कोरोना काळामध्ये विकासकामांना खिळ बसता कामा नये : ना. विजय वडेट्टीवार

0
355

कोरोना काळामध्ये विकासकामांना खिळ बसता कामा नये : ना. विजय वडेट्टीवार

आरोग्य विषयक उपाययोजना व अन्य विकास कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

चंद्रपूर दि. 2 ऑक्टोंबर: ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या भागातील रस्ते, पूल,  पाणी पुरवठा,शिक्षण,बांधकाम, सिंचन,आवास तसेच प्राथमिक पायाभूत सुविधा निर्माणाला गती देण्यासाठी  कामांची ई-निविदा प्रक्रिया करून सदर कामे तातडीने सुरू करावी, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिलेत.

सिंदेवाही येथे पंचायत समिती सभागृहात  झालेल्या बैठकीला  नगराध्यक्षा श्रीमती आशाताई गंडाटे, सिंदेवाहीचे उपविभागीय अधिकारी  प्रकाश संकपाळ, नायब तहसीलदार डि.जे. धात्रक, पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेमंत कोठारी, सिंदेवाही गटविकास अधिकारी अशोक ईल्लूरकर, सावली गटविकास अधिकारी श्री.वानखेडे, सिंदेवाही मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, सावलीचे उपविभागीय अभियंता सि.व्ही.कटरे त्यासोबतच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी कोरोना विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला सोबतच  विकास कामांचीही   पाहणी केली. सिंदेवाही, सावली , ब्रह्मपुरी तालुक्यातील तहसीलदारांनी  शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे वाटप करण्यासाठी जमिनीची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे  निर्देश दिले.

भूमिपूजन अथवा विकासात्मक कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी  कामाचा निधी, कोणत्या निधीतून खर्च झाला याची इत्थंभूत  माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. कामाचे फलक लावल्याशिवाय  कंत्राटदाराला काम सुरू करू देऊ नये , असे स्पष्ट निर्देश श्री वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत.

एखाद्या यंत्रणेला काम पूर्ण करण्यास अडचण येत असल्यास त्याची माहिती पालकमंत्री कार्यालयाला द्यावी. तसेच एखादे काम हातात घेतले की ते जबाबदारीने पूर्ण करावे. कार्य पूर्ण होण्यासाठी एकमेकांत समन्वय व पाठपुरावा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. विभागातील कोणतेही काम अडचणींमुळे अपूर्ण राहू राहता कामा नये, असेही ते म्हणाले.

यावेळी पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीची माहिती त्यांनी जाणून घेतली. ब्रह्मपुरी तालुक्यातील स्टेडियम बांधकाम संदर्भात प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना क्रीडा विभागाला दिल्या. सिदेंवाही येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून कोरोना बाधितासाठी त्या ठिकाणी 100 बेड वाढविण्याचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या.

सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी या तालुकानिहाय जंगल परिसरातील  सर्व शाळांचे संरक्षण भिंतींच्या बांधकामांना प्राधान्य देऊन काटेरी तार लावण्याचे नियाेजन करावे असेही ते म्हणाले. तीनही तालुक्यातील सर्व मंजूर कामांचे व दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करुन  सादर करावेत त्या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देता येईल.

संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निहाय मंजूर कामाची माहिती व त्यांची यादी अद्ययावत करून देण्याचा सूचना त्यांनी दिल्यात. सावली तालुक्यात ई-लायब्ररी साठी एक एकर जागा तसेच इमारत व इतर खर्च यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. अंगणवाडी बांधकामासाठी तालुकानिहाय लागणारा निधी उपलब्ध करून दिला आहे. ई -निविदा पार पाडताना एका कंत्राटदाराकडे दोन पेक्षा जास्त कामाचे कंत्राट असल्यास त्या कंत्राटदाराला काम देऊ नये अशी अट निविदेमध्ये घालावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.

यावेळी वन जमीन पट्टे तसेच विविध ठिकाणच्या आवास योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. या बैठकीला विभागातील महसूल ,सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा ,आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here