कटाक्ष:तरुण नेत्यांची घाई! जयंत माईणकर

0
354

 

२००४ साली राहुल गांधींनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि त्यांच्याच बरोबर समवयस्क तरुण राजकारण्यांचा एक गट तयार झाला राहुल ब्रिगेड या नावाने. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, मिलिंद देवरा, जतीन प्रसाद, आर पी एन सिंग, राजीव सातव ही त्या ब्रिगेडची प्रमुख मंडळी. २०१४ च्या काँग्रेसच्या पराभवानंतरही राहुल ब्रिगेड कायम राहिली. मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत ज्योतिरादित्यनी अनेक वेळा आवाज उठवला. पण या ब्रिगेडमध्ये २०१८ पासून तडे दिसू लागले. राजस्थान, मध्य प्रदेश या दोन राज्यात नेतृत्वाच्या प्रश्नावरून काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध बुजुर्ग असे दोन गट दिसले.आणि स्वतः राहुल गांधी यांनी आपल्या ब्रिगेडमधल्या तरुण नेत्यांना संधी न देता अशोक गेहलोत आणि कमलनाथ यासारख्या अनुभवी सत्तरीतल्या नेत्यांना संधी दिली . तरुण आणि बुजुर्ग नेत्यांमधील मतभेद प्रथम चव्हाट्यावर आले मध्य प्रदेशमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत. ज्योतिरादित्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि ते कमलनाथ सरकारविरोधी भावना प्रकट करू लागले. उपमुख्यमंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद यासारख्या सचिन पायलट याना काही काळ थोपविणार्या पदांमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. त्यांचं लक्ष मुख्यमंत्री पदावर होत. आणि काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंग हे एकत्र झाल्याने ज्योतिरादित्य आपल्या समर्थकांसह काहीसे एकटे पडले.

ज्योतिरादित्य सिंधिया घराण्यातील तिसऱ्या पिढीतील राजकारणी. त्यांच्या आजी विजयराजे यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून सुरू झाला आणि पुढे स्वतंत्र पार्टी आणि शेवटी आपल्या परिवारासह त्या जनसंघ किंवा भाजपात आल्या आणि शेवटपर्यंत तिथेच राहिल्या. स्व माधवराव यांची सुरुवात जनसंघापासून झाली. नंतर काँग्रेस, त्यानंतर स्वतः चा पक्ष मध्य प्रदेश विकास काँग्रेस आणि पुन्हा काँग्रेस हा त्यांचा चाळीस वर्षांचा राजकीय प्रवास. माधवरावांनी राज्याच्या राजकारणात कधीही ढवळाढवळ केली नाही मात्र केंद्रात त्यांनी अनेक मंत्रीपदे मिळविली आणि सर्वात शेवटी ते लोकसभेतील उपविरोधी पक्षनेते बनले. ते जिवंत असते तर डॉ मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान झाले असते, अस त्यांच्या भगिनी आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे म्हणाल्या होत्या.

ज्योतिरादित्य यांच्यावर भाजपात असलेल्या त्यांच्या दोन्ही आत्या वसुंधराराजे, आणि यशोधरराजे यांचा भाजपात येण्याविषयी दबाव होता. पण ते १८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. लोकसभेतील पराभवानंतर आणि काँग्रेस हायकमांडनी ‘ओल्ड गार्ड’ कमलनाथ यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर त्यांचा स्फोट झाला आणि शेवटी राज्यसभेच्या उमेदवारीच्या बदल्यात ते भाजपच्या कळपात दाखल झाले.

१९७० च्या दशकात दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तित दूध विकणारे गुर्जर समाजाचे राजेशसिंग बिधुरी पायलट झाले संजय गांधींच्या संपर्कात आले आणि पुढे पायलट हेच आडनाव घेऊन राजस्थान मधील दौसा मतदारसंघातून १९९६ चा अपवाद वगळता निवडून आले. मात्र पक्षात लोकशाही असावी असं मानणारे ते एक बंडखोर नेते होते.बाबरी मस्जिद आपण कधीही पडू दिली नसती अस ते खुलेआम बोलायचे.सीताराम केसरी यांच्याविरुद्ध त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती.

शरद पवारांनी १९९९ ला सोनिया गांधींच्या परदेशी असल्याच्या मुद्द्यावर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हा प्रथम त्यांनी माधवरावांनी त्यांचं नेतृत्व करावं अशी गळ घातली.पण त्यांनी ती अमान्य केली. राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेत पी ए संगमा, हे राजेश पायलट आणि जीतेंद्र प्रसाद यांची वाट बघत होते.पण हे दोघेही नेते फिरकले नाहीत.

