जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घ्या- सुप्रिया पिळगावकर

0
414

जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घ्या- सुप्रिया पिळगावकर

 

यवतमाळ, मनोज नवले 

आपल्या आयुष्यात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पद प्रतिष्ठा इत्यादी बाबतीत हवे तेवढे यश संपादन केले तरी आपल्या जीवनात मानवी मूल्यांना सर्वाधिक महत्त्वाचे स्थान असायला हवे. आपण कशासाठी जन्माला आलो? याचे कायम भान आणि चिंतन हवे. जीवनात एकदा चांगले काय? आणि वाईट काय? हे आपले आपल्याला व्यवस्थित कळले की मग प्रत्येक गोष्टीतून चांगले निवडता येते. जीवनातील या सकारात्मक तत्वज्ञानाच्या शिक्षणानेच खरा आत्मविकास साधता येतो. प्रत्येक घटनेतून सुयोग्य ज्ञान प्राप्ती करून त्याच्या नियमित उपयोजनाने जीवन यशस्वी आणि सुखी होते.” असे विचार सुप्रसिद्ध सिनेतारिका नाट्यकलावंत तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी सौ.सुप्रिया सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात आभासी पद्धतीने आयोजित सिनर्जी या व्याख्यानमालेत “ग्लॅमर मागील मेहनत ” या विषयावर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वाच्या संघर्षाची गाथा तथा त्या क्षेत्रातील सुविधेसह विविध पैलू विद्यार्थ्यांना समजावेत यादृष्टीने असलेल्या या उपक्रमाची भूमिका विशद केली.

आपल्या अत्यंत अनौपचारिक, गप्पा स्वरूपातील, आत्मीयता पूर्ण संवादात सुप्रियाताईंनी चित्रपट क्षेत्रातील केवळ चमक धमक पाहून येथे येण्याचा विचार करू नका. नशिबाने तसे यश मिळाले तर ते खूपच चांगले. पण येथे यायचे असेल तर या संपूर्ण क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या विविध पैलूंचा अभ्यास करून यापैकी काही तरी कौशल्य आत्मसात करून मगच या सृष्टीत पाय ठेवा म्हणजे आपण टिकू शकाल. राहू आणि खाऊ शकाल अशी वास्तववादी भूमिका विद्यार्थ्यांसमोर ठेवली.

अशा स्वरूपात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या समोर व्यक्त होत असल्याने मला माझ्या स्वतःच्या जीवनाचा आलेख पुन्हा एकदा पाहता आला असे म्हणत लहानपणी असलेली शिक्षिका होण्याची इच्छा, वडिलांनी सहजपणे महाविद्यालयात करून घेतलेली अभिनयाची तयारी, दूरदर्शन वर लहान मुलांच्या साठी आयोजित केलेला किलबिल सारखा कार्यक्रम, त्याच्याच आधारे सचिनजींनी नवरी मिळे नवऱ्याला साठी केलेली निवड, पुढे आयुष्यात सहजतेने मिळत गेलेल्या विविध संधी अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.

आपल्या आई-वडिलांना आपल्यापेक्षा जास्त कळते यावर विश्वास ठेवा. जगातील प्रत्येक गोष्टीतून ज्ञान मिळवत रहा आणि आयुष्यात त्याचा उपयोग करत राहा. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपण ती गोष्ट नेमकी का करतो? याचे भान बाळगा. मोठेपणा हा मिळवण्याचा विषय आहे मिरवण्याचा नाही. अशा विविध थेट मनाचा ठाव घेणाऱ्या वाक्यासह त्यांनी विद्यार्थ्यांसोबत अनेक विषयावर संवाद साधला.

गीर्वाण वाणी या यूट्यूब चैनल वर ज्या नीतिशतकम् च्या श्रवणामुळे माझे विचारविश्व संपन्न झाले आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित रहावे वाटले त्याचा विशेष उल्लेख करीत मध्यंतरीच्या काळात संस्कृतचा अभ्यास का सोडला? याची आता खंत वाटते असे म्हणत मी सध्या भगवद्गीतेचा अभ्यास करीत आहे तथा उच्चतम मानवी मूल्यांसाठी आपणही संस्कृतचा अभ्यास करावा हे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात नरेंद्र नगरवाला यांनी जीवनात संघर्षाशिवाय यश मिळत नाही मात्र तो संघर्ष करण्याची विद्यार्थी वर्गाची तयारी नसते याचे शल्य बोलून दाखविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ स्वानंद गजानन पुंड यांनी केले. आभासी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. गुलशन कुथे, डॉ परेश पटेल तथा पंकज सोनटक्के यांनी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here