संपुआ सरकारच्या काळात पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यातील दुवा अहमद पटेल: जयंत माईणकर

0
355

संपुआ सरकारच्या काळात पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यातील दुवा अहमद पटेल: जयंत माईणकर

अहमद पटेल! ४३ वर्षांच्या राजकीय आणि संसदीय कारकिर्दीत कधीही लाल दिव्याची गाडी अर्थात मंत्रिपद न लाभलेले आणि तरीही अनेकांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवलेलं व्यक्तिमत्त्व!अहमद पटेलांच्या राजकीय कारकिर्दीचा कळस होता संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दहा वर्षे . त्या दहा वर्षाच्या काळात ते पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा होते! अनेक वेळा त्यांचं महत्त्व प्रणव मुखर्जी यांच्यापेक्षाही जास्त असायचं. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहताना त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांना गादीवर बसवले ,अनेकांना उतरवले तर अनेकांना वाट पाहत बसवले.सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी पटेलांच्या कृपेमुळे विराजमान झाले. स्व. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांना बसविण्यात उतरविण्यात त्यांचा सिंहाचा वाट होता तर नारायण राणेंना त्यांनी मुख्यमंत्री पदाची वाट पाहत बसायला लावले.
१९९८ साली मी गुजरातमध्ये गेल्यानंतर एक घोषणेने माझं लक्ष वेधून घेतलं. गुजरातके राष्ट्रीय नेता अहमद पटेल. वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई यांच्यानंतर देशपातळीवर काँग्रेसचे दोन नेते गुजरातमध्ये होते . स्व चिमणभाई पटेल आणि माधवसिंग सोलंकी. नवनिर्माण आंदोलनानंतर चिमणभाई मागे पडले. १६ वर्षानंतर ते पुन्हा वापस आले ते मुख्यमंत्री म्हणूनच. पण चार वर्षात त्यांचा मृत्यू झाला. माधवसिंग सोलंकी परराष्ट्रमंत्री होते. पण नंतर ते आपल्या मुलाकरता राजकारणापासून दूर झाले आणि गुजरातचे एकमेव राष्ट्रीय नेतृत्व अहमद पटेल ठरले. माझ्या पाच वर्षांच्या गुजरातमधील कारकिर्दीत एक दोन वेळाच त्यांना भेटण्याचा योग आला. मितभाषी हा शब्दही कमी पडेल इतके कमी बोलणारे अहमद पटेल.
२००७ साली गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात एक छोटी बातमी छापून आली होती. बातमीचा आशय होता काँग्रेस अहमद पटेलांना गुजरातचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करणार. गुजरातचे राजकारण जवळून पाहिल्यामुळे माझा त्या बातमीवर विश्वास बसणं शक्य नव्हतं. अनेक राज्यात मुख्यमंत्री बसवणारा व्यक्ती गुजरातचा मुख्यमंत्री बनेल अस मला कधीही वाटलं नव्हतं. एक दोन ठिकाणी फोन केल्यानंतर मला लक्षात आलं की निवडणुकीच्या आधी हिंदू मुस्लिम वातावरण तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत ती बातमी तथाकथित रित्या जाणीवपूर्वक पसरविली जात
होती. कारण काँग्रेसनी कोणालाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोशीत केलं नव्हतं.अर्थात नरेंद्र मोदींना या बातमीचा फायदा व्हायचा तोच झाला आणि ते सत्तेवर आले.
२०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा एक इंग्रजी वृत्तपत्राला ईमेल द्वारे दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी अहमद पटेलांचा उल्लेख जुना मित्र म्हणून केला. अर्थात पटेलांनी मैत्रीचा दावा फेटाळून लावला होता. संघाच्या पद्धतीनुसार विरोधकांचे व्यक्तिगत जीवन सार्वजनिक करण्याची परंपरा मोदींनी सुरू ठेवली. गुजरातमधून लोकसभेवर निवडून जाणारे पटेल शेवटचे मुस्लिम खासदर होते. तीन वेळा लोकसभेत आणि पाचवेळा राज्यसभेत असे ३९ वर्षे ते संसदेत होते. २०१७ ला त्यांना राज्यसभेची पाचवी टर्म मिळू नये यासाठी त्यांचे स्वयंघोषित मित्र नरेंद्र मोदी यांनी जंग जंग पछाडले. त्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या आपल्या राजकीय गुरूंचा शंकरसिंग वाघेलांचा वापर केला. तरीही अहमद पटेल यांनी सरशी झाली. सध्या चाणक्य म्हणून अमित शहांचा उल्लेख केला जातो.पण गेली कित्येक वर्षे पटेल काँग्रेस सरकारामध्ये चाणक्य नितीच काम पडद्याआड राहून करत होते.
प्रणव मुखर्जी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे दुसरे तारणहार आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. काँग्रेसला त्यांची उणीव नक्कीच भासेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here