तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल

0
460

तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल

● २०१९ चा तेंदुपत्ता बोनस मंजूर

राजुरा : तेंदु पाने संकलन करणाऱ्या मजुरांना त्वरित बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्या करिता ऑडवोकेट मारोती कुरवटकर यांच्या नेतृत्वात तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या झालेल्या आंदोलनाला यश मिळाले असून सन २०१९ चा बोनस मजूरांना शासनाने नुकताच मंजूर केलेला आहे.

राजुरा तालुक्यात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षातील थकीत बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबवण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. या मागणी करिता तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथे नुकतेच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा निवेदन पाठवण्यात आले होते.

शासनाने सदर आंदोलनाची दखल घेत तेंदूपत्ता मजुरांची मागणी मान्य केली असून सन २०१९ चा बोनस प्रदान करण्यात शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु शासनाने अद्यापही २०२० आणि २०२१ या वर्षातील थकीत बोनस देण्यास मात्र अजूनही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात या दोन वर्षातील थकीत बोनस तातडीने देण्यात यावा याकरिता पुन्हा आंदोलन करण्याचे आवाहन संघटनेच्या माध्यमातून ऑडवोकेट मारोती कुरवटकर यांनी तालुक्यातील संपूर्ण तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना केलेले आहे. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी ऑडवोकेट मारोती कुरवटकर, उपसरपंच विकास देवडकर, माजी सरपंच लहुजी चहारे, उपसरपंच आकाश चोथले, प्रेमसागर राऊत, संतोष अलोने, बाल्या वांढरे, मारुती शिवणकर, भाऊराव आकनूरवार, गुलाब सहारे, भारत आत्राम इत्यादीनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here