येत्या आठवड्याअखेर सुरु होणार मनपाचे स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल

0
427

येत्या आठवड्याअखेर सुरु होणार मनपाचे स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल

सर्व सोयीसुविधांची पूर्तता ; ४५ खाटांची व्यवस्था, ६ डॉक्टर, ६ परिचारिका नियुक्त

महापौरांनी घेतला सिटी टास्क फोर्सचा आढावा

चंद्रपूर, ता. ५ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी सर्वसोयीसुविधांची पूर्तता झाली आहे. त्यासाठी ४५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शनिवारपर्यंत उर्वरित वैद्यकीय सुविधांची पूर्तता होताच येत्या आठवड्याअखेर मनपाचे कोव्हीड हॉस्पिटल शहरातील नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवार, ता. ५ मे रोजी महानगर पालिका मुख्यालयातील राणी हिराई सभागृहात सिटी टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, सत्तापक्षनेता संदीप आवारी, गटनेते पप्पू देशमुख, सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखा परिक्षक मनोज गोस्वामी आदींसह वैद्यकीय चमू उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोव्हिड-१९ या विषाणूची भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरीता महानगरपालिका प्रयत्नरत आहे. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळापासूनच मनपाची आरोग्य चमू स्वतःच जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा देत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे महापौर राखी संजय कंचर्लावार यावेळी म्हणाल्या.

कोव्हिडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. शहरात एकूण २६ केंद्र प्रस्तावित असून, सध्या १७ केंद्रासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांसाठी काही केंद्र राखीव ठेवणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्यास ता. २२ रोजी झालेल्या ऑनलाइन विशेष बैठकीत सभागृहाने मंजुरी दिली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरु केली आणि अवघ्या आठवडाभरात ४५ खाटांचे कोविड रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज केले आहे. त्यासाठी ४५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात वातानुकूलित सुविधा राहील. ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच एमबीबीएस आणि फिजिशियन डॉक्टरची नियुक्ती करण्यात येईल. येत्या काही दिवसात औषध साठा आणि वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here