व्ही. पी. सिंग रिटर्न्स इन विदर्भा!

0
566

व्ही. पी. सिंग रिटर्न्स इन विदर्भा!

मंडल यात्रेच्या निमित्ताने… – ज्ञानेश वाकुडकर

 

समाज मेलेला नाही, तो तसा कधीही मरत नसतो. मात्र सध्या तो झोपलेला आहे. त्याला जागवण्याची जबाबदारी आपली आहे, कारण आपण जिवंत आहोत!

मंडल आयोगाच्या समर्थनार्थ शिवसेनेचं नागपूर जिल्हाप्रमुख पद सोडून, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या ब्रह्मपुरी येथील जाहीर सभेत मी जनता दलात प्रवेश केला होता. त्याला आता तीस वर्षे झालीत. त्यावेळेस मला अनेकांनी वेड्यात काढलं होतं. सेना सोडली नसती तर आमदार, मंत्री झालो असतो, असं सेना भाजपाचे मंत्री देखील बोलायचे. आताही बोलतात. त्यावेळी सेना सोडणं म्हणजे जिवावर उदार होणं, असा त्याचा अर्थ होता. ’काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..!’ अशी परिस्थिती त्यावेळी नव्हती. सेनेची दहशत होती. पण माझ्या बाबतीत मात्र तसं काही घडलं नाही. कारण मी सेना सोडण्याआधी शिवसेनाप्रमुखांशी मातोश्रीवर जाऊन सविस्तर चर्चा केली होती. माझी भूमिका मांडली होती. (योगायोगाने नागपूरचे कवीमित्र उल्हास मनोहर त्यावेळी माझ्यासोबत मातोश्रीवर होते. ते ह्या घटनेचे साक्षीदार आहेत.)

आज हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे विदर्भातली काही तरूण मंडळी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट अशी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या सात जिल्ह्यातून मंडल यात्रा काढत आहेत. प्रस्थापितांची राजकीय गुलामगिरी झुगारल्याशिवाय ओबीसींची मुक्ती शक्य नाही, हे भान ओबीसींना जेवढ्या लौकर येईल, तेवढंच ओबीसीसह इतर बहुजनांचं देखिल भलं होईल. देशाचंही भलं होईल. ओबीसी, बहुजनांना मिळणारं आरक्षण जणू आपल्या बापाच्या कमाईतून दिलं जाते, असा काही भुरट्या लोकांचा भ्रम आहे. यात ओबीसी मधील काही बिनडोक लोक देखील सामील आहेत, ही संतापजनक गोष्ट आहे.

नागेश चौधरी, डॉ शंकरराव चोखारे, विजय मेटकर, अनिल धवड, प्रभाकर देशमुख, विजय बाभुळकर, नामदेव खामकर, विट्ठलराव देशमुख, रामभाऊ अडबोल वगैरे मंडळी ही मंडल आयोगाच्या चळवळीतली त्यावेळची पहिल्या फळीतील नेतेमंडळी होती. अनिल धवड यांच्यामुळे मी त्या चळवळीत ओढला गेलो होतो.

तीस वर्षानंतर का होईना पण ओबीसी, एनटी, एसबीसी मधील काही तरुणांना त्यांचे ध्येय आणि नेमकी वाट गवसली, याचा आनंद आहे. चळवळीतील प्रामाणिक ओबीसी, बहुजन नेत्यांच्या वाट्याला आलेली टिंगलटवाळी, उपहास हा व्ही. पी. सिंग यांच्याही वाट्याला आला होता. ओबीसी-बहुजनविरोधी टोळीने अर्थात् संघ भाजपाच्या लोकांनी त्यांना व्हिलन ठरवून बदनाम केलं होतं. ’मंडल विरूद्ध कमंडल’ असा संघर्ष उभा करून व्ही. पी. सिंग यांचं सरकार भाजपाच्या लोकांनी पाडलं होतं! त्या षडयंत्राचे नायक लालकृष्ण अडवाणी होते. बाजपेयी त्यात सहभागी होते.

वर्णवादी, प्रस्थापित पक्षांनी ज्या व्ही. पी. सिंगांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला, तोच ’मंडल मसिहा’ युवा यात्रेच्या निमित्ताने पुन्हा परतून आलाय, असा मला या प्रसंगी भास होतोय! तथापि भावनात्मक न होता काही बाबी आपण याप्रसंगी समजून घेतल्या पाहिजेत!
• भाजपा हा पहिल्या नंबरचा आरक्षणविरोधी पक्ष आहे. त्याची सारी धोरणे ओबीसी, बहुजन विरोधी आहेत. ओबीसींची जनगणना करण्याला त्यांनी स्पष्टपणे संसदेत नकार दिलेला आहे.
• महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षे होतं. ओबीसी साठी ’शेकडो होस्टेल बांधणार’ अशा घोषणा ओबीसी मंत्र्यांनी केल्यात. प्रत्यक्षात किती होस्टेल बांधले आहेत? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
• कुणीतरी नेता येतो, वरवर समर्थन करतो, पैसे देतो, त्याच्यामुळे बातम्या छापून येतील वगैरे सारख्या गोष्टींना चळवळीतील नेत्यांनी बळी पडता कामा नये!
• ’कोणत्याही पक्षातून असो, पण आपला ओबीसी/आपल्या समाजाचा माणूस निवडून आला पाहिजे’ अशी भूमिका शुध्द मूर्खपणाची आहे. हा समाजविरोधी विचार आहे, याचे भान आपल्याला असले पाहिजे. समाज महत्त्वाचा नाही, नेत्यांची बांधिलकी, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे!