उत्तर प्रदेशातील दुसरे एक बंडखोर नेते जितेंद्र प्रसाद यानी चक्क सोनिया गांधी यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची हिम्मत दाखवली.त्यांचा मुलगा जतीन प्रसाद राहुल ब्रिगेडचा एक महत्त्वाचा सदस्य. पण त्यांनीही सचिन पायलट याना पाठिंबा जाहीर केला. मिलिंद देवरा तसे शांत असले तरीही आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे त्यांचा परंपरागत दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडे जाईल हे उघड सत्य आहे. आणि त्यामुळेच की काय देवरा यांनी पक्षात आपली नाराजी दाखविण्यास सुरुवात केली आणि नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्रनीतीची स्तुती करण सुरू केलं आहे. त्यांच्या भाजप प्रेमाच्या मागे मुकेश अंबानी असल्याचं बोललं जातं.

राहुल ब्रिगेडमधील चार बिनीच्या शिलेदारांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण हे काँग्रेसला नवीन नाही. १९७७, १९८९,१९९६ या काँग्रेसच्या पडत्या काळात अनेक नेते काँग्रेसला अनेक नेते सोडून गेले आणि ते पुन्हा परतही आले. कर्नाटकचे वीरेंद्र पाटील यांनी चक्क चिकमंगलोर मतदारसंघात इंदिराजींच्या विरोधात निवडणूक लढविली.पण तेसुद्धा काँग्रेसमध्ये परतले आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.पुढे ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले.त्यावेळी त्यांना भेटण्याचा योग्य आला होता.माझ्या पत्रकारितेची ती सुरुवात होती. मुंबईत ते ताजमहाल हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. मी त्यांना इंदिराजींच्या विरुद्ध निवडणूक लढविण्याविषयी आणि नंतर काँग्रेसमध्ये परतण्याविषयी प्रश्न विचारला होता. ते म्हणाले होते त्यावेळी इंदिराजींच्या विरुद्ध काही प्रमाणात टक्कर देऊ शकेल असा नेता म्हणून जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. आणि इंदिराजी यांचं मोठं मन म्हणून त्यानी त्यांना पक्षात घेतलं आणि मंत्रिपद दिल.

हा सर्व इतिहास याकरिता सांगत आहे की याआधीही तीन वेळेला काँग्रेस सुमारे तीन वर्षे, अठरा महिने आणि आठ वर्षे सत्तेपासून दूर होती. त्यावेळेलाही काँग्रेसमध्ये लोकशाही असावी असा आवाज दिल्या गेला.पण असा आवाज देणारे पुन्हा काँग्रेस सत्तेवर येताच वापस आले.

पण आता परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस सत्तेपासून दहा वर्षे दूर राहणार आहे. आणि पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदही नाही. आणि या परिस्थितीत डूबते जहाज सोडून पळून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता ही सगळी मंडळी काँग्रेसमध्ये वापस येतील.पण संकटात असताना आपल्या पक्षाला सोडून जाणं हे अयोग्य आहे.राहुल गांधींनी केवळ तरुणांना संधी न देता बुजूर्गांचा मान राखत तरुण नेतृत्वाला त्यांच्या हाताखाली काम करण्यास सांगितले. आणि तस पाहता हे योग्य आहे. पण अनेक वेळा तरुणांना घाई होते.काहीशी तीच घाई जगन मोहन रेड्डी यांना झाली होती. आज तीच घाई सचिन पायलट याना झाली आहे. ते अजून भाजपच्या हिंदुत्वाच्या कळपात गेले नाहीत. जायची शक्यता कमी आहे. टगुर्जर समाजाचे आहेत तर त्यांची पत्नी सारा फारूक अब्दुल्ला ही मुस्लिम आहे.हे दोन्ही समाज राजस्थानमधील प्रत्येक मतदारसंघात दहा दहा टक्के आहे. या वीस टक्के मतांच्या भरवशावर पायलट एखाद्या प्रादेशिक पक्षाचा प्रयत्न करू शकतात.राजस्थान मधील गेहलोत सरकारला सध्या तरी धोका दिसत नाही. धोका निर्माण झाल्यास बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार त्यांच्या मदतीला आहेतच.

संकटात सापडलेल्या पक्षाला पळपुटेपणा दाखवत अजून किती नेते सोडून जातात आणि पायलट यांचा पुढचा पवित्रा काय असेल हेच पाहणे आपल्या हातात आहे!
तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here