लक्षणीय यशासाठी संयम अनिवार्य – महेश देशपांडे

0
423

लक्षणीय यशासाठी संयम अनिवार्य – महेश देशपांडे

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले
आज आपल्या या हितगुजासाठी गरुड भरारी असा शब्द वापरला आहे. जपानी भाषेत गरुड अर्थात उंच उडणारे पक्षी कधी आपली नखे दाखवत नाहीत, अशा अर्थाची म्हण आहे. अर्थात कोणालाही न टोचता आक्रमण न करता संयम पाळत आपल्या पंखांच्या शक्तीचा उपयोग करीत ते उंच भरारी घेतात. आयुष्यात सर्वोच्च यश संपादन करायचे असेल तर असा संयम आवश्यक आहे. केवळ आपल्यातील कमतरताच नव्हे तर आपल्यातील गुणांचे सुद्धा वारंवार प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही. मग यश तुमचेच आहे.” असे अत्यंत प्रेरणादायी विचार नोझोमी इन्फोटेक या जपानच्या प्रथितयश कंपनीचे सर्वेसर्वा श्री महेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित सिनर्जी या प्रेरणादायी उपक्रमांच्या यावर्षीच्या आभासी उद्घाटन कार्यक्रमात ते व्यक्त होत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव एड. लक्ष्मण भेदी यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी या माध्यमामुळे जागतिक व्यक्तिमत्त्वांना अनुभवण्याचा लाभ आपल्याला मिळत आहे हा आभासी पद्धतीचा फायदा सांगून या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवण्याची योजना स्पष्ट केली.

आपल्या वणीतील वास्तव्याच्या आठवणींना पदोपदी जागृत करीत, येथे जपान मध्ये आल्यावर प्रत्येक भूकंपाच्या वेळी आधार किती मजबूत असावा लागतो ? हे कळले आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाचा तो आधार वणीच्या मातीत निर्गुडेच्या पाण्याने तयार झाला असे म्हणत जपानी लोकांच्या यशामागे असणारी त्यांची दूरदृष्टी, चिकाटीने केल्या जाणारी सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रत्यक्ष कार्यातूनच प्राप्त होणारा आत्मविश्वास, बाहेरच्या जगात भाषा आणि पदार्थांच्या बाबतीत करावा लागणारा संघर्ष अशा विविध पैलूंना प्रकाशित करीत, माझ्या भारतीय लोकांच्या कंपनीने तयार केलेले सॉफ्टवेअर आहे तर मग त्यात पाहायचे काही काम नाही हा जपान मध्ये निर्माण केलेला विश्वास या आपल्या विविध अनुभवांना विद्यार्थ्यांच्या समोर अत्यंत तळमळीने सादर केले.

वणी सारख्या गावात असताना आपल्याला नागपूर देखील आवाक्याबाहेरचे वाटते मात्र प्रयत्नाची कास धरीत सातत्यपूर्ण वाटचाल करत राहिले की जपानच काय हे विश्व देखील आपल्यासाठी सहज साध्य आहे असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची त्यांची मानसिकता श्रोत्यांना विशेष भावली.

आमच्या महाविद्यालयाच्या या उपक्रमातून अनेक महेश देशपांडे तयार व्हावेत अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. खानझोडे यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतामध्ये एड. लक्ष्मण भेदी यांनी वाक्त्यांचे असलेले घरगुती संबंध आठवत अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ स्वानंद पुंड यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ गुलशन कुथे, डॉ. परेश पटेल आणि पंकज सोनटक्के यांनी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here