कटाक्ष: बोफोर्स ते स्कॅनिया! गांधी ते गडकरी!जयंत माईणकर

0
560

कटाक्ष: बोफोर्स ते स्कॅनिया! गांधी ते गडकरी!जयंत माईणकर
स्वीडन! नॉर्वेला लागून असलेला युरोपातील एक छोटा देश! तशी भारताची या देशाशी फारशी राजकीय जवळीक असण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
पण हा छोटासा देश जगातील सर्वात मोठ्या लोकाशाहीवादी देशातील सरकार पाडण्यासाठी जबाबदार ठरलेला आहे.
बोफोर्स हे नाव घेतल्यानंतर गेल्या शतकाच्या आठव्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या आणि २००९ पर्यंत सुरु राहिलेल्या राजकीय उलढाली आठवतात. कारण होत स्वीडन मध्ये बनलेली बोफोर्स तोफ! याच तोफेनी कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून दिला. पण या तोफ खरेदीत झालेल्या कथित लाच प्रकरणात काँग्रेसचे सरकार गडगडले. १९८९ पासून आजतागायत नेहरू गांधी घराण्यातील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकलेले नाही. १४३७ कोटी रुपयांच्या या तोफा खरेदी करताना ६४ कोटी रुपयांची दलाली किंवा लाच दिल्या गेली हा आरोप दोन दशके गाजला. वृत्तपत्राचे कित्येक रिम कागद केवळ बोफोर्स या विषयावर वापरले गेले. राजीव गांधी, अमिताभ बचचन, हिंदुजा परिवार यांच्यावर आरोप केल्या गेले. पण शेवटी यातील कुठल्याही आरोपात तथ्य नसल्याचं स्वीडनकडून जाहीर करण्यात आलं.
आता हाच स्वीडन देश पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कंपनीला कंत्राट देण्याच्या बदल्यात बसच्या स्वरूपात लाच घेतली होती असा आरोप स्वीडिश न्यूज चॅनल एसव्हीटीने केला आहे.
स्वीडिश न्यूज चॅनल एसव्हीटी आणि काही मीडिया कंपन्यांनी स्वीडनची ट्रक आणि बस निर्माण करणारी कंपनी ‘स्कॅनिया’ ने भारतातील सात राज्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी 2013 ते 2016 मध्ये लाच दिली होती, असा आरोप केला.

कंत्राट देण्याच्या बदल्यात स्कॅनिया कंपनीने नितीन गडकरी यांच्या मुलाशी संबंधित कंपनीला बस लाचच्या स्वरूपात दिली होती. एसव्हीटीने आपल्या वृत्तात लिहिले आहे की “स्कॅनियाने एक खास बस नितीन गडकरी यांच्या मुलाशी संबंधित एक कंपनीला दिली. ही बस वापरण्याचा हेतू, गडकरी यांच्या मुलीच्या लग्नासाठी होता. याचे पूर्ण पैसे देण्यात आले नाहीत.” या कम्पनीच्या बसेस भारतात १०लाखपासून ५० लाखापर्यंत मिळतात. अशातला एक बस गडकरींच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आली हा तो मूळ आरोप.

ट्रक आणि बस निर्मिती करणाऱ्या ‘स्कॅनिया’ने कॉन्ट्रॅट मिळवण्यासाठी लाच दिल्या प्रकरणी चौकशी अहवालाची माहिती दिली. एसव्हीटीच्या रिपोर्टनंतर स्कॅनियाच्या अधिकाऱ्यांकडून गैरवर्तणूक झाल्याचे स्कॅनिया कंपनीने मान्य केल आहे. जे लोक या गैरव्यवहारात होते ते कंपनी सोडून गेल्याचं देखील स्कॅनियाने म्हटलं आहे. कंपनीने नितीन गडकरी यांना वापरासाठी कोणती बस दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. स्कॅनियाचे प्रवक्ते हान्सेक डॅनिल्सन म्हणतात, “ही बस 2016 मध्ये कंपनीच्या एका डिलरने विकत घेतली होती. त्यांनी ही बस त्यांच्या एका ग्राहकाला दिली. मला या बसच्या सद्यस्थितीबद्दल काही माहिती नाही.”

नितीन गडकरींच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देताना सर्व आरोप खोटे, बिनबुडाचे आहेत असं सांगून पुढे अस सांगितले की “भारतात ग्रीन पब्लिक ट्रान्सपोर्ट आणण्याच्या योजनेअंतर्गत नितीन गडकरी यांनी स्कॅनियाची इथेनॉलवर चालणारी बस नागपूरमध्ये आणली होती.”

