छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ शिवस्मारकासाठी तात्काळ जागा निर्धारित करा – आ. किशोर जोरगेवार

121

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ शिवस्मारकासाठी तात्काळ जागा निर्धारित करा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन, जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत स्थापन होणार समिती

संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात. असे असतांना त्यांचे स्मारक चंद्रपूरात नसणे हे दुर्भाग्यपुर्ण आहे. त्यामुळे त्यांचे अद्वितीय विलक्षण कार्य सदैव स्मरणात राहील यासाठी चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरूढ शिवस्मारक उभारण्याची प्रक्रिया जलद गतीने पुर्ण करुन स्मारकासाठी नागरिकांनी सुचविलेल्या जागांपैकी एक जागा तात्काळ निर्धारित करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहे.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरुढ स्मारक उभारण्यासह मतदार संघातील ईतर विषयांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी सदर सूचना केल्या आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, मनपा अभियंता महेश बारई, पुरातत्व विभागाचे अरुण मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभे, उपविभागीय अभियंता अमरशेट्टीवार, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, चंद्रपूरचा राजा युवक मंडळाचे अध्यक्ष दिपक बेले, सुनिल चोपडे, राजाभाऊ चोपडे, भरत गुप्ता आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्ह्याला जवळपास ५०० वर्षाहून जुना इतिहास आहे. असे असतांनाही ईच्छाशक्तीच्या अभावी आम्ही आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू शकलो नाही. मात्र आता चंद्रपूरकरांसह शिवप्रेमींनी चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरुढ शिवस्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून याला माझे पुर्ण समर्थन आहे. मी स्वत: यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविण्याची आमची तयारी आहे. मात्र प्रशासन म्हणुन आपलेही सहकार्य आम्हाला लागणार आहे. यासाठी अनेक नियमावली आहेत. याचीही मला कल्पना आहे. मात्र आता जिल्हा तथा महानगर पालिका प्रशासनाने जनतेच्या मनातील स्वप्न साकार करण्यासाठी पुर्ण शक्तीने प्रयत्न करावे. शिवरायांचे स्मारक कुठे उभारावे हा मोठा प्रश्न होता. यासाठी आपण छोटूभाई पटेल हायस्कूल लगत परिसर,छत्रपती शिवाजी चौक परिसर, मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा, कुंभार सोसायटी जागा, जुने पटवारी कार्यालय परिसर, चांदा क्लब ग्राउंड, पोलीस ग्राउंड, रामाला तलाव उद्यान परिसर, ज्युबिली हायस्कुल परिसर, जटपुरा गेट परिसर, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय जवळील परिसर अशा 11 जागा प्रशासनाला सुचविल्या आहेत. यातील एक जागा तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आपण निर्धारित करावी अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याबाबत महानगर पालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात समिती तयार करण्याचे सांगीतले असुन जिल्हाधिकारी स्वत: या समितीचे अध्यक्ष राहणार आहे. सदर समिती सुचविलेल्या जागांची पाहणी करणार असुन नियमात बसत असलेली जागा स्मारकासाठी आरक्षित करणार आहे.

advt