व्यक्ती विशेष : दिलीपकुमार! अभिनयाची कार्य शाळा! जयंत माईणकर

0
473

व्यक्ती विशेष : दिलीपकुमार! अभिनयाची कार्य शाळा! जयंत माईणकर

दिलीपकुमार! ५४ वर्षाच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत केवळ ६५ चित्रपटात काम करूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा एक कलाकार! अभिनयाचं कुठलंही प्रशिक्षण न घेतलेल्या दिलीपकुमारला अभिनयाची कार्यशाळा मानलं जातं. ज्वार भाटा ते किला (१९४४ ते १९९८) हा तो अभिनयाचा प्रवास.या काळात देवदास, गंगा जमूना, विधाता,कर्मा, सौदागर हे या कार्यशाळेतुन निघालेले ‘लँड मार्क’ चित्रपट! राजेंद्र कुमार, मनोजकुमार, अमिताभ इतकंच कशाला अगदी शाहरुख खानच्या अभिनयावरही दिलिप कुमारची छाप दिसते. आणि म्हणूनच की काय अभिनयाची कार्यशाळा हे बिरुद त्यांना’परफेक्ट’बसत. ही गोष्ट १९४४ ची असेल.बॉम्बे टॉकीजच्या देविका राणीने पेशावरहून आलेल्या महंमद युसुफ खान नावाच्या पठाण फळ विक्रेत्याच्या समोर चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी तीन नाव ठेवली. वासुदेव, जहांगीर आणि दिलीपकुमार! आणि पुढे इतिहास घडला!

 

दिलीपकुमार,राज कपूर, देव आनंद! या त्रयी समकालीन! तिघांचाही जन्म आजच्या पाकिस्तान मधला. तिघात सर्वात ज्येष्ठ दिलीपकुमार आणि तेच दीर्घायुषी ठरले. तर राज कपूर सर्वात कनिष्ठ !तिघांचाही स्वतःचा असा वेगळा ठसा हिंदी चित्रपट सृष्टीवर आहे. चिरतरुण देव आनंद यांची स्वतः ची एक वेगळी स्टाईल होती. तर वडिलांचा वारसा घेऊन

चित्रपट सृष्टीत पदार्पण करणाऱ्या राज कपूर यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत स्वतःच नाव निर्माण केलं. रणबीर कपूरच्या रूपाने आज कपूर खानदानाची चौथी पिढी आज अभिनयाच्या क्षेत्रात आहे.पण दिलीप कुमार मात्र याहून वेगळे निघाले. ट्रॅजेडी किंग म्हणून त्यांनी स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं.आत्तापर्यंत तीन देवदास येऊन गेले आहेत. पण “कौन कमबख्त बर्दाश्त करने को पीता है, हम तो पीते हैं कि यहां पर बैठ सकें, तुम्हें देख सकें, तुम्हें बर्दाश्त कर सकें..” हा डायलॉग ऐकावा तो दिलीपकुमारकडूनच! त्या चित्रपटानीच त्यांना ट्रॅजेडी किंग ही उपाधी मिळवून दिली होती.

 

पण व्यक्तिगत जीवनात त्यांना बरेच चढ उतार पाहावे लागले. त्यांचं नाव कामिनी कौशल, मधुबाला, वैजयंती माला यांच्याशी त्यांचं नाव जोडलं गेलं. मधुबालाशी आपल्या मैत्रीची कबुली त्यांनी भर कोर्टात दिली होती. सात वर्षे त्यांचं अफेअर सुरू होत.पण पुढे त्यांचे संबंध एवढे बिघडले की मुगल ए आजम च्या सेटवर दोघे एकमेकांशी बोलत नसत. गंगा जमुनाच्या वेळी त्यांची वैजयंतीमालाशी मैत्री वाढली होती.पण शेवटी त्यांनी आपल्याहुन २२ वर्षे लहान असलेल्या सायरा बानूशी विवाह केला. पण त्यांना मूल होऊ शकलं नाही. दिलीप कुमार यांच्या सांगण्यानुसार सायरा बानू प्रेग्नंट होत्या.पण आठव्या महिन्यात सायरा बानू यांचा रक्तदाब वाढल्याने अडचणी वाढल्या आणि त्यांना मूल शकलं नाही. ट्रॅजेडी किंग च्या व्यक्तिगत जीवनात ही एक ट्रॅजेडी ठरली.पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनात अस्मा नावाची हैदराबादची एक महिला आली.त्यांचा विवाहही १९८० ला झाला.दिलीप कुमारच्या परिवारातील एका सेक्शन कडून अस्माशी झालेल्या विवाहाचा पाठपुरावा केला अस ब्लाल जात. कारण त्यांना दिलीपकुमार च्या प्रॉपर्टी साठी वारस हवा होता, अस बोललं जातं.पण शेवटी दिलीपकुमार सायराशी प्रामाणिक राहिले आणि त्यानी अस्माला १९८२ डायवोर्स देऊन हे प्रकरण संपवलं.शोकांतिकेने इथेही त्यांची पाठ सोडली नव्हती. सत्तरीत पोचल्यानंतर दिलीपकुमार याना दिग्दर्शक बनावस वाटलं. सुधाकर बोकाडे या मराठी निर्मात्याने (साजन चा निर्माता) कलिंगा या नावाचा चित्रपट दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली सुरू केला. पण इथेही त्यांच्या पदरी शोकांतिका पडली.तीन तासाच्या चित्रपटासाठी सहा तासाचा कलिंगा तयार झाला.त्यात जस्टीस कलिंगा ची भूमिका स्वतः दिलीपकुमार करत होते .पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्याच काळात या चित्रपटातील एक कलाकार राजकीरण नाहीसा झाल्याने चित्रपट मागे पडला. पुढे हे प्रकरण स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला.चिडलेल्या बोकाडेनी सहा तासाच्या चित्रपट रीळाना आग लावण्याची भाषा केली होती.पुढे हे प्रकरण मिटल पण कलिंगा अजूनपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही. दिग्दर्शक म्हणूनही दिलीपकुमार यांच्या पदरी शोकांतिकाच आली. काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी राज्यसभेत पाठवले. नर्गिस दत्त, सुनील दत्त यांच्या पाठोपाठ राजकारणात येणारे ते तिसरे दिगग्ज अभिनेते. गेल्या दशकात मात्र त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सतत लीलावती हॉस्पिटलमध्ये जावे लागले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर जलील परकार हेच दिलीपकुमार वर उपचार करत होते.या अभिनेत्याने शंभरी गाठली असती तर त्याच्या असंख्य चाहत्यांना आनंद वाटला असता.पण तिथेही त्यांच्या नशिबी शोकांतिका च आली आणि शंभरी गाठायचा दीड वर्षे आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या ९८ वर्षाच्या आयुष्यात पदमभूषण, पदम विभूषण, निशान ए इम्तियाज(पाकिस्तान सरकारचा पुरस्कार),दादासाहेब फाळके अवॉर्ड यासह आठ वेळा उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. पण चित्रपट रसिकांच्या हृदयात मात्र ते ट्रॅजेडी किंग या नावानेच ओळखले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here