“अंधश्रद्धा – मला आलेला एक अनुभव”

0
1033

 

राजूरा चंद्रपूर -विदर्भ -किरण घाटे, विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या तथा काव्यकुंजच्या लेखिका राजूरा निवासी सविता संजय भाेयर यांनी अंधश्रध्दा -मला आलेला एक अनुभव ! हा एक लेख शब्दांकित केला आहे ताे खास आम्ही वाचकांसाठी आज देत आहाे ! 

अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली एक कीड आहे. या अंधश्रद्धेमुळे खूप लोकांचे वाईट झाले आहे. याचा प्रत्यय मला खूप वर्षापूर्वी आलेला आहे..आणि आजही या समाजात अंधश्रद्धा पूर्णपणे गेलेली नाही. माझ्या बालपणातील आठवणीतून गेलेला एक प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. लोक अंधश्रद्धेपायी एका निष्पाप जीवाशी कशी खेळली, त्या निष्पाप जिवाच्या जीवनाचं कस वाटोळं केलं हे मी प्रत्यक्षात अनुभवलेल आहे. माझ्या गावात एक कुटुंब होतं… आईवडील, तीन मुलं आणि चार मुली . त्यांच्या मोठ्या मुलाचं खेडेगावातील एका मुलीशी लग्न झालं. मुलगी गरीबा घरची, खूप सुंदर आणि सुशील,शांत स्वभावाची होती. तीच लग्न झालं आणि ती या कुटुंबात सून म्हणून आली. काही दिवस सगळ सुरळीत चालू होत, आणि ३-४ महिन्यानंतर नियतीने एक खेळ खेळला. त्या कुटुंबातील एक मुलगी अचानक मरण पावली. लग्न होऊन ती सून घरी आली ..म्हणूनच आमच्या घरातील मुलीचा मृत्यू झाला ..असा सर्वांचा समझ झाला. त्या संपूर्ण कुटुंबातील लोकांच्या मनात याच अंधश्रध्देने घर केले. त्या निष्पाप सुनेला, सर्वजण पांढऱ्या पायाची अवदसा समजू लागले. तुझ्याचमुळे आमच्या मुलीचा जीव गेला म्हणून सर्वजण तिचा छळ करू लागले. घरातील सर्वांचा यामध्ये समावेश होता..सासू – सासरा, तिचा नवरा, दिर – नंदा सगळेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले..तिला अन्नपाणी न देता घरातच कोंडून ठेवल्या जात असे. तरीही ती कुणाला काही न सांगता ..मुकाट्याने तो त्रास सहन करत दिवस काढत होती. नवऱ्याकडूनही तिचा अतोनात छळ चालू होता. हे नेहमीच असे चालू होते. काही महिन्यानंतर तिला एक मुलगी झाली..बाळंतपणात ती माहेरी गेली होती. बदनामी होईल व आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून तिने माहेरी या छळाबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही…आणि ती पुन्हा मुलीला घेऊन सासरी आली.

 

सुंदर , गोंडस छोट बाळ घरी असतांनाही ..सासरच्या लोकांना तिची दया आली नाही. तिचा पुन्हा – पुन्हा छळ सुरूच होता. एक दिवस तिला घरी एकटीला ठेवून ..स्वयंपाक घराला कुलूप लावून घरातील सर्व मंडळी शेतात निघून गेली. तिला मागील चार दिवसापासून जेवायला एक कणसुद्धा दिला नव्हता. उपाशीपोटी तिचा जीव कासावीस होत होता. मुलीला घेऊन ती माझ्या घरी आली..तिला तिच्या आईबाबांना माझ्याकडून चिठ्ठी लिहून घ्याची होती. माझं घर तिच्या घराजवळच होत. ती घाबरतच आली. मी तेव्हा तेमतेम १२ वर्षांची होते. तिने मला तिच्यावर ओढवलेला सर्व प्रसंग सांगितला. ती ४ दिवसांपासून उपाशी असल्याचे मला कळले ..तेव्हा मी तिला जेवण करण्याचा खूप आग्रह केला. पण ती नाहीच म्हणाली..तिला घरच्या लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्या घरच्या लोकांना हे समजले तर ते तिला मारतील असे तिला वाटले. तरीपण मी तिला जेवण वाढलं..आणि तिच्या मुलीला पकडून बाहेर पहारा दिला ..कुणी येत तर नाही ना म्हणून. तिने घाईघाईत जेवण केले आणि ती तिच्या घरी गेली…तर काय तेवढ्यातच तिचा नवरा शेतातून घरी आला आणि कुठे गेली होतीस म्हणून ..तिला लाठीने खूप मारले. तिच्या नवऱ्यालाही त्याच्या आईवडिलांनी खूप भडकावले होते. म्हणून तो ही तीचा खुप छळ करायचा. तिने ते सहन केले. असेच छळ सहन करत तिने दिवस काढले.

