कटाक्ष : अशा खासदार प्रत्येक राज्यात असाव्यात! जयंत माईणकर

0
655

कटाक्ष : अशा खासदार प्रत्येक राज्यात असाव्यात! जयंत माईणकर

सर्व जगाच लक्ष केवळ भारताकडेच नव्हे तर भारतातील राज्यांच्या निवडणुकांकडेही असत. आणि याच श्रेय भक्त त्यांचे विश्वगुरु पंतप्रधान नरेन्द्र मोदींना देतील.पण हे श्रेय सकारात्मक दृष्टीने नसून नकारात्मक दृष्टीने आहे.मोदींना आव्हान देत बंगाल सतत तिसऱ्या वेळी आपल्या हातात राखणाऱ्या दीदींच्या विजयाची दाखल चक्क न्यूयॉर्क टाइम्स ने घेतली. त्या पक्षाच्या ‘फायरब्रॅंड’ खासदार महुआ मोईत्रा याना बंगालच्या विजयावर एक लेख लिहायला जगावर अंकुश ठेवणाऱ्या महासत्तेच्या एका मोठया मीडिया हाऊसने सांगितले. फायरब्रॅंड हा शब्द कमी पडेल इतकं या महुआ मोईत्रा यांच दहा मिनिटांच लोकसभेतील भाषण भाजपला टोचणारे आणि झोंबणारे होते. अर्थशास्त्र आणि गणित या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महुआनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून एकेकाळी युरोपमध्ये काम केल आहे. तीन वर्षे आमदार आणि सध्या कृष्णनगर या मतदारसंघाच्या खासदार असलेल्या या महिलेने मोदी सरकारचा आपल्या लेखात चांगलाच समाचार घेतला आहे. मोदी व्यक्तिगत किंवा सरकारी संबंधांचा वापर जाणीवपूर्वक आपल्या प्रचारात करतात. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक असते.दीदी आपल्याला भेटायला येताना बंगाली मिठाई , कुर्ता आणतात याचा त्यांनी एकदा भाषणात उल्लेख केला होता. त्यावर दीदींनी ताडकन मी आता दगडं भरलेले लाडूपण पाठवू शकते ज्यामुळे मोदींचे दात तुटतील, असं उत्तर दिलं होत. महुआ यांचा लेख त्याच स्टाईलचा आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जातो तेव्हा अशा भेटवस्तू देणं हे साहजिकच आहे. त्या प्रथा, परंपरांचा उल्लेख आपल्या प्रचारात करणं ही मोदींचीच चूक. पण विश्वगुरूंना हे कोण सांगणार? तृणमूल काँग्रेस हा पक्ष स्थापन करणारी एक महिलाच आणि तिच्या पक्षात महुआ मोईत्रा, अभिनेत्री नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती अशा अनेक महिला आहेत.
मोईत्रा यांच्या या लेखाच शिर्षक आहे ‘I know what it takes to defeat Modi’ मोदींना हरवायची रीत मला ठाऊक आहे, हा त्याचा स्वैर मराठी अनुवाद! मोदी आणि शहा या जोडगोळीला त्यांनी लेखाच्या सुरुवातीलाच विभाजनवादी आणि स्रीद्वेष्टे राजकारण करणारे म्हणत सरळ मुद्द्या ला हात घातला.
भारताची निधर्मी संघराज्यात्मक व्यवस्था नष्ट करुन तिचे रुपांतर निरंकुश हिंदू राष्ट्रात करु पाहणारा मोदींचा केंद्रीकरणवादी आणि एकाधिकारशाहीवादी विजयरथ अडवण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्ते आणि जनता कशी प्राणपणाने लढली याच सुन्दर वर्णन केल आहे . आपल्या लेखात करताना त्यांनी निवडणूक आयोगापासून इतर अनेक घटनात्मक संस्था या दोघांनी मिळून कशा पद्धतशीरपणे पोखरल्या हेही सांगितले.

