केशुभाई पटेल! जयंत माईणकर
केशुभाई पटेलांच्या मृत्यूची बातमी आली .१९९८ साली मी अहमदाबादला यु एन आय चा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. गुजरातमधील माझ्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पहिली तीन वर्षे केशुभाई मुख्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे सलोख्याचे संबंध होते. मुख्य म्हणजे, केशुभाई दर आठवड्याला कॅबिनेटनंतर स्वतः पत्रकारांशी संवाद साधायचे. पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या सौराष्ट्र स्टाईलच्या ग्राम्य गुजरातीत उत्तर द्यायचे. त्यांनी मला त्यांच्या निवासस्थानी जेवायलाही बोलावले होते. २००१ च्या सप्टेंबरमध्ये केशुभाई अस्वस्थ दिसू लागले. त्यांचे निकटवर्तीय माजी मंत्री हरेन पंड्या ( स्वर्गीय) मला बातम्या पुरवत होते. नरेंद्र मोदींशी तोपर्यंत माझा कॉन्टॅक्ट नव्हता. अखेर मोदी ७ ऑक्टोबर २००१ला सत्तेवर आले आणि गुजरात भाजप म्हणजे केशुभाई या समिकरणाला ग्रहण लागलं. तेव्हा सत्तरीत असलेल्या केशुभाईनी आपली सक्तीची* *राजकीय निवृत्ती सहजगत्या स्वीकारली नाही. त्यांची मनधरणी करायला आलेल्या स्व अरुण जेटलींना त्यांनी आपली नाराजी दर्शवली होती. पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठवून शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी विश्वास ठेवला हरेन पंड्या यांच्यावर.

ही घटना मोदी मुख्यमंत्री बनल्यानंतर काही महिन्यात घडली असावी. मला पंड्यानी केेशुभाईनी भेटायला बोलावल्याचा निरोप दिला. मी आनंदाने ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारायला त्यांच्या बंगल्यावर गेलो. माझं स्वागत अर्थात फाफडा देऊन झालं आणि मग एक धबधबा सुरू झाला. मोदी विरोधी! मी पत्रकारितेतील नियम पाळतो. ऑफ द रेकॉर्ड गप्पा मी आजतागायत कुठेही वापल्या नाहीत. त्यांचं एक वाक्य माझ्या मनात आजही घर करून आहे. ‘सर्वोच्च पदी असलेली व्यक्ती चारित्र्यसंपन्न असावी’. या एका वाक्यात ते बरच काही बोलून गेले होते.
पुढे नरेंद्र मोदींनी पंड्याना आपल्या एलीस ब्रीज या अहमदाबादमधील १९७५ पासून काँग्रेस विरोधी असलेल्या मतदारसंघाचा आमदारकीचा त्यांच्यासाठी राजीनामा देण्यास सांगितले. स्व. पंड्यानी केशुभाई यांच्या पाठिंब्याने राजीनामा देण्यास नकार दिला आणि नरेंद्र मोदी हरेन पंड्या या वादाला सुरुवात झाली. केशुभाई इतके नाराज होते की त्यांनी मोदी पोटनिवडणुकीत निवडून आल्याबद्दल माझ्यासह सर्व पत्रकारांना प्रतिक्रिया देणं टाळलं. पण गोध्रा दंगलीनंतर केशुभाई यांचा दरारा संपलेला दिसत होता. त्यांच्या जवळचे सर्व सहकारी मोदी समर्थक बनले होते. अपवाद होता माझे मित्र पंड्या यांचा. पण पंड्याना त्याच फळ मिळालं. त्यांना अशी कुणकुण लागली की मोदी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणार, त्यामुळे त्यांनी स्वतःच राजीनामा दिला. दंगलीबाबत जस्टिस कृष्णा अय्यर पुढे त्यांनी दिलेल्या तथाकथित साक्षीला प्रमाण मानण्यात आलं. पुढे मोदींनी पंड्या उमेदवार असल्यास ते स्वतः उमेदवारी अर्ज भरणार नाही अशी भूमिका घेतली आणि शेवटी पंड्यानी स्वतः आपली उमेदवारी मागे घेतली. मार्च २००३ ला पंड्या यांचाच खून झाला. पंड्या यांच्या खुनाची चौकशी योग्य नसल्याचा आरोप आणि हा राजकीय खून असल्याचा आरोप त्यांचे वडील विठ्ठलभाई आणि पत्नी जागृती बेन यांनी केला होता. गोध्रा दंगलीनंतर मोदींच्या काळात घडलेली दुसरी वादग्रस्त घटना. २०१२ ला केशुभाईंनी गुजरात परिवर्तन पक्ष स्थापन केला. पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून पक्षाबरोबर राहीलेले केशुभाई मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षातील स्वतः च अस्तित्व गमावून बसले होते. पंड्याना समोर करून ते आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर केशुभाई त्यांच्या मृत्यूच्या मागच्या राजकीय कारणाना वाचा फोडू शकले नाहीत. अखेर ते पुन्हा भाजपात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. एकेकाळी गुजरात भाजपचे सर्वोच्च नेते असलेल्या या नेत्याचा शेवट एकाकी झाला आणि याला ते स्वतःच जबाबदार आहेत. कारण खुलेआम मोदी विरोध करणे त्यांनी नेहमी टाळलं आणि २०१२ ला त्यांनी जेव्हा वेगळा पक्ष काढला तेव्हा वेळ निघून गेली होती. आणि आज तर केशुभाई स्वतः च गेलेत.