राजुरा ते भेदोडा व रानवेली या गावासाठी दोन फेऱ्यात यथाशीघ्र बससेवा उपलब्ध करून द्या!
विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक राजुरा यांच्याकडे निवेदनातून केली मागणी

राजुरा । वरूर रोड, भेदोडा व रानवेली येथील विद्यार्थी राजुरा येथील शाळा, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. त्या 100 ते 150 विद्यार्थ्यांना रोज आपल्या स्थानिक गाववरून राजुरा येथे शिक्षणासाठी यावे लागते. मात्र या मार्गाने बससेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करून आपापल्या सोयीनुसार अडचणीने राजुरा येथे यावे लागते. यामुळे येथील विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर गावापासून सकाळी 7:30 व दुपारी 12 वाजता बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आगार व्यवस्थापक राजुरा यांना आपली कैफियत मांडत सदर गावातील स्थानिक विद्यार्थ्यांनी केली आहे.
शिवाय शासनाने केलेल्या लॉकडाउनमुळे शाळेची वेळ सकाळी 7:30 ते 11:30 निश्चित करण्यात आली आहे. यावेळेस कोणतीही बससेवा उपलब्ध नाही. शाळांचे दिवस व परीक्षेचे दिवस मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढविन्यात आले आहेत. त्यामुळे सकाळी व दुपारच्या बससेवेअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करणे जिकिरीचे ठरत आहे. उन्हाळा सुरु झाला आहे. परिणामी सदर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. त्यामुळे यथाशीघ्र बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.