राजर्षी शाहू वसा आणि वारसा

0
437

लेखक ✍ अॅड. गोविंद पानसरे
【लेखांक- 1】
———————————————–
झाले बहु… परि यासम हा

इतिहासजमा होऊन फक्त संशोधकांसाठी उरलेले राजे भारतात असंख्य होऊन गेले. असे राजे महाराष्ट्रातही बरेच होते. त्यांची जागा इतिहासातच होती, म्हणून भारतीय जनतेने राजेशाही नाहीशी केली आणि लोकशाही आणली.

परंतु ज्यांनी इतिहास घडवला, जे आजच्या वर्तमानातही शिल्लक आहेत आणि भविष्य घडवण्याच्या कार्यातसुद्धा जे अजून सहभागी आहेत असे राजे महाराष्ट्रात दोनच.
एक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे कर्ते समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज.

झाले बहु… परि यासम हा

इतिहासाची पाने उजळवणारे, वर्तमानातही विचारात घेणे भाग पडत असणाऱ्या आणि भविष्य घडवण्यातही सहभागी असणाऱ्या या दोन महामानवांत असे काय होते की, ज्यामुळे राजेशाहीच्या जमान्यात होऊन गेलेल्या या राजांना लोकशाहीतही असे अद्वितीय स्थान मिळाले आहे?
राजे असूनसुद्धा त्यांनी रयतेचा केलेला विचार, रयतेसाठी केलेला विचार, रयतेसाठी केलेला व्यवहार आणि त्यांच्या समकालीनांपेक्षा कितीतरी दूरदृष्टी ठेवून गाजवलेले कर्तृत्व या गोष्टींमुळे त्यांना हे स्थान मिळाले आहे.

रयत म्हणजे अर्थातच बहुसंख्य प्रजा. आजच्या भाषेत बहुजन समाज आणि त्यातील दीनदुबळे, मागासलेले विभाग. रयतेची कणव आणि रयतेचाच विचार.

प्रत्येक व्यवहारात केंद्रस्थानी रयत. जे काही करायचे ते रयतेसाठी. ही या महापुरुषांची समान सूत्र होते.

रयतेची बाजू घेऊन शाहू राजांनी वरिष्ठ वर्णाशी संघर्ष केला होता. त्यासाठी
खोटीनाटी टीका व प्रत्यक्ष त्रास सहन केला होता असा संघर्ष करणाऱ्यांच्या संघर्षातही शाहू महाराज सहभागी झाले होते.

विकत मागासलेल्या वर्गाच्या जाहीर सभांमधून शाहू महाराज भाषण करून जागृती निर्माण केली होती. उत्तर प्रदेशातील कुर्मी समाज परिषदेत आणि डॉ. आंबेडकरांबरोबर माणगांवच्या अस्सश्यवर्गाच्या परिषदेत मार्गदर्शन केले होते.

‘निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभा, ‘अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद’, ‘अखिल भारतीय अस्पृश्य परिषद’, ‘कर्नाटक ब्राह्मणेतर परिषद, ‘ज्ञानवर्धक सभा’ या आणि अशा नावांच्या व्यासपीठावरून शाहू महाराजांनी समाजातील त्या त्या विभागांशी जवळीक साधली होती.

या सभा आणि संस्थांची नावे त्यांचे स्वरूप आणि कायें स्पष्ट करणारी आहेत.

या सभा, संस्था आणि परिषदा कुणाच्या होत्या आणि कशासाठी होत्या हे त्यांच्या नावांवरून अगदी स्पष्ट होते.

आजच्यासारखी फसवी नावे धारण करण्याची पद्धत त्या काळात आली नव्हती.

शाहू महाराजांनी समाजाच्या कोणत्या विभागासाठी कार्य केले हे स्पष्ट आहे.

  1. क्रमश : ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here