ती थकत नाही व हरतही नाही ……….!

0
714

ती थकत नाही
व हरतही नाही ……….!
चंद्रपूर -राजूरा किरण घाटे महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील काव्यकुंजच्या मुख्य संयाेजिका सराेज हिवरे यांनी स्री थकत नाही व हरत नाही ……..! हा एक अल्पसा लेख शब्दांकित केला आहे .ताे खास आम्ही आज वाचकांसाठी देत आहाे .
स्त्री थकत नाही, हरत नाही
हरली तरी, रडत बसत नाही….

ती दिसायला जरी नाजूक असली
तरी ती कमजोर नाही…..

ती धडपडते, मार्ग शोधते
ती सतत कार्य मग्न असते…

स्त्रीला कितीही काम असले तिला कितीही संघर्ष करावा लागला तिच्या आयुष्यात कितीही दुःख किंवा उतार चढाव आले तरी ती कधीही थकलेली दिसत नाही. तसेच ती सहजा सहजी हार पत्करत नाही. आणि हो ती कदाचित हरली तर ती रडत बसत नाही. ती स्वतःला सावरते. सतत प्रयत्न करते ती सारखी धडपडते. आणि आपल्यावर आलेल्या संकटातून बरोबर समयसूचकतेने मार्ग काढते. आणि हो एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ती तिच्याकडे असलेला वेळ फालतू कामात वाया घालवत नाही. ती सतत कार्यमग्न असते एखाद्या मुंगीसारखी…आपल्याला माहिती आहे मुंगी दिसायला जरी लहान असली तरी ति सतत चालत असते. आणि ती तिच्या इवल्याशा तोंडातून सतत काहीतरी घेऊन जातांना आपल्याला दिसते.म्हणजे ती कशाची तरी साठवण करत असते आणि तेही शिस्त बद्ध पद्धतीने तसेच स्त्रीचे सुद्धा आहे. तीही चांगल्या गुणांचा, सकारात्मक विचाराचा सदैव साठा करीत असते. आणि याचा तिला तिच्या मुलांना तिच्या परिवाराला खूप फायदा होतो. त्यासाठी ती सतत कार्य मग्न असते. आणि म्हणूनच कितीही संकटे आली. काहीही झाले तरी ती मागे हटत नाही. ती आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढते. आपण आणि आपल्या परिवाराला सुखात व आनंदात कसे ठेवता येईल यासाठी ती सतत प्रयत्न करते.ती दिसायला जरी नाजूक दिसत असली तरी ती कमजोर नाही.
स्त्री ही यापूर्वीही कमजोर नव्हती
व आजही नाही.आपल्याला माहिती आहे आपला घडलेला इतिहास आपल्याला पुस्तक वाचनातून कळतो आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी आपले घर दार, मुलं बाळ, संसार सांभाळून युद्धात सहभाग घेऊन, स्वतःची शक्ती आणि कर्तृत्व दाखवून दिले आहे. म्हणूनच स्त्री ही
पुरुषा प्रमाणेच बलवान शक्तीशाली व शूरवीर आहे. पूर्वीच्या काळचा स्त्रियाचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या बाई होळकर यांनी आपल्या प्राणाची चिंता न करता आपला प्रदेश शत्रू पासून वाचविन्याकरिता व प्रजेच्या रक्षना करिता स्वतःला युद्धात झोकून आपले प्राण पणाला लावले. तसेच राणी कैकयीने आपल्या पतीचे प्राण तसेच अयोध्येचा प्रदेश वाचविन्यासाठी संकटकाळी राजा दशरथा बरोबर रनांगणांत लढली.
तसेच जिजाऊचा इतिहास बघितला तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना चांगले संस्कार दिले त्याना ढाल तलवारिचे प्रशिक्षण देऊन शूरवीर राजा शिवाजी प्रजेला दिला.
तसेच सावित्रीबाई फुले यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करून शेण चिखल मातीचे गोळे आपल्या अंगावर झेलत, तसेच लोकांचे बोलणे खात अपमान सहन करत न घाबरता न डगमगता स्त्री शिक्षणाचा पाया रचिला व सम्पूर्ण स्त्री वर्गाला शिक्षित केले. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्त्रियाबद्दल लिहतात….
काय स्त्रियानी युद्ध नाही केले?
पती पुत्रास नाही प्रोत्साहन दिले?
काय स्त्रियानी प्राण नाही अर्पिले ब्रिदासाठी? Il
ज्याप्रमाणे त्याकाळी स्त्रियांनी युद्ध केले त्याच प्रमाणे आजही स्त्रियांना युद्धच कराव लागत आहे. आणि हे युद्ध त्यांना शत्रू पासून आपला प्रदेश वाचविण्यासाठी नाही तर जागोजागी असलेल्या नराधमापासून तिचा जीव वाचविण्यासाठी करावे लागत आहे. आजची स्त्री ही सुरक्षित नाही. तिला आजच्या परिस्थिती मध्ये कोणत्याही क्षणाला युद्ध करावे लागते. कारण जागोजागी स्त्रियांवर अत्याचार करणारे हल्ले करणारे हल्लेखोर आपल्याला दिसतात.म्हणूनच त्यांच्या वाट्याला संघर्ष हा आहेच.
आजच्या धकाधकीच्या काळात स्त्रियाना आणि मुलींना घराच्या बाहेर निघून शिक्षण घेणे किंवा नोकरी करणे कठीण झाले आहे. आजची परिस्थिती फार बिकट आहे. तरीपण त्या अशाही परिस्थितीचा सामना करत आपले काम करून पुरुषांच्या बरोबरीची आपली कार्यशक्ती सिद्ध करून दाखवीत आहे.
आज पूर्वीप्रमाणे ढाल तलवार घेऊन युद्ध करण्याचे दिवस नसले तरी आजच्या काळात ज्या परिस्थितीला स्त्रिया सामोरे जात आहे तेही ऐक प्रकारचे युद्धच आहे. आपण रोज वर्तमान पत्रात वाचतो. टीव्ही वर पाहतो आजही स्त्री सुरक्षित नाही. स्त्रीयांच्या वाट्याला संघर्षच आहे.
पण आपल्याला हेही माहिती आहे स्त्रिया दिसायला सुंदर आणि नाजूक असल्या तरी त्या तत्पर व सरस असतात. वेळ प्रसंगी स्वतःचे व इतरांचे रक्षण करू शकतात. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
” हजारो स्त्रिया फुलाहूनी नाजूक
ब्रिदासाठी जाहल्या राख….
खरंच आहे स्त्रियाचे जेवढे
कौतुक करावे तेवढे थोडेची आहे.
त्या प्रत्येक कामात निपुण आहे. यापूर्वीही त्यांनी पुरुषाच्या बरोबरीने कार्य केलेले आहे व त्या आजही करीत आहे. त्या हाती आलेले कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतात.
स्त्री याआधी ही निर्भीड पणे लढली आणि आजही लढत आहे.
” स्त्री ही कमजोर नव्हती आणि आजही नाही. ”

कोमल है कमजोर नहीं तु
शक्ती का नाम ही नारी है l….

जग को जीवन देणे वाली
मौत भी तुजसे हारी है l……..

-सौं. सरोज वि. हिवरे
काव्यकुंज मुख्य संयोजिका
सहकार नगर रामपूर राजुरा
जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here