परंपरेला छेद देत अंतिम संस्कार
दि. 3 ऑक्टोबर 2020 ला सुमित्राबाई शामराव साळवे, विहिरगाव हिचा वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, नातवंड, आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.
सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षापासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे तर्क करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय वाईट काय समजण्यास वाव मिळतो.
हिंदू धर्माच्या चालीरीती प्रमाणे महिलांना अंतिम विधीत सक्रिय स्थान नसते. ते अपवित्र समजले जाते. परंतु संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास प्रवृत्त केले आणि समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला. जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे तेवढाच मुलीचा सुद्धा आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. संभाजी साळवे व त्यांचे लहान भाऊ मारोती साळवे हे एवढ्यावरच न थांबता मुखाग्नी सुद्धा मुला-मुलींनी एकत्र देऊन परंपरेला झुगारले.
साळवे परिवाराने 2019 मध्ये आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता. समाजाने सुद्धा याच पद्धतीने अंतिम संस्कार करून मनात असलेली भीती घालवावी. तसेच मुलगा आणि मुलगी यात भेद न पाळता समाजात आदर्श निर्माण करावा.