मराठीचे मराठीपण जपणे आपले कर्तव्य – मनोज मोहिते

127

मराठीचे मराठीपण जपणे आपले कर्तव्य – मनोज मोहिते


वणी : “मराठी भाषा आणि तिच्या बोलींचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी संवाद, संज्ञापन आणि लेखन सारे काही या बोली, प्रमाणभाषांतूनच केले पाहिजे,मराठीचे मराठीपण प्रत्येकाने जपले तर मराठी भाषा, साहित्य आणि मराठी संस्कृतीचे जतन संवर्धन होईल मराठीचे मराठीपण जपणे आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन पत्रकार व महाराष्ट्र टाइम्सचे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांनी वणी येथे केले.
स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यातील विशेष व्याख्यानात मनोज मोहिते बोलत होते.यावेळीइंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मानसकुमार गुप्ता अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात मनोज मोहिते पुढे म्हणाले,
“मराठीचे मराठीपण कशात आहे? तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांत, तिच्या लवचीकतेत, तिच्या हातात हात घालून बागडणाऱ्या बोलींत आणि आपल्यात.आपण विचार मराठीतून करतो. म्हणजेच आपले भाषेवर प्रभुत्व आहे. मराठीचे मराठीपण जसे बोलण्यात आहे, तसे ते लिहिण्यात आहे आपण लिहिले पाहिजे. व्यक्त झाले पाहिजे.”

यावेळी प्रा. दीपाली ठावरी, आणि प्रा.राहुल खोंडे यांचा मनोज मोहिते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. मानसकुमार गुप्ता म्हणाले, ”मातृभाषा असणाऱ्या आपल्या मराठी विषयीची उदासीनता भाषेच्या विकासातील मोठी अडसर आहे.मातृभाषेविषयीची अनास्था न बाळगता सजगपणे आणि निर्भयपणे संवादात भाषेला स्थान दिले पाहिजे.”

मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख डॉ. अजय देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन मनोज जंत्रे यांनी केले.प्रा.बाळा मालेकर यांनी आभार मानले.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजेन्द्र कोठारी, प्रा. उमेश व्यास, डॉ. विकास जुनगरी, डॉ. गुलशन कुथे, प्रा. किशन घोगरे,प्रा.प्रिया नगराळे,दिनकर उरकुंडे, जयंत त्रिवेदी,पंकज सोनटक्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मराठी भाषा आणि साहित्य विभागातील सुमारे ३५० विद्यार्थी उपस्थित होते.

advt