हातभट्टी धारकांच्या नावानं पोलीस विभागाचं चांगभलं…

0
576

हातभट्टी धारकांच्या नावानं पोलीस विभागाचं चांगभलं…

विरुर स्टे./राजुरा, अमोल राऊत (२५ मे) : आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास कोहपरा येथील पाण्याच्या टाकीजवळ ग्रामपंचायत हद्दीत काही तरुणांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून संबंधित दांपत्यास पकडले. स्थानिक तरुणांनी याची माहिती विरुर स्टेशन येथील पोलीस विभागाला कारवाई करिता दिली. त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने तुम्ही स्वतः ती दारू नष्ट करा असे भ्रमणध्वनी द्वारे कळविले. मात्र पोलीस प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे हातभट्टीधारक घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाले. या गावठी दारू बनावटदारांकडून पोलिसांना मिळणाऱ्या हफ्त्यामुळे यांच्यावर कारवाई होत नसल्याची खंत परिसरातील युवापिढीने इम्पॅक्ट शी बोलताना व्यक्त केली. या प्रकारामुळे ‘हातभट्टी धारकांच्या नावानं पोलीस विभागाचं चांगभलं…’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवीन सातरी ते सिंधी या गावापर्यंत असलेल्या प्रत्येक हातभट्टी धारकांडून हप्ता घेतला जात असल्याचा आरोप परिसरातील जनतेतून केल्या जात आहे. पोलीस ठाणेदार, उपनिरीक्षक, बिट जमादार व पोलिस शिपाई यांच्या आशीर्वादाने गावठी दारू निर्मितीची रेलचेल सुरू असून आमच्यावर कारवाई होणार नाही अशा आविर्भावात हातभट्टी धारक असल्याचे दिसून येते. निकृष्ट गुळ, तुरटी व मोहफुले यापासून गावठी दारूची निर्मिती आणि या भट्टी धारकांडून पोलिसांना मिळणाऱ्या हफ्त्यापोटी सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. गुंडप्रवृत्ती वाढत असून व्यसनाधीन तरुण पिढी भरकटत चालली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या आंबटशौकीनांचे कुटुंब उघड्यावर पडत आहे. तुटपुंज्या आर्थिक मायेपोटी कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीमुळे तीनतेरा वाजले आहेत. आता जनतेची अशी मागणी आहे की पोलिस विभागाला पगार कमी असेल तर शासन दरबारी आम्ही गृहमंत्र्यांना साकड घालू की आमच्यासाठी दिवसरात्र राबणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या अथक परिश्रमाचा मोबदला हा सर्वात जास्त द्यायला हवा जेणेकरून त्यांच्या हातून असे कृत्य होणार नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष घालून यावर जरब बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, उपनिरीक्षक व बिट जमादार यांच्या भ्रष्ट कार्यामुळे परिसरात अवैध धंद्यांना आळा बसण्याच्या जनतेच्या व विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षांचा भ्रमनिरास होत आहे. पोलीस विभागाकडून कठोर कारवाई न करता थातुरमातुर कारवाईचा दिखावा केल्या जात असल्याने परिसरातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. यामुळे अशा भ्रष्ट व लाचखोर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी तरुण पिढीकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here