ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या बछड्याचा मृत्यू ; दोघांवर उपचार सुरू

0
356

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या बछड्याचा मृत्यू ; दोघांवर उपचार सुरू

राजु झाडे

चंद्रपूर,दि.30 ऑक्टोंबर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्र, उपक्षेत्र खडसंगी, नियतक्षेत्र खडसंगी-तीन, कक्ष क्र. 53 मध्ये दि. 27 ऑक्टोंबर 2020 रोजी गस्तीदरम्यान क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना तीन वाघिणीचे बछडे अशक्त स्थितीत आढळले. तेथील क्षेत्रीय कर्मचारी यांनी सदर तीन वाघाच्या बछड्यांचा मागोवा घेणे सुरु केले. दि. 28 ऑक्टोंबर 2020 रोजी त्यापैकी एक बछडा अत्यंत अशक्त स्थितीत आढळल्याने त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र (ट्रांसिट ट्रीटमेंट सेंटर) येथे आणतांना त्याचा मृत्यु झाला.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) यांनी दिलेल्या एसओपी नुसार दि. 29 ऑक्टोंबर रोजी त्याचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. तसेच दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी इतर दोन वाघाचे बछडे अशक्त स्थितीत आढळून आल्याने त्यांना सुद्धा उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र (ट्रांसिट ट्रीटमेंट सेंटर) येथे आणण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. खडसंगी वन परिक्षेत्रा अंतर्गतचे क्षेत्रीय कर्मचारी व विशेष व्याघ्र संरक्षण दल यांच्या मार्फत त्या तीन बछड्याच्या आईचा (वाघीण) शोध घेणे सुरु आहे. सदर कार्यवाही उपसंचालक (बफर) व सहायक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here