मनाने हळवा असल्यामुळे अंडरग्राउंड खाणीत परप्रांतीय लोकांचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला. यात उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य परंपरेतील लोकांचा समावेश आहे. स्थानिक मराठी शेतकरी, कष्टकरी माणूस मात्र दूर लोटला गेला. आणि अलीकडच्या काळात येथील राष्ट्रीय संपत्ती कोळसा खाणीतून अलगदपणे चोरी होण्यास सुरवात झाली. कोळसा तस्करीत वेगवेगळे हतकंडे उपयोगात आणून बिनदिक्कतपणे चोरी सातत्याने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. हि राष्ट्रीय संपत्ती अवैध रीतीने विक्री होत असताना यावर अंकुश मात्र लागताना दिसत नाही. सबंधित विभाग मूर्च्छित पडल्याची प्रचिती सर्वसामान्यांना येऊ लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी असून या खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. या अगोदरही कोळसा चोरी करणाऱ्या टोळीतील काही म्होरक्या असणाऱ्यांचे हत्याकांड घडले असून या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला होता. मात्र आता कोळसा चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सक्रिय असलेल्या टोळीकडून शस्त्रांचा धाक दाखवून कोळसा वाहून नेणारे वाहने गायब करण्यात येत आहेत. मात्र यावर अंकुश लागताना दिसत नसल्याने सुरक्षारक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने नेमके पाणी कोठे मुरत आहे…? मिलीभगत कोणाची…? मास्टरमाईंड कोण…? हा संशोधनाचा महत विषय उजेडात आला आहे.

अवैध मार्गाने व दमदाटी, शस्त्रांचा धाक दाखवून गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके कोळसा चोरी प्रकरणात सक्रिय झाले असून पैसा कमविण्याची नवीन शक्कल लढवीत असल्याचे भयंकर वास्तव जिल्ह्यात समोर आले आहे. मात्र यावर कायमस्वरूपी आळा कधी बसेल…? हे सुजाण नागरिकांच्या समजण्या पलिकडचेच अनाकलनीय कोडे आहे.

गुन्हेगारीचे रोपटे कोणी लावले व त्याला खत पाणी आपल्या स्वार्थाच्या सोयीनुसार राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी देत राहिले असे म्हणण्याची वेळ ओढवली आहे. गुन्हेगारीचा या कोळशाच्या खाणीत जन्म झाला. आणि त्यातून गँगवार देखील घडले. तरी मात्र यावर अंकुश लावण्यात प्रशासनाला अपयश आले हेच म्हणावे लागेल.

बल्लारपूर वेकोली क्षेत्र अंतर्गत एकूण नऊ खाणी येतात. त्यात आठ खुल्या खाणी व एक अंडरग्राउंड खाण येते. यात खुल्या खदानीत बल्लारपूर, धोपटाळा, सास्ती,गोवरी विस्तारित, पोवनी, गोवरी डीप (पांढरपौनी रेल्वे सायडिंग), आणि एक बल्लारपूर अंडरग्राउंड खदानीचा समावेश आहे. यात राजरोसपणे दिवसाढवळ्या व रात्री चोरीचे प्रमाण वाढले आहे. आणि कोळसा चोरीच्या चढाओढीतील स्पर्धेत काही लोकांचे बळी सुद्धा गेले असून यातून पोलीस प्रशासनाने काहीच बोध घेतला नाही का…? या उलट गुन्हेगारांना सुरक्षा कवच प्रदान केले आहे का…? सुरज भवरे हत्याकांड असो की राजू यादव हत्याकांड. पोलीस प्रशासन व वेकोली प्रशासनाला तीळ मात्र फरक पडला असे दिसत नाही. त्यांना फक्त आपापल्या मिळणाऱ्या मासिक तुकड्यांची चिंता आहे. या सर्व होणाऱ्या असंघटित व संघटित गुन्हेगारीला राजकीय नेते, वेकोली प्रशासन, पोलीस प्रशासन, आर.पी.एफ हेच जबाबदार आहेत हे प्रकर्षाने या सर्व घटनांमधून व अलीकडील बंदुकीच्या धाकावर लुटलेल्या कोळसा प्रकरणावरून जाणवते. या प्रकाराला आळा न बसल्यास यापुढे ही जे काही अप्रिय घटना घडेल त्यालाही सदर विभागच सर्वस्वी जबाबदार असणार आहे. या बेईमानीच्या पैशाची एवढी नशा चढली आहे की आपले कर्तव्य व ब्रीदवाक्य सबंधित प्रशासन विसरले आहे, असे म्हणण्याची नामुष्की सर्वसामान्य जनतेवर आली आहे…

advt