शेतक-यांसाठी पूर्ण शक्तीने काम करणार : ना.सुधीर मुनगंटीवार

0
238

शेतक-यांसाठी पूर्ण शक्तीने काम करणार : ना. सुधीर मुनगंटीवार
आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत सहजतेने पोहचविण्याचे निर्देश
एकार्जुना येथे शेतकरी – शास्त्रज्ञ मेळावा व शिवार फेरीचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 9 : भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. जीवाची पर्वा न करता सीमेवरील जवान भारतमातेची सेवा करीत आहेत, तर कठोर परिश्रम करून शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवित आहे. शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी होईल. त्यामुळे मातीच्या गर्भात अन्नधान्याची निर्मिती करणा-या शेतक-यांसाठी पूर्ण शक्तीने काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथील कृषी संशोधन केंद्रात शेतकरी – शास्त्रज्ञ मेळावा आणि शिवार फेरीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कापूस उत्कृष्टता प्रकल्प, कृषी संशोधन केंद्र एकार्जुना, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर पं.दे.कृ. वि. कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. विलास खर्चे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, एकार्जुना येथील प्रकल्प प्रमुख डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, देवराव भोंगळे, रमेश राजुरकर, नामदेव डाहुले, नरेंद्र जीवतोडे, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

शेती हा व्यवसाय मजबुतीचा व्हायला पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, काबाडकष्ट करून शेतीतून मिळणारा आनंद आणि अर्थाजन आजही कमी पडते. त्यामुळे मेहनतीच्या तुलनेत दर्जेदार उत्पादन वाढवून शेतक-यांना आर्थिक लाभ होण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजही शेती व्यवसायातूनच सर्वाधिक रोजगार निर्मिती होत असली तरी देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा कमी आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना घेऊन जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ राबविण्यात येत आहे.

पुढे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कृषी विद्यापीठाने मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्यावी. केवळ इमारत बांधून नाही तर कृषी तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे महाविद्यालय दीपस्तंभ व्हावे, यासाठी प्रयत्न करावे. ख-या गरजू शेतक-यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी विद्यापीठाने संशोधन आणि तंत्रज्ञानात सुलभता आणावी. आज जवळपास सर्वांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करून डीजीटल माध्यमातून शेतीचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रास्ताविक करतांना डॉ. विलास खर्चे म्हणाले, एकार्जुना येथे 1974 पासून कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. तसेच गत वर्षापासून येथे कपाशी उत्कृष्टता केंद्र सुरू झाले आहे. कपाशीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देणे, हा यामागचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार विदर्भातील 11 जिल्ह्यात असून या अंतर्गत 19 संशोधन केंद्र, 38 महाविद्यालये, 14 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. विद्यापीठाने आतापर्यंत 120 पिकांवर संशोधन केले  असून 181 वाण विकसीत केले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकार्जुना येथील कृषी संशोधन केंद्रासाठी 3 कोटी 7 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच पालकमंत्र्यांच्या पुढाकारानेच मूल येथील कृषी महाविद्यालय उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कापूस व्यवस्थापन घडीपुस्तिकेचे विमोचन तसेच मनोहर किरटकर, बळीराम गायकवाड, चेतन ठाकरे, कुसूम किन्नाके या शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यात 5003 किलोमिटर चे पाणंद रस्ते : शेतक-यांना त्यांचा शेतमाल घरापर्यंत नेण्यासाठी गावागावात पाणंद रस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले असून पुढील दीड ते दोन वर्षात जिल्ह्यात एकूण 5003 किलोमिटर चे पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे. याबाबत गावागावात जनजागृती करावी. जेणेकरून अतिक्रमण असणारे पाणंद रस्ते मोकळे करण्यास मदत होईल. गावक-यांनी पाणंद रस्ते अडविणा-यांची समजूत घालावी तसेच जास्तीत जास्त पाणंद रस्ते करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शेतक-यांच्या हितासाठी अनेक योजना कार्यान्वित : शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांप्रमाणेच राज्य सरकारकडूनही अतिरिक्त 6 हजार रुपये, असे एकूण 12 हजार रुपये शेतक-यांना देण्यात येत आहे. राज्य शासनाने 1 रुपयांत पीक विमा उपलब्ध करून दिला असून राज्यातील 1 कोटी 69 लक्ष शेतक-यांचा 2551 कोटी रुपयांचा विमा सरकारने भरला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत आता सानुग्रह अनुदान स्व रूपात योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत सातबारा असलेल्या संपूर्ण कुटुंबालाच विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. तसेच या योजनेत आता शेतमजूर यांना सुध्दा समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे.

कृषी अधिका-यांवर कौतुकाची थाप : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आणि आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर हे दोन्ही अधिकारी चांगले काम करीत असून त्यांच्याबाबत शेतक-यांच्या तक्रारी नाहीत, अशी कौतुकाची थाप पालकमंत्र्यांनी दिली. या अधिका-यांनी आणि त्यांच्या टीमने कृषी क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here