सिरो सर्वेक्षणातून कळणार जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती
चंद्रपूर दि. 22 ऑक्टोबर : व्यक्तीच्या शरीरात कोरोना प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे काय, याची तपासणी ‘सिरो सर्व्हेलन्स’च्या अभ्यासातून करण्यात येत आहे, यामुळे जिल्ह्यात संसर्गाची खरी स्थिती समोर येईल.

यावर्षी कोरोना आजाराचा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असुन सदरआजाराने बरेच व्यक्ती बाधित झाले. त्यातील काही व्यक्ती या आजारातुन बऱ्या झाल्या पण काहींचा मृत्यु सुद्धा झालेला आहे. सदर आजाराचा प्रादुर्भाव समाजातील एकुण लोकसंख्येच्या किती व्यक्तींमध्ये झाला आहे, याचा शोध घेऊन त्यानुसार कोवीड-19 आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्याकरीता उपाययोजना करण्यासाठी सिरो सर्व्हेलन्स करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता कोरोना फ्रंन्टलाईन वर्करचे रक्तनमुने संकलीत करण्याचे कामदेखील जिल्ह्यात सुरू झाले आहे.
सिरो सर्व्हेलन्सच्या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश कोरोना आजाराचा समाजातील किती लोकांपर्यंत प्रादुर्भाव झाला आहे याचा अभ्यास करणे तसेच आरोग्य सेवा बळकट करणे व त्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हा आहे.
या सर्वेक्षणांमध्ये सामान्य लोकसंख्येमधील कमी जोखमीची तसेच जास्त जोखमीची लोकसंख्या, कंटेन्टमेंट मधील लोकसंख्या व अतिजोखमीची लोकसंख्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व्हेक्षणाअंतर्गत 21 गावे व 9 कंटेन्टमेट झोनची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 हजार 400 नमुने घेण्यात येणार असुन त्यामध्ये 1 हजार 400 नमुने हे सामान्य लोकसंख्येमधून, 600 नमुने हे कंटेन्टमेंट झोनमधुन व 400 नमुने हे हायरिस्क लोकसंख्येमधून घेण्यात येणार आहे. सदर कार्य टिमवर्कद्वारे करण्यात येऊन दिलेले उद्दिष्टय पूर्ण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणांमध्ये फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचे नमुने घेण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी सिरो सर्वेक्षणा करिता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.