वर्धा जिल्ह्यातील गावातील आणेवारी 50 टक्क्यांच्या आत घोषित करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
अनंता वायसे
हिंगणघाट:-
सोयाबीन कपाशी पिकाचे बुरशीजन्य खोडकिडीमुळे व गुलाबी बोंडअळी मुळे नुकसान झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील गावातील आणेवारी 50 टक्के च्या आत घोषित करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
यावर्षी खरिपाच्या हंगामात सतत धार पावसामुळे व निसर्गाच्या कोपाने सोयाबीनच्या पिकावर बुरशीजन्य रोगामुळे खोडकिडीच्या प्रादुर्भावाने उभ्या पिकातील शेंगा गळून पडल्या. एकरी एक पोत सोयाबीन होणार नाही या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतात गुरे-ढोरे सोडले आहे तर काहींनी ट्रॅक्टर चालवून रोटावेटर मारून रब्बीच्या हंगामासाठी शेत तयार केले अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे.
विदर्भात आणि वर्धा जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणून कपाशीचे पीक आहे संततधार पावसामुळे कपाशीचे पीक जोमात येऊन बुरशीजन्य रोगामुळे फुले-पात्या-बोंडे गळून पडली. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत सतत पाणी पडल्यामुळे कपाशीच्या पीक ओलीता सारखे फुलले. परंतु सततच्या पावसामुळे कपाशीच्या पिकाला ओलीतासारखा पाणी होऊन पीक हिरवेगार होऊन फुले- पात्या सह डोलू लागले. परंतु अचानक गुलाबी बोंड आळी ने संक्रमण केल्यामुळे शेंड्यावर लागलेल्या बोंडामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे झाडांवर नवीन तयार झालेल्या बोंडामध्ये 100 तक्के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला असून निस्तेनाभूत झाला आहे.
अशाप्रकारे खरिपाच्या हंगामातील सोयाबीन,कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
तरी पिकांची परिस्थिती लक्षात घेता वर्धा जिल्ह्यातील गावातील आणेवारी 50 टक्केच्या आत घोषित करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.