कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना वेळेत उपचार द्यावेत : विभागीय आयुक्त संजीव कुमार

0
318

कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना वेळेत उपचार द्यावेत : विभागीय आयुक्त संजीव कुमार

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला कोरोना विषयक आढावा

राजु झाडे

चंद्रपूर दि.29 सप्टेंबर: रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्वेक्षण आणि लवकर निदान यावर लक्ष केंद्रित करा. लक्षणे आढळलेल्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळतील याची संपूर्ण काळजी घ्यावी , असे निर्देश विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा जाणून घेताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौंड, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेन्द्र लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते.

दैनंदिन 50 कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करून कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना उपचार द्यावेत. कोरोनाची लक्षणे ही एका दिवसात दिसत नसून काही व्यक्तींमध्ये दोन ते चार दिवसात दिसू लागतात. त्यामुळे दैनंदिन दूरध्वनीद्वारे त्या व्यक्तीच्या लक्षणांची माहिती जाणून घ्यावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने राज्यभर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शहर, गावे, वस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे, असे श्री. कुमार म्हणाले.

संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी एकमेकात समन्वय ठेवून व या कार्यात पुढाकार घेऊन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करणाऱ्या चमूला विशिष्ट घरे ठरवून द्यावी. एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास त्याला तात्काळ उपचार द्यावेत. तालुकास्तरावर काही अडचण भासल्यास जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना कळवावे. तसेच या मोहिमेत ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, यांना मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. ग्रामीण भागात होर्डींग, फ्लेक्स, पत्रके या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.अशा सूचना श्री. कुमार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.

त्यासोबतच सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या, दैनंदिन सुरू असलेले सर्वेक्षण याबाबत विस्तृत माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here