ट्रॅफिकचे वाजले तीन-तेरा

0
625

ट्रॅफिकचे वाजले तीन-तेरा

 

 

 

राजुरा : शहरात वाहतूक नियमांचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत असल्याचे वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज संविधान चौकात तिन्ही बाजूने मोठी वाहने एकत्र आल्याने त्रिशंकू निर्माण झाला. यामुळे तीनही वाहन चालक वाहने मागे घेण्यास तयार नसल्याने बऱ्याच वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास झाला. मात्र वाहतूक विभाग सुस्त असल्याने वाहतूक विभागातच ट्राफिक लागली की काय…? अशी चर्चा पुढे येत आहे.

 

राजुरा शहरात वाहतूक विभाग बेभरवशावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. समोरासमोर तिन्ही मार्गाने मोठी वाहने (ट्रक) आल्याने वाहतूक ठप्प पडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. राजुरा शहरातुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही वाहतूक विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक विभागाचीच ट्राफिक जाम झाल्याची गंभीर बाब पुढे येत आहे.

 

“संविधान चौकात नित्यनेमाने होणारा वाहतुकीचा खोळंबा आणि आज अपघात होण्याची दाट शक्यता होती. पण दुर्घटना घटता घटता राहिली. यामुळे ट्रॅफिक पोलिस कोमात आणि वाहतूक जोमात असे दिसून आले. प्रश्न विचारायचा तर कोणाला…? सर्व काही निद्रावस्थेत दिसतंय… मुख्य मार्गावर असलेले राजुरा शहर किती सुखरूप आहे, याचे बोलके चित्र दुपारी 2.27 मिनिटांनी बघायला मिळाले. हे ‘रोजचे गाणे पंढरी जाणे’ असे झाले आहे. यासारख्या घटनांना पूर्णविराम लागून वाहतूक सुरळीत सुरू राहील का…? असा प्रश्न राजुरा वासीयांच्या मनात निर्माण झाला आहे.”

 

राजुरा शहरातील चौकात वाहतूक शिपाई नसल्याने वाहतूक विभागाची भूमिका असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे शहरात सुसाट वाहने चालविणे, ओव्हरलोड, ओव्हरटेक, हिरोगीरी यासारख्या प्रकाराला बळ मिळत असून भविष्यात अपघात घडल्यास जबाबदार कोण…? राजुरा वाहतूक विभागाची यंत्रणा व मनुष्यबळ अपुरे पडत आहे का…? असा प्रश्न सुजाण नागरिकांतून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here