महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी

0
496

महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी   
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी

चंद्रपूर : कोरोनाने मागील वर्षभरापासून कहर केला आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातून चंद्रपूर शहर महानगरपालिकासुद्धा सुटलेली नाही. मालमत्ता कराची वसुली झाली नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाने शहरात हाहाकार माजला असताना रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका घेण्यास पैसे नाही. मात्र, प्रसिद्धीसाठी महानगरपालिकेने वर्षाकाठी २४ लाखांचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. त्यामुळे हे कंत्राट तातडीने रद्द करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त यांना सादर करण्यात आले आहे.
कोविडमुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी खर्चावर मर्यादा आणाव्या. केवळ कोविडवर निधी खर्च करावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु, चंद्रपूर महापालिकेने राज्य शासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला आहे. अशा संकटकाळात महापालिकेने कायमस्वरुपी जनसंपर्क अधिकारी असताना वर्षाला २४ लाख रुपयांचे प्रसिद्धीचे स्वतंत्र कंत्राट दिले. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या पैशाची लूट असल्याचा आरोप रामू तिवारी यांनी केला आहे.
सदर कंत्राट तातडीने रद्द करून चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी, अशी मागणी निवेदनातून केली. ही मागणी मंजूर न झाल्यास चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देणा-या शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह गोपाल अमृतकर, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, संजय गंपावार यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here