 

एक दिवस तिच्या सासरच्या मंडळींनी एकत्र येऊन तिला जिवे मारण्याचा कट रचला. तिला तिच्या बाळासाठी पुरेशे दूध नाही तु औषधी घे म्हणून औषधी ऐवजी काही विषारी पदार्थ देण्याचा कट रचला. पण ही मारण्याची योजना त्या निष्पाप सुनेला कडली…तिने घरच्या लोकांना हे सर्व बोलताना एकले. ती रात्रभर झोपली नाही..आणि सकाळीच ती उठली आणि हा सर्व प्रकार माझ्याकडून एका चिठ्ठी मध्ये लिहून घेतला व ती चिठ्ठी आईवडिलांना पाठवली. आणि आईवडील येई पर्यंत तिने काही कारण दाखवून ते औषध पिले नाही. चिठ्ठी मिळताच तिचे आईवडील आले व तिला तिच्या माहेरी घेऊन गेले.

 

फक्त १८ वर्षीय ती निष्पाप मुलगी आपल्या छोट्या बाळासह माहेरी राहू लागली. सासरच्या कुटुंबीयांनी तीच संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. तिचा संसार मोडला. हे फक्त एका अंधश्रद्धेच्या संशयापोटी झाले होते. त्यानंतर तिला अनेक लोकांनी लग्नासाठी विचारले ..पण तिला लग्नाची ..सासरच्या लोकांची इतकी धास्ती झाली की तिने पुन्हा कधीही लग्न केले नाही. स्वबळावर तिने स्वतःला व आपल्या छोट्या मुलीला सांभाळले. मुलीला लहानाचे मोठे करून , तिला शिकविले. आता मुलीचे चांगल्या घरी लग्नही करून दिले. म्हणूनच जीवनापेक्षा अनमोल अस काहीही नसत. जीवन असेल तर काहीही करता येते. पुरुषाची बरोबरी करून जगण्याचा मार्ग शोधता येतो. परिस्थितीला शरण जाऊन मरण्यापेक्षा , खंबीरपणे उभे राहून एका बरोबर दोन जीवांचे प्राण वाचविता आले. यात नारीचा फार मोठा हीमतीचा वाटा आहे , हे या घटनेने मला दाखवून दिले. ही सत्य घटना आजही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. मला हा अनुभव आला की फक्त अंधश्रध्देपोटी अनेक निष्पाप जीवांचे विनाकारण बळी घेतल्या जातात. आजही याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. कोणाचा जन्म – मृत्यू कोणाच्या हातात नाही..मग कुणाच्या घरी येण्याने कोणी मृत्यू पावला तर त्याला दोषी ठरविणे हे निव्वळ अंधश्रध्देची निशाणी आहे. या संशयामुळे काहीही साध्य होणार नाही. कोणाला दोषी ठरवून , पापी , अवदसा समजून एखाद्या निष्पाप जिवाला त्रास देऊन त्याचे मनोधैर्य कमी करणे हा खूप मोठा अपराध आहे. असे करण्याऐवजी एखाद्याला अश्या प्रसंगी मदतीचा हात पुढे करायला हवा. एका स्त्री ने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे..मग ती सासू असो वा सून असो, घरातील व्यक्ती असो वा बाहेरचा माणूस असो. सकारात्मक गोष्टींविषयी श्रद्धा असावी..पण अशी नकारात्मक गोष्टींची अंधश्रद्धा कधीही असू नये.

 

 

•लेखिका•

सौ. सविता संजय भोयर राजूरा जि.चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here