बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध

0
396

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध

आदिवासी क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.22 ऑक्टोबर: अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस.किरवे यांनी केले आहे.

सन 2020-21 या आर्थिक वर्षात क्षेत्रांतर्गत रु.181.50 लक्ष व क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेसाठी रु.96.19 लक्ष निधीची तरतूद चंद्रपूर जिल्ह्यासाठी करण्यात आलेली आहे.

योजनेतून मिळणारा लाभ:

या योजनेअंतर्गत नवीन विहीर रु. 2.50 लक्ष, जुनी विहीर दुरुस्ती रु.50 हजार, ईनवेल बोअरींग रु.20 हजार, पंपसंच रु.20 हजार, वीज जोडणी आकार रु.10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रु.एक लक्ष व सूक्ष्म सिंचन संच ( ठिबक सिंचन संच रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच रु.25 हजार), पीव्हीसी पाईप रु.30 हजार, परसबाग रु. 500 या बाबीवर अनुदान अनुज्ञेय आहे.

लाभार्थी पात्रतेचे निकष :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. वार्षिक उत्पन्न 1.50 लक्ष रुपये मर्यादित असावा व तो सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याची जमीन धारणा 0.20 हेक्टर ते 6.00 हेक्टर पर्यंत, नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर असणे बंधनकारक आहे.

योजनेच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटीचे mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेविषयी अधिक माहितीसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस. किरवे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here