व्यक्ती विशेष! जायंट किलर एकनाथ गायकवाड!

0
460

व्यक्ती विशेष! जयंत माईणकर

जायंट किलर एकनाथ गायकवाड!

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ गायकवाड कायमचे लक्षात राहतील ते २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या शिवसेनेच्या मनोहर जोशींच्या पराभवामुळे!
मुंबईतील धारावी मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले आणि स्व विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले गायकवाड यांना तत्कालीन मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष स्व गुरुदास कामत यांनी उत्तर मध्य मुंबई या सेनेकरता सुरक्षित असलेल्या मतदारसंघातून उभे केले होते. त्यावेळी काँग्रेसला एकेक खासदार महत्त्वाचा होता. म्हणूनच उत्तर मुंबईतून १५ वर्षे खासदार राहिलेल्या राम नाईक यांच्याविरुद्ध अभिनेता गोविंदाला उभे केले आणि त्यात हे यशस्वीही ठरले. त्याच प्लॅनिंगनुसार उत्तर मध्य मुंबईतुन ‘सर’ म्हणून परिचित असलेल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे सभापती राहिलेल्या मनोहर जोशींच्या विरुद्ध गायकवाड यांची वर्णी लावली गेली.

उत्तर मध्य मुंबई हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.१९८९ पासून पत्रकार स्व विद्याधर गोखले, स्व नारायण आठवले आणि स्वतः मनोहर जोशी हे या मतदारसंघातून निवडून आले होते. सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदारांचा स मतदारसंघ. दादर विभाग याच क्षेत्रात येतो. दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी मनोहर जोशी यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. त्यांचे राष्ट्रीय जनता दलातील हितचिंतक स्व रघुवंशप्रसाद सिंग यांनी तर जोशींना अविरोध निवडून द्यावे अशीही मागणी केली.
पण तरीही मनोहर जोशींचा पराभव झालाच! आणि माजी मुख्यमंत्र्यांना पाडणारे एकनाथ गायकवाड जायंट किलर ठरले. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे प्रचाराला आले आणि गोध्रा दंगलीमुळे मुस्लिम समाज त्यांच्यावर नाराज होता आणि ते आल्यामुळे मुस्लिम समाजाची सेनेला मिळणारी मते गेली असा कांगावा सेनेतर्फे आणि मनोहर जोशी यांच्याकडून केला गेला. पण त्याला अर्थ नव्हता.२००४ते २०१४ पर्यंत गायकवाड खासदार राहिले.पुढे त्यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिल गेलं.आज त्यांची कन्या वर्षा राज्य मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री आहेत. पण एकनाथ गायकवाड लक्षात राहतील जायंट किलर म्हणूनच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here