26 फेब्रुवारीला कोविड 19 ची दुसरी लाट फैलावत असताना या आयोगाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान 27 मार्च ते 29 एप्रिल अशा प्रदीर्घ कालावधीत एकूण आठ टप्प्यात घेण्यात येईल अशी घोषणा केली. बंगालबरोबरच आणखीही चार राज्यात मतदान होणार होते. ते मात्र एकदोन टप्प्यातच घेण्यात आले, याचाही समाचार त्यांनी आपल्या लेखात घेतला. बंगाल निवडणुकीच्या काळात मोदी, शहांनी केलेल्या नेमक्या चुकांची एक यादीच लेखात लिहिली आहे.यात कोविड-19ची दुसरी लाट भरात असल्याने ही निवडणूक कमी टप्प्यात घेण्याची विनंतीआयोगाने नाकारणे इथपासून मास्क न घालता सभा संबोधित करणारे पंतप्रधान आणि देशातील आपत्ती व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी खांद्यावर असलेले त्यांचे गृहमंत्री शहा या दोघांचा आवर्जून उल्लेख केला.
कुंभमेळ्याच्या उत्सवात गंगास्नान करण्यासाठी लाखो लोकांच्या धार्मिक गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी मोदी सरकारने काडीची उपाययोजना केली नाही, याचा उल्लेखही त्यांनी केला.

देशवासीयांच्या जीवनाऐवजी राजकीय सत्ताप्राप्तीसाठीच्या खटाटोपाला मोदींनी अग्रक्रम दिला, अस आपल्या लेखात म्हणणाऱ्या मोईत्रानी मद्रास उच्च न्यायालयाचा दाखल देत निवडणूक आयोगावर बहुधा खुनाचा खटला नोंदवला पाहिजे या मताचाही संदर्भ दिला. एप्रिल महिन्यातील पहिले तीन आठवडे कोरोनाची वाढ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी हा काळ निवडणूक प्रचारात वाया गेला.

मोदींना आपल्या विरोधकांचा नाव घेऊन त्यांची खिल्ली उडवण्याची सवय आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींना त्यांनी एस आर पी ब्रिगेड म्हणून संबोधले होते. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सर म्हणून ओळखलं जातं तसच बंगाल ममता बॅनर्जीना दीदी या नावाने ओळखतो. मोदींनी एक सभेत दीsदी ओs दीssदी असा तुच्छतादर्शक पुकारा केला तेव्हा समोर जमलेल्या पुरुषांनी एकच जल्लोष केला. हे शब्द आणि उच्चारण्याची ही पद्धत मात्र गल्लीतला एखादा टपोरी मुलगा समोरुन जाणाऱ्या मुलींची छेड काढतो तशी भासली, हे मोईत्रानी आपल्या लेखात बिनदिक्कतपणे नमूद केलं आहे. देशाच्या पंतप्रधानांवर या प्रकारचा वस्तुस्थितीला धरून आरोप केला जाण ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

आपण खावे काय, प्रेम कुणावर करावे आणि कपडे कुठले वापरावेत यावर कोणी बंधन घालू म्हणेल तर बंगाली माणूस त्याला ठेंगा दाखवणारच, हे अमेरिकन वृत्तपत्रात लिहून संघ परिवार आणि मोदींचा खरा चेहरा महुआ मोईत्रानी जगाला दाखवून दिला.

अमित शहाना चाणक्यची उपमा मीडियामध्ये दिली जाते. त्याचा समाचार घेत त्या लिहितात बंगालच्या अनुभवाने असे दाखवून दिलेय की हिंदू राष्ट्राची कल्पना सगळ्या भारतीयांना मुळीच आकृष्ट करु शकत नाही आणि मोदी शहा हे चाणक्य मुळीच नाहीत.

आपल्या लेखाच्या शेवटी त्यांनी हिंदू राष्ट्रापेक्षा ऑक्सिजन सिलिंडरची गरज आपल्याला जास्त असते ही गोष्ट अगदी मोदीजींच्या पाठीराख्यांच्याही लक्षात येण्यासाठी असली प्रचंड विनाशकारी महामारी यावी लागली हे विदारक सत्य सांगितले.

महुआ मोईत्रा यांच्यासारखी एक खासदार देशातील प्रत्येक राज्यात निपजावी हीच अपेक्षा! तूर्तास इतकेच!

 

Sent from Yahoo Mail on Android

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here