राजुरा तालुक्यात सर्वत्र रेती चोरट्यांचा धुमाकूळ, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष…

0
200

राजुरा तालुक्यात सर्वत्र रेती चोरट्यांचा धुमाकूळ, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष…

राजुरा : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लहानमोठ्या नाल्यात रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा जमा झाला आहे. या भागातील रेती दर्जेदार असल्याने रेतीला सोन्याचा भाव आहे. यामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. दरम्यान चुनाळा, सातरी, चनाखा, विहिरगाव, मूर्ती, नलफडी, सुमठाना, सोंडो, देवाडा, सिद्धेश्वर, सास्ती, गोवरी, कापणगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. अनेकजण ट्रॅक्टर घेऊन या व्यवसायात गुंतले असून रेती चोरट्यांनी रेती साठा डंपिंग केला असल्याचे कळते.

सध्या या भागातील सर्व ट्रॅक्टर जवळपास च्या नाल्या मधून रेतीची चोरटी वाहतूक इतरत्र करीत आहे. तस्करांचा गोरखधंदा रात्रभर सुरू असल्याची माहिती पुढे येत असून ट्रॅक्टर च्या कर्कश आवाजाने जनताही त्रस्त दिसत आहे. नाले पोखरले जात असल्याने नाले ओस पडून नाल्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र महसूल कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत असल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वरून राजाच्या याच ‘कृपे’ मुळे तालुक्यातील लहानमोठ्या नाल्यात बारीक रेतीसाठा जमा झाला आहे. विरुर स्टे., चिंचोली, सोंडो, विहिरगाव, कापणगाव याठिकाणी लहानमोठ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात रेती जमा झाली आहे. आणि तस्करांनी परिसरातील नाल्यात आपला चांगलाच जम बसविला आहे.

विहिरगाव, नलफडी, खांबाळा, चनाखा, चीचबोडी, सुब्बई, टेबुरवाही, देवाडा, सुमठाणा, राजुरा, गोवरी, सास्ती व नदी पट्ट्यातील नाले रेतीने तुडुंब भरले असून रेतीचा भरमसाठ साठा जमा झाला आहे. याच बहुतेक नाल्यात रेती चोरट्यांनी आपली नजर घालून वारेमाप पैसा कमविण्यासाठी धुडगूस घातला आहे. सुमठाना, देवाडा, विरुर स्टे., मूर्ती, विहिरगाव, सातरी काही नाले जंगलातुन येत असल्याने महसुली नाल्यात बारीक रेतीचा थर जमा झाला आहे. पण काही रस्ते चिखलमय झाल्याने तस्करीला ब्रेक लागला असला तरी तस्करांनी मूर्ती गावाकडे जाणाऱ्या पुला खालून रेतीचा उपसा सुरू केला आहे. असंख्य टॅक्टर मधून रेतीची चोरटी वाहतूक दिवस रात्र केली जात आहे. यात राजुरा, चुनाळा, सातरी, कोहपरा, मूर्ती गावचे तस्कर तसेच तालुक्यात सर्वत्र स्थानिक ट्रॅक्टर मालकांनी जवळच्या नाल्यावर आपले बस्तान मांडले असल्याचे चित्र आहे. रेती तस्करीचा गोरखधंदा सर्रासपणे सुरू आहे. पण महसूल कर्मचाऱ्यांना रेती चोरी दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. कर्मचारी या चोरट्या वाहतूकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तस्करांना खुली सूट मिळत आहे. त्यांच्या याच कारणामुळे लाखोंच्या महसुलावर पाणी फेरल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here