गरजांचे नियंत्रण करायला शिका – डॉ. प्रकाश बाबा आमटे

0
378

गरजांचे नियंत्रण करायला शिका – डॉ. प्रकाश बाबा आमटे

 

यवतमाळ, मनोज नवले

“माणसाने आपल्या हव्यासापोटी आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा समतोल ढासळवत सत्यानाश केला आहे. आपण पर्यावरणाच्या केलेल्या अनियंत्रित शोषणामुळेच कोरोना सारख्या जागतिक समस्यांच्या रूपात निसर्ग आपल्यावर सूड उगवत आहे. माणसाच्या शांत आणि सुखी जीवनासाठी त्याला गरजा कमी करणे अत्यावश्यक आहे. आदिवासींच्या सोबत काम करताना आम्ही हेच शिकलो कि तक्रार करण्यासाठी जगात हजारो गोष्टी आहेत मात्र तक्रार करत बसला तर कामाचा आनंद कधीही प्राप्त होऊ शकत नाही.

आपल्या स्वतःच्या वागण्याने आपल्या आणि इतरांच्या जीवनातील दुःख किंचित देखील कमी करता आले तर त्या सारखा समाधानाचा विषय नाही. आपल्या स्वतःच्या आयुष्याला आपल्या पद्धतीने जगत असताना या समाजासाठी आपण संभव असेल तितके लहानातील लहान का होईना पण कार्य करायला हवे. त्याचा आनंद अवर्णनीय आहे.” असे विचार आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सिनर्जी या अभिनव उपक्रमात करियर समाजसेवेचे लोकबिरादरी प्रकल्प याविषयावर आभासी माध्यमातून ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत होते.

या धकाधकीच्या जीवनात केवळ स्वार्था पुरता विचार न करता करियर आणि समाजसेवा एकाच वेळी कशी साधता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श रूपात आपणाला आमंत्रित केले आहे असे म्हणत प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

आपल्या अत्यंत साध्या-सोप्या शब्दातील थेट हृदयाला हात घालणाऱ्या संवादात डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी बाबांच्या आठवणी पासून आरंभ करीत लोकबिरादरी प्रकल्पावर आलेल्या अनेक अनुभवांना सादर केले.

असाध्य रोगावर उपाय केल्यानंतर धन्यवाद सुद्धा न देता परतलेल्या रोग्याबद्दल प्रथम वाटलेले वाईट आणि नंतर त्या आदिवासींसोबत राहतांना परस्परांची मदत करणे माणसाचे कर्तव्य आहे त्यात काय आभार मानायचे? हा मिळालेला संस्कार वर्णन करणारे प्रकाशजी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते झाले.

भूक काय भयानक असते हे माकडाच्या पिल्लाच्या कथेतून सांगत एकेका अनुभवातून साकारलेला हेमलकसा आज तेथे उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक सुविधा, आरोग्य शिक्षण शेती या विषयात घडत असलेले आमूलाग्र परिवर्तन, निस्वार्थ समर्पित कार्यकर्ते आशा प्रत्येकच बिंदूने श्रोते खरोखर मंत्रमुग्ध झाले.

नैसर्गिक हिंस्रभावना सोडून प्रेम करणारे प्राणी डॉ. आमटे यांच्या प्रेमातून कसे साकारले आहेत? हे ऐकणे विद्यार्थ्यांसाठी रोमांचक अनुभव होता.

अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे सचिव एड. लक्ष्मण भेदी यांनी जे का रंजले गांजले या जगदगुरूंचा अभंगात वर्णिलेला साधू आज आपण पाहिला तसेच त्यांना मिळालेले जगाचे प्रेम हा सर्वोच्च पुरस्कार आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ निलिमा दवणे यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. गूलशन कुथे, डॉ. परेश पटेल, पंकज सोनटक्के यांनी सांभाळली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकबिरादरी प्रकल्पाचे श्री सचिन मुक्कावार यांचे विशेष साह्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here