विधान परिषद निवडणूक: संघाच्या मुख्यालयात भाजपला चपराक!
जयंत माईणकर
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांचा पराभव म्हणजे संघाच्या मुख्यालयात भाजपला चपराक बसण्यासारखे आहे. हा पराभव संघ परिवाराला जिव्हारी झोंबणारा यासाठी आहे की या मतदारसंघाची निर्मिती केल्यापासून इथून नेहमी जनसंघ किंवा भाजपचाच उमेदवार निवडून गेला आहे. बच्छराज व्यास, रामजीवन चौधरी, गोविंदराव आठवले,गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी आणि प्रा. अनिल सोले यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच नव्हे तर मुंबई राज्यातही संघ परिवाराकडे ही जागा राखण्यात यश मिळवलं आहे. बच्छराज व्यास यांच्यापासून सुरू झालेली ही परंपराअनिल सोले यांच्या पर्यंत अविरत ६६ वर्षें सुरू राहीली. पण यावेळी गडकरी गटाच्या प्रा सोलेना डावलून फडणवीस समर्थक महापौर संदीप जोशी उमेदवार बनले आणि तिथेच या संघ परिवारातील दोन ब्राम्हण नेत्यांमधील दुही अधिक स्पष्ट दिसू लागली. प्रा. सोले यानी जोशींना विरोध केल्याचं काही ठिकाणी सांगितल्या गेलं. पण शेवटी स्वतः प्रा सोलेनी याचा इन्कार केला. दरम्यान नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरोधात महापौर संदीप जोशींनी घेतलेली भूमिका त्याना फारच महागात पडली अस दिसत आहे. आणि ग्रामीण भागातून अभिजीत वंजारीना भरघोस पाठिंबा मिळाला. अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र हेच समीकरण विरुद्ध झाल आणि शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांचा निसटता पराभव झाला आणि अपक्ष किरण सरनाईक निवडून आहे. तिकडे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी हॅटट्रिक साधली आहे. नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र भाजपने बाजी मारली ते त्यांचे उमेदवार आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे मंत्री अमरीश पटेल यांच्या जिल्ह्यातील असलेल्या संबंधांमुळे आणि शिवसेनेचे नेते आणि माजी काँग्रेस आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांना दिलेल्या कथित पाठिंब्यामुळे. आणि त्यामुळे भाजपला सहापैकी एक तरी जागा पदरात पडली. अर्थात महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटल्यामुळे काँग्रेसच्या पाटील यांना केवळ९५ मते मिळाली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी च्या अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांचा पराभव केला.
एकूण सहा विधानपरिषदेच्या जागांपैकी प्रत्येकी दोन जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत तर एक जागी अपक्ष आणि केवळ एक जागी भाजप निवडून आले आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र आज सहापैकी पाच मतदारसंघात भाजपचा पराभव हे तीन पक्षांची महाविकास आघाडी लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचेच द्योतक आहे.
