गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे अपात्र

0
590

गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे अपात्र

नगर विकास मंत्रालयाने घातली सहा वषेॕ निवडणूक लढण्यावर बंदी

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे यांना नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले आहे.शिवाय त्यांना सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यासही मनाई केली आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये गडचिरोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी भाजपच्या योगिता पिपरे थेट जनतेतून निवडून येऊन नगराध्यक्ष झाल्या. शिवाय सर्वाधिक नगरसेवकही भाजपचेच विजयी झाल्याने नगर परिषदेत या पक्षाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली. परंतु हळूहळू नगराध्यक्ष आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये विविध कारणांवरुन वितुष्ट निर्माण झाले. सुरुवातीला पेल्यातील वादळ म्हणून पक्ष नेत्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी २२ मे २०२० रोजी नगर परिषदेचे तत्कालिन बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार व अन्य १४ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली. नगराध्यक्ष पिपरे या आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या अनेक ठराव मंजूर करवून घेत आहेत, शिवाय त्यांनी भाड्याचे वाहन वापरुन ११ लाख ६१ हजार ९१४ रुपयांची उचल केली आहे. हे नियमबाह्य असल्याने पिपरे यांना अपात्र घोषित करावे, असे तक्रारकर्त्या नगरसेवकांचे म्हणणे होते.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठविला होता. पुढे अनेकदा पाठपुरावा करुनही नगरविकास मंत्रालयाने कोणताच निर्णय न दिल्याने नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली होती. अखेरचा उपाय म्हणून तक्रारकर्त्या नगरसेवकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात नगरविकास मंत्रालयाला नोटीस बजावून लवकरात लवकर उचित निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्याअनुषंगाने नगर विकास मंत्रालयाने नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचा आदेश २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला.

नोव्हेंबर अखेर विद्यमान सत्ताधाऱ्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे डिसेंबर वा जानेवारीमध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने मागील महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड फेररचनेचे काम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्षांना अपात्र घोषित करण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here