‘आपले सरकार सेवा केंद्रां’वरील दरवाढ तात्काळ मागे घ्या
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यामंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे लोकहितकारी मागणी
चंद्रपूर : ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत पुरवल्या जाणाऱ्या अत्यावश्यक शासकीय सेवांच्या शुल्कात नुकत्याच झालेल्या मोठ्या दरवाढीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या दरवाढीवर तातडीने पुनर्विचार करून ती मागे घेण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून केली आहे.
खासदार धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, राज्य शासनाने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वरील जवळपास सर्वच सेवांच्या शुल्कात ६०% ते १००% पर्यंत वाढ केली आहे. ही दरवाढ अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही दरवाढ आर्थिकदृष्ट्या अत्यंत अन्यायकारक आणि त्रासदायक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या विविध शैक्षणिक परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. तसेच, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनाही विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत या अत्यावश्यक सेवांसाठी वाढलेले शुल्क त्यांच्यासाठी मोठा आर्थिक भार ठरत आहे, असे खासदार धानोरकर यांनी निदर्शनास आणले.
खासदार धानोरकर यांनी शासनाच्या ‘ई-गव्हर्नन्स’ आणि ‘सुलभ प्रशासन’ या धोरणांचा उल्लेख करत ही दरवाढ या धोरणांच्या विरोधात असल्याचे सांगितले. त्यांनी मागणी केली आहे की, राज्य सरकारने तातडीने वाढवलेले सेवा शुल्क मागे घ्यावे. तसेच, भविष्यात सेवा शुल्क निश्चित करण्यापूर्वी जनतेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सेवा शुल्कात सवलतीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.