प्राचार्या रूपा बोरेकर यांनी देवाडा एकलव्य स्कुलला नावारूपास आणले

0
31

प्राचार्या रूपा बोरेकर यांनी देवाडा एकलव्य स्कुलला नावारूपास आणले

विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी कायमस्वरूपी प्राचार्य द्यावा

शाळा व्यवस्थापन समितीची मागणी

राजुरा, दि. ७ एप्रिल २०२४
देवाडा एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कुल येथील प्राचार्या रूपा बोरेकर यांनी पाच वर्षात अत्यंत परिश्रमपुर्वक आमच्या पाल्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. स्वत: आदीवासी असल्याने आमच्या चालिरीती, रितीरिवाज सांभाळत नव्या शैक्षणिक धोरणानुसार विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शिस्तबध्द आणि रचनात्मक शिक्षण दिले. त्यांनी आमच्या पाल्यांना आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देऊन शैक्षणिक प्रगती साधली असून शैक्षणिक स्तर उंचावला आहे. मात्र पाच वर्षांच्या सेवेनंतर त्यांची बदली झाली असून आता प्राचार्या रूपाताई बोरेकर यांच्या सारख्याच ध्येयवादी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसाठी तत्पर असणा-या प्राचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी देवाडा येथील एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कुल व्यवस्थापन समितीने राजुरा येथे पत्रकार परिषदेत केली आहे.
पाच वर्षापुर्वी प्राचार्य रूपा बोरेकर या देवाडा एकलव्य स्कुल मध्ये रूजू झाल्या. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करीत शैक्षणिक दृष्ट्या विविध उपक्रम राबवून आमच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधली. म्हणूनच देशातील सर्व ४८० एकलव्य शाळेतून या शाळेची एकमेव विद्यार्थीनी कु.सुष्मिता वारलू मडावी, इयत्ता १२ वी हीची पार्लमेंट स्टडी टूर साठी निवड झाली तसेच कु.स्नेहा जिवतोडे, इयत्ता ७ वी हिला इस्त्रो द्वारे बेंगलूरू येथे चंद्रयान ३ च्या सफलतापूर्वक प्रक्षेपणात सहभागी होण्याची संधी मिळाली. या शाळेतील दोन विद्यार्थी जेईई काॅलीफाईड होऊन नागपूरला शासकिय इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थी पात्रता परिक्षेत यशस्वी झाले आहेत तसेच विविध इंटरनॅशनल काॅन्फरन्स मध्ये सहभागी झाले आहेत.
कोविड महामारी च्या काळात प्राचार्य रूपा बोरेकर यांनी ” चाकावरची शाळा ” ( School of wheel ) ही नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून गाडीलाच शाळेचे रूप देऊन गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना शिकविले आणि आदीवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची नाळ तुटू दिली नाही. यामुळेच दहावीचा निकाल १०० टक्के आणि मागील वर्षी ८६ टक्के लागला. प्राचार्य रूपा बोरेकर यांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आणि त्यांना नॅशनल कौन्सिल इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशन ॲड ट्रेनिंग ( एनसीईआरटी ) येथे निमंत्रित करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची मुलाखत घेण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत प्राचार्य यांनी विशेष दक्ष राहूून विद्यार्थ्यांना निरोगी ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यासाठी स्थानिक प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची मदत घेतली. कु.प्रेमल कुमरे या ११ वी च्या विद्यार्थांनीला न्युमोनिया झाला असतांना तिचे पालक घरी घेऊन गेले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने प्राचार्य यांनी तातडीने चंद्रपूर नंतर नागपूर येथे रूग्णालयात भरती केले. तेथे स्वत: थांबून व नंतर अधिक्षक मॅडम ला आठ दिवस ठेवून तिचेकडे जातीने लक्ष दिले. अखेर त्यातून मरणासन्न अवस्थेतून ही मुलगी चांगली झाली. अशा अनेक बाबींतून अत्यंत चांगले नियोजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक महिण्याला सभा घेऊन पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्यात सामजस्य राहिले आणि सर्व बाबींवर यशस्वी मार्ग काढण्यात आला.
शासनाचा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा उद्देश देवाडा एकलव्य शाळेत सफल झाला आहे. पाच वर्षानंतर प्राचार्यांची बदली झाल्याने आता अशाच ध्येयवादी नविन प्राचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग, चंद्रपूर यांचेेकडे केली आहे. पत्रकार परिषदला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखा रविंद्र मडावी, उपाध्यक्ष सरिता चित्रांगण कोवे, बंडू आत्राम, गोपाल गायकवाड, बादुजी आडे, लच्छु कुळमेथे, मंदा आत्राम, भारत जीवतोडे, विवेक मेश्राम, सुधाकर राठोड, विजया जिवतोडे व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here