ओबीसी युवा अधिकार मंच, संघर्ष वाहिनी आणि विविध संघटनांच्या वतीने ही यात्रा आयोजित केली आहे. त्यातील युवा नेत्यांना युवक, विद्यार्थी आणि ओबीसी, बहुजन प्रश्नांची चांगली जाण आहे. पण नवे शैक्षणिक धोरण, आरोग्य, शेती, लोकशाही, राजकारणाचे देशी तालिबानीकरण, निर्लज्ज पक्षांतरे, मीडियाचा मुर्दाडपणा, विकावू न्यायालये या ज्वलंत विषयावर देखिल युवकांनी चर्चा करायला हवी. कोणतीही चळवळ ही राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी कामी आली पाहिजे, राजकारण्यांच्या समोर शेपटी हलविण्यासाठी नव्हे! ओबीसी मधील असंतोषाची धग मतपेटीमधून व्यक्त झाली पाहिजे. अन्यथा आपले मोर्चे, मेळावे यांना काहीही अर्थ नाही. अशा चळवळीमधूनच स्वतंत्र बाण्याचे, सामाजिक बांधिलकी असलेले अभ्यासू आणि समर्पित तरूण नेते तयार होतील, याची काळजी चळवळींनी घेतली पाहिजे.

असंख्य लोक असतील ज्यांनी मंडल चळवळीला कधीकाळी वाहून घेतलं होतं. त्यांचीही त्यावेळी टिंगल टवाळी झाली असेल. घरच्या लोकांनीही त्यांना मुर्खात काढलं असेल. पण आज ही मंडल यात्रा बघून नक्कीच त्यांचे डोळे पाणावतील! आपली मेहनत अगदीच वाया गेली नाही, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असेल! आज तेही त्यांच्या पोरांना, सुनेला, बायकोला अभिमानाने त्यांचा जुना वेडेपणा सांगू शकतील. इतिहासातील त्यांच्याही जखमा काही प्रमाणात का होईना पण भरून निघतील. पुन्हा त्यांच्या काळजात व्ही. पी. सिंग नावाचं वादळ जोरात परतून आलेलं असेल.

तेव्हा, समस्त ओबीसींनो उठा! मंदिर, मशिद, पुतळे, पुरस्कार, मूर्तिपूजा, व्यक्तिपूजा यातून बाहेर या! इतिहास इतिहास करत बसू नका.. त्यातून बाहेर या! रस्त्यावर उतरून नव्या मंडल सैनिकांचे स्वागत करा! केवळ महापुरुषांच्या कहाण्या सांगण्यात, ऐकण्यात धन्यता मानू नका. त्याच त्या इतिहासात रमण्याच्या घोडचुका भविष्यात करू नका! तुम्हाला प्रिय असणारे महापुरूष आजच्या प्रसंगी कसे वागले असते, याचा विचार करा! तसे वागण्याचा प्रयत्न करा! खऱ्या अर्थानं तीच त्या महापुरुषांची अपेक्षा होती. तीच त्यांना श्रध्दांजली ठरेल!

तुम्ही साथ दिली तर या लढाईला आणखी गती येणार आहे! तुमच्याच पुढच्या पिढ्या बर्बाद होण्यापासून वाचणार आहेत, एवढं लक्षात घ्या. एक नवा इतिहास लिहिण्याची सुरुवात होत आहे, त्यात आपलेही योगदान असू द्या..!

मी सांगतो, अशाच थेट वागणार मुंग्या
आणि हेच गीत गाऊ लागणार मुंग्या
जुना नवा हिशेब थेट मागणार मुंग्या
एकदिवस जागणार.. जागणार मुंग्या!!

पाली, साप, घोरपडी सावधान रे
सरड्यांचे नवे गडी, सावधान रे
अवती भवती दूर दूर सावधान रे
अन् घरातले फितूर सावधान रे..
आरपार शस्त्र थेट डागणार मुंग्या..
एक दिवस जागणार.. जागणार मुंग्या!!

तूर्तास एवढंच!

ज्ञानेश वाकुडकर,
अध्यक्ष
लोकजागर 9822278988

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here