अडचणीवर मात

0
533

अडचणीवर मात
राजूरा (चंद्रपूर), किरण घाटे : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या संयाेजिका तथा राजूरा रामपूरच्या पतंजलीच्या जेष्ठ सदस्या सराेज हिवरे यांनी शब्दांकित केलेला अडचणीवर मात हा अल्पसा लेख खास वाचकांसाठी आम्ही येथे देत आहाेत…!
“प्रत्येक संकट किंवा अडचण म्हणजे एक आव्हान असतें तेव्हा त्याच्या पासून पळून जाण्यापेक्षा धैर्याने आणि पूर्ण विश्वासाने त्याचा सामना करावा”…
अडचणी या आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. अडचणी या आपल्याबरोबर कायम आपल्या सावलीप्रमाणे आपल्या सोबतच असणार आहे. त्यामुळे अडचणीची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा वेळेस न डगमगता निराश न होता खंबीरपणे समयसूचकतेने अडचणीवर मात करून आपल्याला आपला मार्ग सोपा करणे जमले पाहिजे.
आपल्याला जर अडचणीवर विजय मिळवायचा असेल तर आलेल्या अडचणीला धैर्यlने तोंड देता आले पाहिजे. अतिशय शांततेने अडचणीला सामोरे जा. अशा वेळेस आपला संयम ढळु देऊ नका.अडचणीवर मात करत असतांना सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या मनाची एकाग्रता वाढवीने खूप गरजेचे आहे. कारण आपले मन स्थिर नसेल तर आपण अडचणीवर विजय मिळवूच शकत नाही. हे करत असतांना संपूर्णपणे चिंतामुक्त होऊन विचार करा. तरच आपण आपल्या सकारात्मक विचारांना योग्य दिशा देऊ शकतो. आणि आलेल्या अडचणीतुन आपल्याला योग्य मार्ग मिळू शकतो.
“अडचणी किंवा संकटाशिवाय जीवन म्हणजे अशी एक शाळा की जिथे शिकण्यासारखे काहीच नाही जीवनात अडचणी या तुम्हाला निराश करण्यासाठी नाही तर तुमच्या क्षमतेची परीक्षा बघण्यासाठी येत असतात”. आपण आपल्याला आलेली अडचण कायमची दूर करण्यासाठी उपाय योजना करून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. हे सर्व करत असतांना आपल्याला सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याला जर अडचणीवर विजय मिळवायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा ही करावीच लागणार आहे. यश येवो अथवा अपयश याचा विचार न करता सतत प्रयत्न करत रहा यश तुमचेच आहे. कारण प्रयत्नाची चिकाटी संपली की, हाता तोंडाशी आलेले यश हे आपण आपल्याच हातानी गमावून बसतो.म्हणून सतत प्रयत्न करत रहा.
हे करीत असतांना स्वतः वर पूर्ण विश्वास ठेवा. कारण स्वतः वरचा विश्वास हिच आपली सर्वात मोठी ताकत आहे. आपला विश्वास खचू देऊ नका. आपला विश्वास जर टिकून राहिला तरच आपण सर्व अडचणीवर मात करू शकतो. आणि यातून मार्ग काढू शकतो. परंतु हे करीत असतांना प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे. कारण नियोजन केल्याशिवाय कोणतेही कार्य चांगले होऊ शकत नाही. म्हणून नियोजन हा एक खूपच महत्वाचा गुण आहे. तो गुण प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगावा.
नियोजन या गुणाचा प्रत्येकाने अवलंब केल्याने माणसाची सकारात्मक विचार करण्याची वृत्ती वाढत जाते. आणि मनुष्याला त्याच्या जीवनात आलेल्या अडचणीवर तो अतिशय समयसुचकतेने विजय मिळवू शकतो. “सदैव सकारात्मक विचार आणि मनापासून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला सर्व अडचणीवर मात करणे शक्य आहे.”

सौं. सरोज वि. हिवरे
काव्यकुंज संयोजिका
सहकार नगर रामपूर राजुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here