दोन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला, तीन दिवसातील दुसरी घटना

0
629

दोन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला, तीन दिवसातील दुसरी घटना

बस्थानकावर रंगला खुनी खेळ
डीजे च्या वादावरून हल्ला झाल्याची चर्चा ; दोघांचीही प्रकृती गंभीर

 

राजुरा बस स्थानकावर 6 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास खुनी थरार घडला असुन सास्ती येथिल किरण व आकाश कंडे ह्या सख्ख्या भावंडांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले असुन लाकडी ओंडके, चाकू व तलवार सदृश्य शस्त्रांनी हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे.

प्राप्त माहितीनुसार सास्ती येथिल किरण व आकाश कंडे हे सख्खे भाऊ देवीच्या विसर्जनात तालुक्यातील एका गावात डीजे वाजवायला गेले होते. तिथे त्यांचा स्थानिक युवकंशी शुल्लक वाद झाल्याची चर्चा आहे. मात्र हा वाद इतका विकोपाला जाईल अशी पुसटशीही कल्पना कुणालाही आली नाही. वाद झाल्यामुळे हे दोन्ही भाऊ सास्ती येथे परतत असताना हल्लेखोरांनी त्यांना राजुरा बस स्थानकाजवळ गाठले असता दोन्ही भाऊ बस स्थानकाच्या आवारात शिरले. मात्र जवळपास सहा ते सात हल्लेखोरांनी तिथे जाऊन त्यांच्यावर लाकडी दांडके, चाकू तसेच तलवार सदृश्य धारदार शस्त्राने हल्ला चढविला. रात्रीची वेळ असल्याने बस स्थानक निर्मनुष्य होते. त्यामुळे बचावासाठी कुणीही येऊ शकले नाही. हल्लेखोरांनी एका युवकाच्या पोटात जोरदार घाव केल्याने त्याचे आतडे बाहेर निघाले. तर दुसऱ्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याने त्याच्या डोक्याला टाके घालावे लागले. त्याचप्रमाणे त्याच्या पाठीवर शत्राने केलेल्या हल्ल्यामुळे खोलवर जखम झाली.

घटनेची माहिती मिळताच काही पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र हल्लेखोर युवक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. अखेरीस पोलिसांनी दोन्ही युवकांना ऑटोत घालुन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून दोन्ही भावांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असुन राजुरा पोलीस पुढील तपास करीत आहे.

मागील तीन दिवसातील ही दुसरी घटना असुन दोन दिवसांपूर्वी पंचायत समिती चौकाजवळ एका युवकावर शुल्लकशा वादातून सत्तुरने हल्ला करण्यात आला होता. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे ठाणेदार पदाचा नुकताच प्रभार स्वीकारणाऱ्या सहा. पोलीस निरीक्षक दरेकर यांच्यासमोर गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here