आरोपाप्रमाणे, बस निर्मिती करणारी कंपनी स्कॅनियाने, एक लक्झरी बस त्यांना, भारतात कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या उद्देशाने दिली. स्कॅनियाने गैरवर्तन मान्य केलंय. नरेंद्र मोदी या प्रकरणी चौकशी करणार का?” असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

गडकरींच्या ‘मानस आणि पूर्तीचा’ विकास अत्यंत जवळून पाहिलेल्या काही व्यक्तींपैकी मी एक आहे. एकेकाळी आपल्या निवडणुकीसाठी स्वतः रात्री वॉल पेंटिंग करणारे गडकरी १९९५ ला पहिल्या फेरीत मंत्री न झाल्याने चांगलेच भडकले होते. नंतर तथाकथित आपल्यावरील अन्यायाची बातमी मीडियात ‘मॅनेज’ केल्यानंतर गडकरी आवडत्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले. आणि मुंबई पुणे रस्त्यापासून गडकरींचाही विकास सुरू झाला. एकेकाळी स्कुटरवर फिरणारे गडकरी एकदम चार्टर्ड प्लेनने फिरू लागले. ही लक्षणीय प्रगती त्यांच्या ‘पूर्तीत’ झालेल्या घसघशीत वाढीची जाणीव करून देतात.

या दरम्यान त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप तर कधी चक्क इन्कम टॅक्सच्या धाडीचा आरोप केला गेला.पण प्रत्येक वेळी आरोपाच्या पाठोपाठ गडकरींच या आरोपाशी माझा काही संबंध नाही असं सांगणार निवेदन मीडियात फिरवलं जायचं. काही माध्यमात तर मूळ आरोप पोचण्याच्या आधी गडकरीचं स्पष्टीकरण पोचलं आहे. आणि अशातच योगिता ठाकरे प्रकरण उदभवल. नउ वर्षाची ही मुलगी खेळताना गडकरींच्या घरातील एक कारमध्ये घुसली आणि तिथेच श्वास गुदमरून मेली. पण त्याही बाबतीत आपला किंवा आपल्या कुटुंबाचा काही संबंध नाही हे सांगून आणि मीडियाला पटवून देऊन गडकरी मोकळे झाले होते.

पण २०१३ च्या आसपास देशातल्या सर्वात मोठ्या मीडिया हाऊसने गडकरींच्या पुर्ती तील तथाकथित भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणे सुरू केलं आणि गडकरी पहिल्यांदा हादरले. त्यावेळी त्यांचे संकट मोचक त्यांना भाजपचे अध्यक्ष करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे पत्रकार आणि संघाचे प्रथम प्रवक्ते स्व मा गो वैद्य त्यांच्या मदतीला धावुन आले. या आरोपांच्या मागे नरेंद्र मोदी आहेत असे ‘भाष्य’ त्यांनी आपल्या कॉलममध्ये केले.त्याचा परिणाम उलट झाला. डॅमेज कंट्रोल करायला मा गो वैद्यांचे प्रचारक असलेले चिरंजीव मनमोहन आणि स्वतः गडकरी याना पत्रकार परिषद घेऊन या आरोपात तथ्य नसल्याचं सांगावं लागलं.आज मा गो हयात नाहीत. त्याच्यामुळे ‘बोफोर्स आणि स्कॅनियाची तुलना होऊ शकत नाही आणि गडकरींवरील या आरोपांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत’ हे कोण लिहिणार? भलेही संघाच्या आणि भाजपच्या गडकरींशी जवळीक असणाऱ्या राजकीय वर्तुळात या बातमीमागे मोदी असावेत ही चर्चा सुरू झाली आहे तरीही हे खुलेआम बोलायची हिंमत परिवाराच्या एकाही तथाकथित वजनदार राष्ट्रीय स्तरावरच्या “out of box’ आयडिया देणाऱ्या नेत्यांत नाही. कारण जर ती ताकद असती तर भाजपचे एकेकाळचे नेते संजय जोशी आज पक्षात दिसले असते. गडकरी हिंमत दाखवतील? किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मोदी गडकरींवर कारवाई करतील? या दोन्ही गोष्टी होण्याची शक्यता नाही. कारण मोदींच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत गडकरी दाखवतील याची सुतराम शक्यता नाही तर इच्छा असूनही मोदी गडकरींना काढू शकणार नाहीत. कारण त्यांना असलेला संघाचा भक्कम पाठिंबा! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here